शनिवार, ९ मे, २०२०

हिमालय (मूळ हिन्दी कविता आणि मी केलेला भावानुवाद)

खड़ा हिमालय बता रहा है
डरो न आंधी पानी में।
खड़े रहो तुम अविचल होकर
सब संकट तूफानी में।
डिगो ना अपने प्रण से‚ तो तुम
सब कुछ पा सकते हो प्यारे,
तुम भी ऊंचे उठ सकते हो
छू सकते हो नभ के तारे।
अचल रहा जो अपने पथ पर
लाख मुसीबत आने में‚
मिली सफलता जग में उस को
जीने में मर जाने में।
~ सोहनलाल द्विवेदी
*भावानुवाद*
असे हिमालय अविचल निश्चल
झेलत वादळ पाऊस हा
तसेच संकट झेलायाचे
स्वत:शीच कर निश्चय हा
ढळू नको तू ध्येया पासून
मिळेल सर्व जे हवे तुला
होशील तू ही इतुका मोठा
आभाळ ठेंगणे हो तुजला
लाख संकटे आली तरीही
जो ना सोडी मार्ग खरा
जगणे मरणे दोन्ही त्याचे
सार्थ होतसे जाण जरा
~ कविता नवरे

उंदीर, भीति आणि मी





झुरळ हा समस्त बायकांना घाबरवणारा किटक आहे असं म्हणतात. आठवा, अशी ही बनवाबनवीतला अशोक सराफ़ आणि अश्विनी भावे मधला प्रसंग! बरं राहिलं, तो पडला पडद्यावरचा प्रसंग. काल्पनिक म्हणून तो काही प्रमाण मानणार नाही तुम्ही. नका मानू. पण लोकलमधे, घरात, ऑफ़ीसात अशा कुठल्यातरी ठिकाणी आलाच असेल की जवळपास असाच काहीसा अनुभव तुम्हाला! थोडक्यात काय तर मुद्दा हा आहे की नॉर्मली बायका या झुरळ नामक किटकाला घाबरतात. त्यांच्या मते त्या घाबरत नसुन त्यांना त्याची किळस वाटते म्हणून त्या किंचाळतात. असो बापड्या. पण आम्ही पडलो ऍबनॉर्मल कॅटेगरीमधल्या. आम्ही अशा क्षुद्र किटकाला बघून घाबरु की काय? छ्या! अजाबात नाही. ह्म्म! आता झुरळाच्या जागी एखादा उंदीर दिसला तर मात्र आम्ही घाबरु. ते काय तुम्हीही घाबराल हो, अनलेस तुम्ही मार्जार वर्गातले आहात. पण आता मी त्या भीतिवरही लवकरच मात करायचं ठरवलय. हे कधी ठरलं म्हणताय? तर झालं असं की यावेळी मी ते न्यु इयर रिझोल्युशन म्हणतात ते केलय. त्यामुळे यावेळी तरी मी माझी उंदीर या प्राण्याविषयीची भीति बाटलीत बंद करुन समुद्रात फ़ेकून देणार आहे हे नक्की.

मी असं ठरवलेलं बहुतेक उंदरलाही कळलं असावं. आणि त्यानेही "बघू कशी हिची भीति बाटली बंद होते" म्हणत त्याचे इवलेसे दंड थोपटले असावेत असा मला दाट संशय यायला लागलाय. या संशयालाही आधार आहे, मी उगाच लोकांसारखं हवेत तीर नाही मारत. तर याला कारणीभूत आहे माझ्या जागेत रोज खुडबुडून जाणारा एक उंदीर. जाणारा म्हंटलं असलं तरी तो जा ये करतोय की तिथेच कुठेतरी आत घर करुन दडून बसतो याचा अजून स्पष्ट पुरावा मलाही मिळालेला नाही. पण तो आहे आणि अधूनमधून येऊन (किंवा दडलेल्या जागेतून बाहेर येऊन म्हणू हवतर) नासधूस करुन जातो हे नक्की.

अर्धवट कुरतडून ठेवलेले कागदपत्रं, फ़ाईली इतकच काय पण डस्टबीन मधल्या फ़ेकून दिलेल्या वस्तूंनाही चावे घेऊन करुन ठेवलेला पसारा यावरुन तो स्वत:च अस्तित्व दाखवून देतोय पण लेकाचा हाती काही लागत नाही.

