बुधवार, ५ मार्च, २०२५

गोंधळ

गोंधळाला ये गं अंबे गोंधळाला ये 
आई भवानी दुर्गा माते गोंधळाला ये 
तुझ्या लेकीना सक्षमतेचे धडे द्यायला ये
गोंधळाला ये गं अंबे गोंधळाला ये 
उदे उदे उदे उदे 

सरस्वतीच्या लेकीला तू 
सबल करण्या ये 
नवदुर्गांच्या रुपाचे तू 
स्मरण द्यायला ये 
गोंधळाला ये गं अंबे गोंधळाला ये 
उदे उदे उदे उदे 


चंडी काली अन् दुर्गेची 
शक्ती द्यायला ये 
मनगटात या बळ लेकीच्या 
अता द्यायला ये
गोंधळाला ये गं अंबे गोंधळाला ये 
उदे उदे उदे उदे 

माय माऊली तलवारीचे 
वाण द्यायला ये
संरक्षण करण्याची ताकद 
लेकींना या दे
गोंधळाला ये गं अंबे गोंधळाला ये 
उदे उदे उदे उदे 




मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२५

 काळीज झालं फरार


काल रातीला लिहून चिठ्ठी

काळीज झालं फरार

पोलीस पाटील तुमीच सांगा

कुटं करु तकरार


झोप उडाली दिवसाची अन् 

राती ताल जुळंना

चाळ बोलती, त्यांचं गाणं

जीवास या उमजना


मोहीत झाले. मन हे भुलले

झाले बघा पसार

पोलीस पाटील तुमीच सांगा

कुटं करु तकरार


कोरड पडली, मनास अन् 

तापली बघा हो काया

औसद तुमच्या पाशी, यावे

तुमी लवकरी राया

 

फित्तूर काळीज, गेलं तोडून

देहामधील करार

पोलीस पाटील तुमीच सांगा

कुटं करु तकरार



शुक्रवार, ५ जून, २०२०

ती मी नव्हेच


ती, संवेदनशील कलाकार वगैरे
मी? प्रॅक्टिकल रुक्ष स्वार्थी वगैरे
ती, गाते नाचते भाव प्रकटते
मी? अभावानेही व्यक्त न होते
ती, नि:शब्दालाही वश करते
मी? शब्दांमधेही चाचपडते
ती, मोत्याचे दाणे पेरते
मी? उगवेल ते आपलं म्हणते
ती, देहात अडकूनही मुक्त
मी? मुक्त असूनही बांधलेली
ती, अस्वस्थ झाली कि साद घालते
मी? तिच्या अस्वस्थतेला वाट देते
ती, मग येते माझ्या स्वप्नात कधीकधी
मी? मग उतरवते तिची स्वप्न कधीकधी
ती, व्यक्त होऊन माझ्यापाशी, परत रिती होते
मी? तिच्या व्यक्त होण्याला माझी कविता म्हणून मोकळी होते
ती,  त्यावरही कधी आक्षेप घेत नाही
मी? स्वार्थी असले तरी इतकीही धाडसी नाही
म्हणूनच आज हे मान्य करायला हवेच
माझ्यातच रहात असली तरी
ती मी नव्हेच

शनिवार, ९ मे, २०२०

In the gloomy days



If the days are gloomy
If u are doomy
if nothing seems right
& you lost a ray of light
Just hang in my dear
You may shade a tear
Don't pretend to be happy
some days are just sappy
Its ok to feel sad
Its ok to be mad
Don' put pressure
to be optimistic
pretence is harmful
than being pecimistic
this too shall pass
This is just a phase
If days can be gloomy
there can be happy days

Trust issues animal phobia lalya and I


मला प्रचंड ॲनिमल फोबिया आहे

तसे इतरही बरेच फोबिया आहेत जसं Dance-o-phobia, Dentophobia वगैरे वगैरे. Dentophobia तर इतका कि मी अगदीच असह्य झाल्याशिवाय dentist गाठत नाही. Stich in time saves nine वगैरे मला पाठ आहे आणि वेळेवर आठवतही फक्त ते या अशा फोबिया केसेस मधे वळत नाही. एकदा तर रुट कॅनलने दाढ वाचेल अस निदान होऊनही केवळ त्या डेंटिस्टच्या चेअरवर किमान तीन वेळा बसाव लागेल म्हणून मी एका सिटिंगमधे होणारा पर्याय निवडून "काढून टाका ती दाढ" अस म्हणत आमच्या जुन्या फॅमिली डेंटिस्टना हैराण केलं होतं.

