शनिवार, ९ मे, २०२०

तुम्ही फक्तं हेच करा!

अपघात झालाय?
मोर्चे काढा
काळी फीत लावा
मेणबत्त्या जाळा
बंद पुकारा
काहीही करा पण,
अपघात 'इश्यु' एन्कॅश करा

विरोधक असाल तर ?
सरकारवर खापर फोडा
आणि सरकारात असाल तर ?
इस्पितळात जाऊन हात जोडा
हे करा किंवा ते करा
काहीही करा पण,
अपघात 'इश्यु' एन्कॅश करा

सनसनाटी बातमी घेऊन
तुम्हीही टीआरपी वाढवा
पार चिपाड होई पर्यंत
तुमचं गुऱ्हाळ चालवा
असलेल तर दाखवाच
पण नसलेलही दाखवा
काहीही करा पण,
अपघात 'इश्यु' एन्कॅश करा

सामान्यांनो तुम्ही रडा, चीडा
पोस्टी पाडा, कविता करा
चार दिवस तावातावाने
'अपघात' चघळा
स्पिरीटच्या नावाखाली
सगळच ढकला आणि
कामाला लागा
तुम्हीही असच करा
अपघात इश्यु एन्कॅश करा

करु नका फक्त एकच
स्वत:ची जबाबदारी ओळखत
शिस्तीचा अंगिकार

Terrible Tiny Tales


व्हॉट्स अ‍ॅप-कालीन प्रार्थना



सकाळी उठोनी
व्हॉटस ऍप बघावे
"सुप्रभात वचने"
ढकलून यावे

फ़ेसबुकाचेही मग
उघडावे पान
बड्डेच्या तारखांचे
तो देईल भान

मायबोलीवर ही
मारावी चक्कर
डुप्लिकेट आयडीने
कुठे द्यावी टक्कर

कुठे कोण शिंकला
'टेक केअर' म्हणावे
शेजारी खपल्याचे
फ़ेसबुकवर कळावे

'RIP', 'You Rocks'
असावे हाताशी
एका क्लिकवर
निभती कर्तव्य, नाती

असे नित्य नेमाने
सदा आचरावे
स्टे कनेक्टेड हे
जगा दाखवावे

रविवार, १४ मे, २०१७

"हॅपी मदर्स डे!"

हिने तिचा डायपर बदलून थोडं स्पंजिंग केलं. लाळेरं बदलून चेहराही हलक्या हाताने टॉवेलने पुसून घेतला. पावडर लावून केस विंचरून जेव्हा तिला लोडाच्या आधाराने पलंगावर बसवलं तेव्हाचं तिचं हसू हिच्याही गाली उमटलं. तिचे हुंकार आणि त्याचे हिने लावलेले अर्थ यात चांगला अर्धा पा‌ऊण तास गेला. मग तिला खिमटी भरवून तोंड पुसून हिने थोपटून झोपवलं आणि न विसरता तिच्या भोवती लोड लावून ती पडणार नाही याची काळजी घे‌ऊन ही "मी टा‌ईम" म्हणत फ़ेसबूकवर गेली.

मदर्स-डे च्या शुभेच्छांनी भारलेल्या पोस्ट्स वाचून हिला जाणिव झाली की ही चक्क मदर्स-डे विसरली. लोडाला पाठ टेकवून झोपलेल्या तिला मग हिने हलकेच थोपटत विश केलं "हॅपी मदर्स डे!"

बुधवार, १ जून, २०१६

पूल


तुला कळलं असेलच म्हणा,
कालच्या वादळी पावसात
आपल्या गावांना जोडणारा
पूलच मोडून गेला

तसं गाव नेहमीच्या
कामकाजात व्यग्र आहे;
पूल तुटल्याने काय ते
दळण्वळण फक्त बंद आहे

तसही स्वयंपूर्ण असल्याची
भावना इतकी तीव्र आहे
की आता दोन्हीकडून
परत पूल बांधायचे
प्रयत्नही होण कठीण आहे

हे देखील तुला कळलं असेलच म्हणा..

बुद्धिबळ

बुद्धिबळ शिकून घे!
तू नेहमी सांगायचास..

आयुष्यात कोण कसे
डावपेच खेळतोय;
समजायला उपयोग
होतो म्हणे त्याचा..

तू म्हणालास म्हणून;
शिकून घेतलं मी ते ही

पण; काळ्या पांढऱ्या सोंगट्या
अशी विभागणीच नसते
खऱ्या आयुष्यात

हे "चेकमेट" झाल्यावर
लक्षात आलं बघ


गुरुवार, २६ मे, २०१६

हुरहूर

बरसायची वाट पाहून
जिवाची काहिली व्हावी
आणि येतो येतो म्हणत
त्याने नुसतीच हूल द्यावी!

आता नाहीच बरसणार
म्हणत मनाची तयारी करावी;
तेव्हाच नेमकं त्याला
बरसायची हुक्की यावी...

मन पुन्हा हळवं हळवं,
बेटं तयार त्याच्या भेटीला...
परत ऊन पावसाचा
खेळ त्याच्या वाटेला!

खरं सांग, तू ढवळ्या
नि पाऊस पवळ्या आहे ना?