इथे तिथे नेटवर वाचून रॅट किलर आणून ठेवून पाहीलं पण काहीही झालं नाही. सापळा पण आणला विकत. त्यात त्याच्या आवडीच्या "चीज वस्तू" ठेवून त्याला पकडायचा प्रयत्नही करुन पाहीला. पण अहं! स्वारी काही बधली नाही. कुरतडणं आपलं चालूच. सगळी कागदपत्रं, महत्वाच्या वाटणाऱ्या फ़ाईल्स सगळं सगळं कडी कुलपात ठेवायला सुरवात केली. पण अशाने गोंधळ व्हायला लागला फ़ार. एक चिटकोरा कागद काढायलाही सिक्युरिटी चेकिंग पार करत जायचं यानेच जीव उबला पार. बरं, या उपायाने कुरतडणं कमी झालं का? तर नाहीच. पठ्ठ्या, कुठून मार्ग शोधायचा काय माहीत? पण त्याने तिथेच आतच कुठेतरी बीळातून भुयारी मार्ग केला असणार असं शेवटी शेवटी वाटायला लागलं मला.

मांजरही पाळून बघीतली पण हाय रे कर्मा तिने दुधाचं पातेलं त्यातल्या सायीसकट साफ़ केलं पण उंदराच्या वाटेलाही गेली नाही. बहुतेक तिचा चातुर्मास संपला नसावा. पण पुन्हा एन्ड रिझल्ट काय? तर तो उंदीर व्यवस्थित बागडत राहीला आणि दिसेल ते कुरतडत मला छळत राहीला. मी मारे रिझोल्युशन केलेलं की उंदराच्या भीतिला बाटलीत बंद करुन समुद्रात फ़ेकून देईन पण त्यादिवशी तो दिसला तेव्हा हातात काठी असूनही मी टूणकन उडी मारुन पलंगावर चढले ते तो वाकुल्या दाखवून दिसेनासा होईपर्यंत तिथेच होते. कोणी म्हंटलं पेस्ट कंट्रोल करुन घ्या तर ते ही करुन बघीतलं . तात्पुरतं दोन चार दिवस सगळं आलबेल वाटलं पण परत येरेमाझ्या मागल्या सुरूच.

त्यादिवशी मात्रं वाटलं वर्ष संपत आलं. आज तर वर्षाचा शेवटचा दिवस. उद्या नवीन रिझॉल्युशन करण्याचा दिवस मग किमान आजतरी जुनी रिझॉल्युशन पुर्ण व्हायलाच हवी. त्याला हुडकायचं ठरवून सगळे कानेकोपरे तपासले. शेवटी तो एका अगदीच सामान्य जागी (म्हणजे अडीअडचणीच्या नसलेल्या अशा जागी) दिसला. बहुतेक मी काहीच करत नाही म्हणून कॉन्फ़िडन्ट झाला होता तो. म्हंटलं या ओव्हरकॉन्फ़िडंट उंदराला आत्ताच ठीक करु. अजून आजचा दिवस आहेच रिझॉल्युशन प्रुव करायला. मग काय? सगळा जोर एकवटून ती काठी हाणली आणि दिला फ़ेकून त्याला बाहेर.

त्यादिवसापासून माझ्या मनात बीळ करुन राहीलेल्या आणि मनाला कुरतडणाऱ्या त्या उंदरापासून मला मुक्ती मिळाली.

हे एकमेव न्यु इयर रिझॉल्युशन असेल जे माझ्याकडून पुर्ण झालं.

बिंगो! म्हणत मी ३१ डिसेंबर २०१५ चं पान उलटलं डायरी बंद केली आणि २०१६ च्या नवीन कोऱ्या करकरीत डायरीचं पहीलं पान उघडलं

आई घरी जाताना..

नजर बोलते आणि नजरेची भाषा
नजरेला अगदी सहज वाचता येते
पण कधीकधी नजर जे वाचते, ते शब्द
ओठांवर येऊ नयेत आणि मनातही झिरपू नयेत वाटण्याचे क्षण येतात
आज असाच एक क्षण आला
माहेरपणाला आलेली आई आज घरी निघाली
मी पाया पडले, तिने डोक्यावर हात ठेवला
मी उठताना म्हंटल, "तब्येतीची काळजी घे. औषधपाणी वेळेवर घेत जा."
माझं वाक्य पुरही व्ह्यायच्या आत तिचे डोळे बोलू लागले. म्हंटल तर तसा दरवेळचाच सीन हा पण दरवेळी आधीच्यापेक्षा जास्त पोटात तुटतं. ती घराबाहेर पडताना दिसेनाशी होईपर्यंत दहावेळा मागे बघते तेव्हा नजरेत साठवण्याची धडपड जीवघेणी असते.