तर असो ते डेंटोपुराण. ॲनिमल फोबिया हा त्याहून वरच्या लेव्हलचा आहे. लांबून मला प्राणि दया, ओह छो छ्विट वगैरे म्हणायला जमतं. मी ॲनिमल हेटर नाहीये पण त्यांची भिती इतकी आहे कि मी आणि ते एका खोलीत एका घरात एका सर्कलमधे आलो तर मी गायब व्हायच पोशन आहे का शोधते. बुद्धीबळ खेळाव तस मी इकडून गेले तर चेक मेट टळेल कि तिकडून या विचाराने रेस्टलेस होते.

लेक तर प्रचंड प्राणीप्रेमी. तिला कुत्रा मांजर घरात आणायचय कधीचं. खरतर तिला आवडणारा प्राणी आहे 'फॉक्स', पण आईच्या फोबियाची कल्पना असल्याने ती तो पाळूया का अस उघड उघड विचारत नाही इतकच.

तस अजूनही मी तिला कुत्रा मांजर पाळायला ग्रीन सिग्नल दिला नसला तरी कधीच मनात होतं कि हे अस इतकं घाबरणही काही बर नव्हे. 

आज सकाळी चालायला गेले तेव्हा आमच्या कॉलनीतला लाल्या कुत्रा स्वागताला गेटवरच होता बागेच्या. एरव्ही लाल्या तसा शांती प्रिय आहे म्हणे पण आमच्या शेजाऱ्याने त्याच्या लाडक्या माणसाच्या खांद्यावर हात ठेवला होता तेव्हा शेजारी त्या व्यक्तीवर अटॅक करतोय अस वाटून म्हणे लाल्या शेजाऱ्याला चावला होता. त्याच्या गैरसमजाची शिक्षा शेजाऱ्याला आणि भितीत वाढ मात्र माझ्या असा लोचा असताना लाल्या एकदम समोर कि आला आज. मी श्वास रोखून इकडून चेकमेट टळेल कि तिकडून या विचारात आणि लाल्या मात्र माझ्या गार पडलेल्या हाताला नाक लावत उभा तिथे.

मनाचा हिय्या करुन मी त्याच्या डोक्यावरुन हात फिरवला (ज्याला हा फोबिया आहे तोच जाणेल हे हिय्या करण म्हणजे खतरों के खिलाडीची अंतीम फेरी गाठण्यासारख आहे)

थोडावेळ लाल्याने असे लाड करुन घेतले. हाताचा वास घेऊन झाला आणि मग लाल्याशेट माझ्या पायाला टेकून उभे राहिले. मी जागा बदलली कि परत येऊन पाठ टेकून तोंडाने ऊम्म म्हणत माझा हात डोक्यावर फिरायची वाट बघत लाल्या तिथेच उभा. अस थोपटून घेणं आवडल्याच आणि त्याने माझ्यावर विश्वास टाकल्याच त्याच्या बॉडी लॅंग्वेजमधून कळत होतं. 

विश्वास टाकण्यावरुन आठवलं, I have developed trust issues over couple of years. म्हणजे पूर्वी मी "चोरी सिद्ध होई पर्यंत समोरच्याला क्लिनचिट द्यायचे किंवा बेनेफिट ऑफ डाऊट वगैरे" आता "चोर नाही सिद्ध झाल्यावर व्यक्ती ट्रस्टेड लिस्टमधे शिफ्ट होते"  आणि हे अंध विश्वास ते डोळस विश्वास असं हेल्दी ट्रान्झिशन नाहीये हे नक्की. लोकं याला अनुभवाने आलेलं शहाणपण म्हणोत पण एका पॉईंटला मला असा स्वभाव होत जाण्याची भिती वाटते. I was optimistic and I wanted to be optimistic by heart mind and brain. बऱ्याच जणांना वाटतं मला खूप मित्र मैत्रिणी आहेत. माझं फ्रेंड सर्कल खूप मोठ आहे. I can easily mingle with all पण हे तितकही खरं नाहीये. म्हणजे मी माझ्यात बरीच कुंपणं घालून घेतली आहेत. बरेच ओळखदेख असलेले हे अगदी बाह्य वर्तुळात असतात. या कुंपणाच्या अलीकडे असलेले तसे कमी आहेत आणि त्याही आत अगदी close to heart असलेल्यांची संख्या अजूनच कमी आहे. काही गेट्स तर अशी आहेत ज्याला कुलूप लावून  किल्ली मी स्वत:च लांब फेकून दिलेय समुद्रात.

इतके ट्रस्ट इश्यू मला असताना लाल्या मात्र नुसत्या दोन मिनिटाच्या थोपटण्याने माझ्यावर विश्वास टाकून मोकळा झाला पण. माझ्याकडून धोका जाणवला तर लाल्या मला कधीही इंजेक्शन घ्यायची वेळ आणू शकतो पण मी धोकाच देईन अस मानून तो विश्वास टाकायच थांबवत तरी नाहीये.

ॲनिमल फोबियावर काम करायल सुरुवात करताना लाल्याने मला जाणवून दिलं कि u can trust anyone because u have the power to bite and fight if required. ;) 

कविता

थोडी थोडी जमलेली
थोडी थोडी फसलेली
एक कविता उगाच
रंग शाईचे ल्यालेली

आच लागली लागली
कढ आली, उतू गेली
उतू जाता जाता तिची
एक कविताच झाली

झाली कोरडी कोरडी
उन्हामधे करपली
वाफ होऊन कविता
हवेमधे मिसळली

पुन्हा पाऊस होऊन
मातीमध्ये ती रुजली
एक कविता वेडीशी
मला नव्याने भेटली

थोडी थोडी आकळली 
थोडी कोडंच भासली 
एक कविता मनाचा
तळ गाठून बसली  

अनुबंध



तुझे माझे अनुबंध
बकुळीचा जणू हार
सुकलेल्या क्षणांना ही
येतो सुगंध अपार

कढ कोंडते जे आत
बने त्याचेही अत्तर
गंधाळतो देह सारा
मनी तुझाच जागर

मन कोरडे कराया
केली रिती मी घागर
आठवांचा कढ येता
पुन्हा पाझरे पाझर

पुन्हा रुजते नव्याने
पुन्हा येतसे बहर
पुन्हा सुकती नव्याने
पुन्हा उमले अत्तर

काय म्हणू या नात्याला?
तू प्रश्न, तूच उत्तर
जीवाशीवाचे हे बंध
इथे नुरते अंतर



तिची कथा

'धबधब्याखाली दहा वाजता. Belated celebration..' इतका तूटक निरोप कोणी देत का? पण या मन्याच सगळं असच असत. मोजकच बोलणार आणि नेमकच बोलणार. बर जमत याला अस नाहीतर मी, अघळपघळ. एका वाक्यातल्या उत्तराकरताही अख्ख पानभर खरडणार. बरं निरोप धाडलान तसं उत्तरही ऐकून जायच ना माझं? ते नाही. पलट निरोपाची काही सोयच नाही. स्वत: जाऊन उभा राहील तिथे डॉट दहाला. प्रॉब्लेम माझाच आहे. त्यात इतर कोणता दिवस असता तर ठिक होतं. आज जमवायच जरा कठीणच आहे. घरात पाहुणे जमलेत. बाबा तिकडे बाहेर हॉलमधे
 व्यवस्था बघतायत. आईला आज किचन पुरुन उरणार आहे. पिंट्याची एकट्याची धावपळ सकाळपासून, आई म्हणे अरे जरा दूधवाल्याला फोन कर आणि दोन दिवस जास्तीच दूध टाकायला सांग. बाबा म्हणे, पिंट्या गुरुजींना फोन कर. सामानाची यादी चेक कर.  मी आपली घरात एका कोपऱ्यात बसून आहे. मला तिथून उठून जायची परमिशन नाहीये किमान पुजा होई पर्यंत तरी. सोवळ ओवळ एरव्हीही असतच आजीच पण आता जरा जास्तच काक नजर तिची सगळ्यांवर. आई दिव्यात तेल घालायला आली तेव्हा तिचा उजवा डोळा लवतोय का बघायची उगीचच इच्छा झाली. तितक्यात सुमाक्काने आईला हाक मारली. "मावशी या दोन दिवसाच्या भाज्या निवडून ठेवल्यात. निघू मी?" म्हणत आईच्या चहा तरी घेऊन जा या वाक्यावर मानेनेच नको म्हणत आजीने टोकायच्या आत निघूनही गेली. आजीच्या तावडीत सापडती तर वाटच होती तिची हे गो काय नखरे केस बांधून ना कराव काम अस वर ऐकाव लागल असत तिला. पण आज ती होती म्हणून आईला मदत तरी होत होती. माझा इथे बसून काहीही उपयोग होण्यासारखा नव्हता तसाही.  पण इथून निघायचीही परमिशन नव्हती. हे सगळ मन्याला सांगायच होतं पण
आहे कुठे तो इथे?तो जाऊन बसला असेल तिथे धबधब्याखाली.

समोर असता तरी म्हणाला असता "ना माझा विश्वास आहे या सगळ्यावर ना माझ्या घरच्यांचा"
विश्वास तर माझाही नव्हता रे पण तरी का कोण जाणे पाय निघत नाहीये इथून. पहिल्यांदाच ऐकाव वाटतय घरच्यांच. कोपऱ्यात बसून का होईना पण हे सगळं  बघाव वाटतय.
पण हे सगळं बोलायला भेटायला तर हवा तो. तो तर आत्तापर्यंत पोहोचला असेल तिथे धबधब्याखाली.
नेहमीची सवय आहे हि त्याची. त्यादिवशीही असच केल त्याने. एक sms तेव्हढा केला हा असाच आजच्यासारखा 'धबधब्याखाली १० वाजता see u - love'

त्याला आमची प्रपोज ॲनिव्हर्सरी त्याच स्पॉटला साजरी करायची होती जिथे त्याने प्रपोज केलं होतं.