मी परत ये म्हणते तेव्हा हो म्हणण्याच्याही आधी ती जे पुसटसं हसते ते नको वाटतं.
अशावेळी वाटतं हसणं, बघणं वाचता येणं आणि नि:शब्दाचे अर्थ कळणं हा शाप आहे.

मग मी जरा मोठ्यानेच घरात बघून सांगते लेकीला, नवऱ्याला, "आज्जी येणार आहे पुढल्या महिन्यात. सांगून गेलेय तसं"

Looks are deceptive. Don't b so judgemental


समुपदेशकाच्या रुमबाहेर आमचा नंबर यायची वाट बघत बसलेली मी आणि माझ्या आधी त्याच्या बहिणीचा (बहुतेक बहीण किंवा सोबत असलेली मुलगी म्हणू) नंबर असल्याने ती बाहेर यायची वाट बघत बसलेला तो आणि मुलीची आई.

तो केसांची विचित्रशी स्टाईल, ढॅंचिक टिशर्ट, एकाच कानात इयररिंग, हातात कडं एकूणातच पेहराव रहाणी स्टाईल ही नाक्यावर जमणाऱ्या टपोरी युवकाची

तिला बाहेर यायला वेळ लागल्याने आई थोडी अधिक अस्वस्थ. या पार्श्वभूमीवर तो आईशी बोलतोय.

अगदी बाजूलाच बसल्याने नाही म्हंटल तरी कानावर पडतय संभाषण आणि जे काही ऐकू येतय ते संभाषणात खेचून घेणार आहे

तो : आई ती चांगली आहे तू नको काळजी करु. जस तापाला औषध घेतो तसच हिथ घेतोय. बरी होणं महत्वाच. लग्नाची घाई नका करु तिच्या. येव्हढच आहे तर बाबाना सांग बाकीच्या दोघींची घ्या करुन. बरी होऊदेत हिला मग हिच करु. आता फोर्सपण नका करु. बरी झाली ना की सगळं आयुष्य आहे. बरी होणं महत्वाच आहे, लग्न नंतर पण होईल.

विषय इन डिटेल काय असेल ते असो पण त्याच समजूतदारपणे विचार करणं, तो विचार नेमक्या शब्दात समजावून देणं हे फारच भावलं मला.

त्याच बोलणं ऐकल्यावर 'टपरीवरचा छपरी' नाव मनात का होईना दिल्याबद्दल माझी मीच खजील झाले.

Looks are deceptive. Dont b so judgemental पटलच एकदम

तुम्ही फक्तं हेच करा!

अपघात झालाय?
मोर्चे काढा
काळी फीत लावा
मेणबत्त्या जाळा
बंद पुकारा
काहीही करा पण,
अपघात 'इश्यु' एन्कॅश करा

विरोधक असाल तर ?
सरकारवर खापर फोडा
आणि सरकारात असाल तर ?
इस्पितळात जाऊन हात जोडा
हे करा किंवा ते करा
काहीही करा पण,
अपघात 'इश्यु' एन्कॅश करा

सनसनाटी बातमी घेऊन
तुम्हीही टीआरपी वाढवा
पार चिपाड होई पर्यंत
तुमचं गुऱ्हाळ चालवा
असलेल तर दाखवाच
पण नसलेलही दाखवा
काहीही करा पण,
अपघात 'इश्यु' एन्कॅश करा

सामान्यांनो तुम्ही रडा, चीडा
पोस्टी पाडा, कविता करा
चार दिवस तावातावाने
'अपघात' चघळा
स्पिरीटच्या नावाखाली
सगळच ढकला आणि
कामाला लागा
तुम्हीही असच करा
अपघात इश्यु एन्कॅश करा

करु नका फक्त एकच
स्वत:ची जबाबदारी ओळखत
शिस्तीचा अंगिकार

Terrible Tiny Tales


व्हॉट्स अ‍ॅप-कालीन प्रार्थना



सकाळी उठोनी
व्हॉटस ऍप बघावे
"सुप्रभात वचने"
ढकलून यावे

फ़ेसबुकाचेही मग
उघडावे पान
बड्डेच्या तारखांचे
तो देईल भान

मायबोलीवर ही
मारावी चक्कर
डुप्लिकेट आयडीने
कुठे द्यावी टक्कर

कुठे कोण शिंकला
'टेक केअर' म्हणावे
शेजारी खपल्याचे
फ़ेसबुकवर कळावे

'RIP', 'You Rocks'
असावे हाताशी
एका क्लिकवर
निभती कर्तव्य, नाती

असे नित्य नेमाने
सदा आचरावे
स्टे कनेक्टेड हे
जगा दाखवावे