पावसाने जोर धरला होता आई म्हणाली होती नको बाहेर पडूस आज. जीव घाबरा होतो अशा पावसाने त्यात उजवा डोळा फडफडतोय सकाळपासून.
आई ग कसल्या अंध्रश्रद्धा बाळगून आहेस म्हणत हसून आलेच जाऊन म्हणत निघाले ॲक्टिव्हा घेऊन.

दोन गल्ल्यापुढे मन्याला पिक अप केलं. पाऊस वेड्यासारखा कोसळत होता. मन्या माझ्या कानात काहीतरी बोलत होता. काहीतरी इंटिमेट असं. पावसाच्या आवाजात शब्द नीट कळत नव्हते. धबधबा आता अगदी जवळ आला होता. समोरच्या उजव्या वळणावरुन एक अर्धा किलोमीटर आत गेलं कि आलाच धबधब्याकडे जाणारा रस्ता. उजव्या वळणावर गाडी व्यवस्थित इंडीकेटर देऊन वळवली मात्र समोरुन एक ट्रक इतक्या झपकन आला कि धस्स झालं एकदम. तिथेच थांबाव लागलं. गाडी स्किड झाली. ट्रकवाला आमच्या समोरुनच पळून गेला. बऱ्याच वेळाने त्या रस्त्याला गाडी आल्यावर मदत मिळाली. आमचं सेलेब्रेशन अर्धवटच राहिलं. तेच साजर करायला तो  भेटायचा निरोप. मन्या जाऊन पोहोचला असणार खात्रीने. पण मी कशी निघू इतक सगळ होऊन गेल्यावर आई बाबांना न सांगता ते हि माझ्याच दहाव्याची तयारी सुरु असताना. मी नाही निघू शकत. सगळं आटपेपर्यंत, गुरुजी असेपर्यंत, आईचे अश्रू सुकेपर्यंत.. पिंट्या कर्ता होई पर्यंत. 

You-Know-Who"

You-Know-Who" 

सध्या त्याने थैमान घातलय
सध्या त्याने होम अरेस्टवर पाठवलय

बातम्या म्हणू नका
सोशल मिडीया म्हणू नका
त्याने सगळच हायजॅक केलय

कोणी म्हणे हा श्लोक म्हणा
कोणी म्हणे तो मंत्र म्हणा
तर कोणी म्हणे तिथे मंदिरांना कुलपं लागली
तुम्ही आता तरी हा येडेपणा सोडा
कोण चूक कोण बरोबर?
मी कोण ठरवणार? नास्तिक असो कि आस्तिक सगळ्यांच्या डोक्याला भुंगा सोडून तो अजून फिरतोय इथे तिथे

तो म्हणजे तोच हो He-Who-Must-Not-Be-Named


बुडत्याला काठीचा आधार तसा तिला मंत्राचा आणि मला मास्कचा
पॉझिटिव्हिटी आणा बॉ कुठून तरी
कशी किलो मिळते म्हणे हि पॉझिटिव्हिटी?
आयर्न सप्लिमेंट सारखी कॅप्स्युल फॉर्म मधे येते कि अजून कशी?

रामदेव बाबा नामक कोणीतरी परवा टॉक शो मधे दाखवल म्हणे योगा करा कपालभाती करा म्हणजे तो लांब राहील.
अजून कोणी महनीय व्यक्तीने सांगितल भारतीय स्ट्रॉंग आहेत. आपली खाद्य संस्कृती जगात बेस्ट आहे. आपल सोवळ ओवळ बेस्ट आपले पूर्वज बेस्ट आपण इतके बेस्ट आहोत मग इतक्या विविध साथींनी इतक्या वर्षात इतके बळी गेलेच कसे आपले?  पण हे विचारायच नाही. सध्या आपण कोणालाच काहीच विचारायच नाही. जो तो साबणाच्या फुग्यांचा खेळ खेळण्यात मग्न आहे. फुगा फोडलात तर नवीन खेळ द्यायची ताकद आपल्यात आहे? माझ्यात तरी नाही. जाऊदेत मी सध्या साबणाच्या बुडबुड्यांकडे दुर्लक्ष करुन त्याऐवजी साबणाने हात धुतेय. निवांतपणात आनंद शोधतेय, जसे ते बुडबुड्यांच्या खेळात जीव रमवतायत, ती जंतू जलाल तू आई बला को टाल तू म्हणत  पुजाअर्चा करण्यात गुंतवून घेतेय. आणि तो सुद्धा कुठेतरी दबा धरुन बसलाय.  तो म्हणजे तोच हो He-Who-Must-Not-Be-Named.

सात होरकृक्स होते ना त्याचे? मग आता शेवटचा तेव्हढा बाकी आहे. तो सातवा horcrux संपला कि तो ही संपेल. 'उम्मीद पे दुनिया कायम है |' अस कोणीतरी म्हणून गेलय आणि ते अगदीच खोटं नाही याबद्दल माझी खात्री आहे कदाचित हिच माझी काडी आहे आधाराची.
तुम्ही कोणत्या काडीला धरुन आहात?





genes,legacy, heredity आणि आपण


दिवाळीत रांगोळी काढत होते. मागे उभं राहून लेक बघत होती. मला म्हणे,
 "आई ज्ञानकमळ मस्त आलय"

तिला म्हंटल ते तर यायलाच हव होतं तुझे पणजोबा लक्ष ठेवून असतील आज 😄

मग तिचा इंटरेस्ट रांगोळीवरुन पणजोबा का लक्ष ठेवत असतील वर शिफ्ट झाला. तिला त्यामागची स्टोरी ऐकवताना अशा अनेक गोष्टी एकामागोमाग एक आठवायला लागल्या.
ज्ञानकमळाची रांगोळी जेव्हा कधी काढते तेव्हा मला अस वाटत अण्णा बघतायत ती बाजूला उभे राहून. गेरु सारवतानाही हमखास त्यांची आठवण येते. अशीच एक खास रांगोळी आजीच्या आठवणीत नेणारी आहे.

कधीतरी पोळ्या करताना अचानक एखाद्या फुगलेल्या फुलक्याला गॅसवरुन खाली काढताना हलके अंगावर काटा येतो तेव्हाही वाटत अण्णा मागे उभे राहून त्याच कौतुकभरल्या प्रेमळ नजरेने लक्ष ठेवून आहेत जसे ते, मी कॉलेजमधे असताना दाराच्या चौकटीत उभे राहून मला कौतुकाने बघायचे.
गणपतीत हार करताना, दूर्वा निवडताना हमखास अण्णा आठवतात. आठ नातवंडांना एंगेज ठेवायच त्यांच कसब आठवतं.

हे अण्णा आणि आजी माझ्या आईचे आई वडील. घरातली पहिली नात म्हणून फार जास्त जीव त्यांचा माझ्यावर.


बाबांच्या आईचा सहवास फार नाही लाभला पण बेसन लाडू मला आवडायचे म्हणून ती मी तिकडे जाणार असेन तर करायचीच आणि अचानक जाणं झालं तर किमान पणशीकरांकडून आणून खाऊ घालायची असं माझी आई आणि आत्याने सांगितल होतं पूर्वी. हे कळल्यापासून मला बेसन लाडू अधिकच आवडायला लागले. मी पहिल्यांदा केले तेव्हा मला माझी आजी आणि हे आई आत्याच सांगण आठवलं. लेक पूर्वी खायची नाही पण मी पहिल्यांदा केले तेव्हापासून तिला आवडायला लागले. त्यावेळी का कोण जाणे पण मला अस वाटल आजीने तिचं प्रेम त्यात मुरवलं म्हणून लाडू पणतीला आवडले तिच्या आणि म्हणून तिच्या या नातीला करायलाही जमले. आत्याही खाऊन म्हणाली तेव्हा कि एकदम तुझ्या आजीसारखे झालेत गं.

मला आषाढीला हमखास मामा आठवतो माझा.वारी सुरु झाली कि पण तो आठवतो. मामा भाचे डोंगरसफारी, डोंगरावर केलेली भेळपार्टी, झब्बूचा रंगलेला खेळ, टेलिस्कोपमधून आकाशदर्शन, आ वासून ऐकलेल्या विज्ञान गप्पा.. अशा अनेको आठवणीतून मामा डोकावतो.

अस वाटत हि मंडळी या रुपाने अंशतः आहेतच इथे माझ्यात

आपलं एखाद माणूस जातं ना तेव्हा आपल्यातला एक अंश त्यांच्यासोबत जातो (part of us dies with the person म्हणतात तस) तसच त्यांच्यातला एक अंश आपल्यात उरतोच उरतो.

यालाच genes,legacy, heredity म्हणत असावेत का?


तात्पर्य, जजमेंट आणि आपण



तुम्ही ती 'मऊशार कापसाच्या गाद्यांमध्ये, खालच्या कुठल्यातरी थरात असलेला खडा टोचून झोप न लागणाऱ्या राजकन्येची' गोष्ट ऐकली असेलच पूर्वीही. अशा गोष्टींखाली पूर्वी तात्पर्य नावाचा प्रकारही वाचायला मिळायचा. सोबत दिला नसेल तरी तो कथा सांगणारी व्यक्ती सांगायचीच. तर या ही गोष्टी सोबत "सूख बोचतं ते असं" अशा अर्थाच काही तात्पर्य वाचल्याच + ऐकल्याच आठवतय.

पण खरच असेल ना अशी एखादी राजकन्या / राजपुत्र ज्याला हा असा खडा टोचत असेल. टोचणी बारीकशी असेल पण तरी पाठ टेकली कि जाणवणारी असेल.

आणि आपणच काय पण तिने/त्यानेही ही राजकन्येची गोष्ट त्यातल्या तात्पर्यासकट ऐकलेली असल्यामुळे, स्वत:च स्वत:ला,"सूख बोचतय बर हे" म्हणत झटकून टाकलं असेल.

अस झटकून टाकल तरी पाठ टेकल्यावरच टोचणं मात्र झटकलं गेलं नसेल.

सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशा कितीतरी प्रकारच्या खड्यांमुळे तिची/त्याची झोप उडाली असेल. इतरांच जाऊदेत पण अशी तात्पर्य स्वत:च्याही मनात खोल रुतल्यामुळे आधी "छे! कुठे काही खडाच नाही" पासून ते, हे जे टोचतय ते "आपल्याच मनाचे चोचले आहेत" म्हणत स्वत:ला दोष दिला गेला असेल.

आणि कधीतरी या द्वंद्वात उध्वस्त होऊन कसं सावराव हे न कळून आयुष्य उधळून देत तिने/त्याने आपल्यापरीने त्याचा शेवट केला असेल.

हे मनात यायच कारण नुकत्याच ऐकलेल्या काही  आत्महत्येच्या घटना हे आहे. वरकरणी खूप सुखात भासणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत, हसत्याखेळत्या कुटुंबात घडलेल्या या घटना. नंतर मागे राहिलेल्यांना मात्र विचाराच्या वावटळीत सोडून देतात. काहीच कारण सापडत नसतं. उगा एखादा बारीकसा खडा असावा अस वाटत रहातं. आपल्या लेखी 'ते' त्या राजकन्येसारखच आयुष्य जगत असतात.

पण खर सांगू? तर तो खडा खरा असतो, त्याच टोचणं खर असतं. किमान त्यांच्यापुरत तरी ते खरं असतं.

सर्वात पहिले हे जे तात्पर्याचे, आदर्शाचे 'कोट्स' आपल्या मनात बसलेले असतात ना घट्ट ते अक्षरश: बॅन केले पाहीजेत.

कदाचित त्यांनीही हे आदर्शाचे कोट मनात वाजत राहिल्यामुळे आपल्याच मनाचे चोचले म्हणत गिल्ट बाळगून त्यांच अस्तित्वच नाकारल असेल.

त्यांनी 'हे खडे आहेत तिथे त्या सुखाच्या गादीतही लपलेले' आणि 'त्यांच्या टोचण्याने त्रास होतो' हे इतपत मान्य केल असत ना तर, तर कदाचित त्यांनी मदत मागितली देखील असती आणि मग कदाचित सूख बोचतंय अस न म्हणता 'एकतरी' मदतीचा हात त्यांच्यापुढे केला असता कोणीतरी.
आणि अस झाल असत तर मग मागे राहिलेल्यांना विचारांच्या वावटळीत जर तर ची कारण पिंजत बसाव लागलं नसतं.

तात्पर्य टाळून जजमेंटल न होता आपण इतरांकडे आणि त्याही आधी स्वत:कडे बघायला शिकूनच घेऊया आता. हे एक तात्पर्य तेव्हढ बॅन न करता शिकून घेऊया. काय म्हणता?

स्पेस

काहीगोष्टीनाएकदमघिश्यापिट्यावाटतीलपणतरीत्याआवश्यकआहेतपटतनाहीनामाझंम्हणणंपणतेनीटबघितलसतरपटेलकिमानकाहीनाहीतरएकटक्कातरीनक्कीपटेल.

काय झालं? वाचताना अवघड जातय? दमायला होतय समजून घेताना?

का होतय असं? कारण मी वाक्य, वाक्यासारख नीट तोडून लिहीत नाहीये. एक वाक्य संपल कि द्यायचा पूर्णविराम मी देत नाहीये. ना कुठे स्वल्पविराम देतेय.

तुझही तेच होतय का? ध्येय समोर ठेवणं, त्या ध्येयाचा पाठलाग करणं, ते करताना त्याचा आनंद घेणं हे छानच आहे सगळं पण जरा श्वासही घे अधूनमधून. थोडी विश्रांती घे. फुलस्टॉप दे गरज असेल तिथे आणि काही ठिकाणी स्वल्पविराम तरी नक्की वापर. काहीही न करता घालव एखादा दिवस. किंवा त्या दिवसाकडे ठरवून 'एक उनाड दिवस साजरा करायचा आहे' असच ध्येय आहे असं म्हणून बघ. दुसरा श्वास घेण्यासाठी आधी उच्छ्वास सोडावा लागतो आणि विश्वास ठेव या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत.

अस्वस्थ वाटतय? वाटूदेत की. अस्वस्थ असणही चांगलं असतं. अस्वस्थ असणं म्हणजेच प्रवास सुरु असण्याच लक्षण आहे. प्रवास आपली दिशा घेऊन येतो. आपण फक्तं कान बंद करुन मनाच ऐकायच, मन दिशा ओळखत.

आणि चुकली दिशा अस वाटल एक क्षण,नाही अगदी ते वाटणं खर जरी आहे मान्य केलं आपण तरी त्या दिशेने चालताना मनाला आलेला सुंदर अनुभव तर खरा असेल ना? तो घेऊन फिरायच मागे नवीन दिशा शोधायला.

प्रत्येकाच अस्वस्थ होणं वेगळ आणि प्रत्येकाचा 'पीस ऑफ माईंडही' वेगळा त्यामुळे आपण फक्त आपल्याशी प्रामाणिक रहातोय ना हे बघायच. तेव्हढही खूप आहे, खरच! स्वत:वर विश्वास ठेव नक्की मार्ग सापडेल.

दोन शब्दांमधेही अंतर असतं आणि ते असतं म्हणून ते शब्द नीट वाचता येतात. हि जी दोन शब्दांमधली ब्लॅन्क स्पेस आहे ना ती खूप महत्वाची आहे. त्यामुळे तू ब्लॅंक स्पेसच गिल्ट कधीच नको बाळगूस. हि ब्लॅंक स्पेसच तुझा पुढचा प्रवास ठरवेल कुणी सांगाव?

म्हंटल ना मगाशीच, काही गोष्टी ना एकदम घिश्यापिट्या वाटतील पण तरी त्या आवश्यक आहेत. पटत नाही ना माझं म्हणणं? पण ते नीट बघितलस तर पटेल. किमान काही नाही, तर एक टक्का तरी नक्की पटेल.

बोलके मौन

शब्दांच्या पाऊलवाटी
बोलके मौन साथीला
ऊन कवडसे शब्द
मौनाच्या भेटीला

हे नाते असते खास
शब्दाचे नि:शब्दाशी
स्पर्शीत झाले तरिही
उरतेच जरा अस्पर्शी 

ऋतू हा हवासा



ऋतू हा हवासा, हवा ही गुलाबी
तुझा हात हाती असा राहूदे -२ 

तुझा हात हाती गुंफूनिया मी 
जरी टाकते हे पाऊल नवे 
वाटा नव्या या, खुणवी मला; पण 
मनी हुरहुरी का उगा दाटते   

तुझी साथ असता, तुझ्या सोबतीने 
मिटवीन साऱ्या शंका प्रिये 
तुझा स्पर्श होता, स्पर्शातूनीया 
मुक्यानेच सारे मला आकळे 

तुझे स्वप्न हलके बिलगले मला अन्
अता काही दुसरे मला ना दिसे 
अनवट सुरांच्या किनाऱ्यावरी या 
तुझ्या भावनांचे उमटले ठसे 

कोर्ट म्हणत..

कोर्ट म्हणत, वेगळं व्हायला
काहीतरी कारण असावं लागतं 
ठोस आणि व्हॅलिड 
त्याच वजन पडाव लागत 

भांडण ?मारझोड ? 
व्यसन? गेलाबाजार अफेअर ?

नाही ? 
यातल काहीच नाही?

मग कठीण आहे तुमची केस 
वेगळ व्हायला नाहीये काहीच बेस 

मग काय? रहातोय एकत्र अजूनही 
एकत्र रहायला, काहीतरी कारण लागत 
अस कोर्ट म्हणत नाही, म्हणूनही

Life


Life is like a reality game
It's different; though rules are same
It's you who decide
to go left or right
Either way is uncertain
but 'hope' is the source of light
Even though it turns out to be
as dark as the night
This too shall pass
& you'll be alright
Not to forget
life is like a game
losers just blame
& fighters win acclaim
-Kavita Navare
26/09/2018

अक्षरगाणे

अ अ रे आईचा
ब ब रे बाळाचा
क क रे कोणाचा?
काळ्या काळ्या केसांचा
ख ख रे खाण्याचा
ग ग रे गाण्याचा
घ घ रे कोणाचा ?
तो तर माझ्या घराचा
च च रे चकलीचा
छ छ रे छत्रीचा
ज ज रे कोणाचा?
जेवणातल्या जिलबीचा
झ झ रे झोपेचा
ट ट रे टोपीचा
ठ ठ रे कोणाचा?
ठ तर आहे ठेंग्याचा
ड ड रे डब्याचा
डबा असतो खाऊचा
ढ ढ रे ढगाचा
काळा ढग पावसाचा
ण ण रे कशाचा?
पाणी गाणी शब्दामध्ये
ण तर असतो शेवटचा
त त रे तबल्याचा
थ थ रे थेंबाचा
द तर असतो दादाचा
ध तर धमाल धिंग्याचा
न न रे कोणाचा?
नाचूयातल्या नाचाचा
प प रे परीचा
फ फ रे फुलाचा
ब तर असतो बर्फीचा
भ आवडत्या भजीचा
म म रे कोणाचा?
म लब्बाड माऊचा
य य रे यशाचा
र र रे राजाचा
ल लपाछुपीचा
व तर आहे वहीचा
श सांग कोणाचा?
श माझ्या शाळेचा
पोटफोड्या ष म्हणतो
नाही बरं मी शेताचा
मी तर षटकोनाचा
ळ ळ रे कोणाचा?
माळ, बाळ या शब्दांमध्ये
ळ तर असतो शेवटचा
स स रे सशाचा
ह ह रे हरणाचा
क्ष क्षमा क्षमतेचा
ज्ञ सांग तू कोणाचा?
जे शिकतो त्या ज्ञानाचा
हि तर आहे बाराखडी
चालीत रोज म्हणूया
सोपी सगळी अक्षरे ही
गाण्यामधून शिकूया

पाळणा / अंगाई

बाळा जो जो अंगाई | गाई तुझी ग आई
बाळा जो जो अंगाई
आली घरा ती आली, बनून गवराई
बाळा जो जो अंगाई
बाळलेणी ती ल्याली | लावा तीट हो गाली
भाग्य रेखाया भाळी, आली दुरून सटवाई
बाळा जो जो अंगाई
अंगडी टोपडी ल्याली | हसू फुलले गाली
जणू अंगणी माझ्या, फुलली हि जाई
बाळा जो जो अंगाई
रक्षितो बाळाला माझा रामराया
कोड पुरवी अंबाबाई, कौतुके पाही आई
बाळा जो जो अंगाई

इजा बिजा...

गॅलरीत कावळा कधीचा केकाटत होता. "आता नको रे बाबा कोणी पाहुणा!" म्हणत ती उठायला गेली तर ओल आलेल्या फरशीवरुन तोलच गेला.
आज काही खरं नाही सकाळी पायऱ्यांवरुन पडत होते. इजा झालं बिजा झालं, मन परत अस्वस्थ झालं. तिने मूड बदलायला रेडीओ सुरु केला.
"तू जहां जहां चलेगा मेरा साया.." स्वरांनी कानाला हलकेच स्पर्श केला. हेच गाणं का? तिला अजूनच अस्वस्थ वाटायला लागलं. चॅनल बदलून ती दिवा लावायला उठली.
वीजा भेसूर चमकत होत्या. कावळा कर्कश्श ओरडत होता. त्याला उडवायला गेली आणि छातीत जोरदार कळ आली.
कावळा उडाला, पाऊस थांबला, सगळच थांबलं.
रेडिओवर आता आएगा आनेवाला संपून जितनी चाबी भरी रामने लागलं होतं.

घटनाक्रम

घटना घडत गेल्या, क्रम काहीही असेल याचा.
थांब ॲडम! ती विनवणीच्या स्वरात म्हणाली. माझा श्वास थांबला एक क्षण.
त्या बंद दारापलिकडे म्हणे सैतानाचे राज्य आहे आणि कसलेसे संस्कार केलेल्या मंतरलेल्या धाग्याने म्हणे त्याला रोखून धरलय. बूलशीट! या अंधश्रद्धेलाच मला तोडायचे आहे.
तिच्या म्हाताऱ्या हाताचा खरखरीत स्पर्श गालाला झाला. फूल पडलेल्या डोळ्यातून अश्रू तिच्या गालावर ओघळले.
“ती सैतानाची खोली आहे. त्याला बाहेर येऊ दिला तर अनर्थ होईल. काळजी वाटते रे मला तुझी” ती कळवळून म्हणाली.
म्हातारी सरणावर गेली. मी दोर कापून टाकला. दार उघडले. खोल भरून श्वास घेतला.
घटना घडत गेल्या, क्रम काहीही असेल याचा. लोकं म्हणतात ”ॲडम आता कुमार्गाला लागलाय”