बुधवार, २३ एप्रिल, २०१४

गोष्ट तिची माझी - अगदी तीळा एव्हढी

गोष्ट तिची माझी - अगदी तीळा एव्हढी


हे मधेच आज का आठवलं, का लिहावसं वाटलं त्याचं नेमकं कारण नाही माझ्यापाशी. काही दिवसांपुर्वीची गोष्ट आहे ही. नक्की कशावरुन चर्चा सुरू होती ते ही आता आठवत नाही आहे मला. पण काहीतरी "पर्याय निवड" ह्या वरुनच चालली असणार येव्हढं नक्की. लेक मला विचारत होती कशा बद्दल तरी. म्हणजे "हे" की "ते" निवडू किंवा तत्समच काहीतरी. आणि मी? मला तिला स्वयंसिद्धा करायची नेहमीच इतकी घाई असते की मी तिला नेहमीचं उत्तर दिलं "तुझं तू ठरव रे बच्चा. जस्ट डू इट" माझ्या मते मी पोझिटिव्ह स्टेप घेतली होती. सजग पालकत्व का काय म्हणतात त्या धर्तीवरची ही तिला स्वावलंबी बनवून स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला शिकवण्यातली ही पहिली स्टेप होती.

चुकलं तर? नकोच ना? तू सांग ना? ह्या तिच्या पालुपदावर पुन्हा मी एकदा सजग पालकत्वाचा मुखवटा चढवत "चुकलं तर चुकलं, डू इट अगेन. मी आहे ना?" म्हणत परत तिला पाण्यात ढकललं

माझ्या मते उत्तम पालक होण्यातली ही एक महत्वाची स्टेप होती

आणि समोरुन रडत रडत डोळ्यातलं पाणी पुसत रिप्लाय आला " मी तुझ्याकडे का येते सगळे प्रश्न घेऊन माहिती आहे? कारण मला वाटतं माझ्या सगळ्या प्रश्नांचे तुझ्याकडेच सोल्युशन असते. आय लव्ह यु, आय ट्रस्ट यु ऍन्ड आय काउंट ऑन यु"

काहितरी जोराने टोचलं त्यातलं मला. मी फक्त माझ्याच परस्पेक्टिव्हने तिच्या प्रॉब्लेम कडे बघत होते. तिने छोटे छोटे प्रश्न स्वत:चे स्वत: सोडवावेत. निर्णय चुकला तरी चालेल पण निर्णय घेऊन तो निभवायला शिकावे. दरवेळी समोरच्या कुणाकडे तरी सोल्युशन करता पाहू नये. रेडीमेड सोल्युशन पेक्षा चुका करत त्यातून शिकावं हा माझा हेतू माझ्या दृष्टीकोनातून कितीही चांगला असला तरी त्यावेळी तिच्या दृष्टीने ती माझ्याकडे आली होती ते अख्ख्या जगात (म्हणजे तिच्या जगात) तिच्या मते आई पेक्षा जास्त योग्य व्यक्तीच नाही आहे. ह्या तिच्या भावना मला समजल्या होत्या पण माझ्या भावना तिला समजाऊन देताना मी किंचीत जास्तच कठोर वागले की तिला हे मला येऊन बोलून दाखवावं लागलं की ती माझ्यापाशी एक विश्वास घेऊन आलेय.

तिच्या त्या वाक्याने माझ्यावरची सजग बिजगची झापडं गळून पडली. पाण्यात पडलं की माणूस पोहायला शिकतो असं म्हणतात ते असेलही खरं तरी प्रत्येकाची शिकायची आपापली पद्धत असते, गती असते ना!

ह्या एका घटनेने ना मी तिला लग्गेच रेडिमेड सोल्युशन्स द्यायला लागलेय ना तिचं माझ्याकडे मदत मागणं थांबलय पुर्णपणे. पण मी काही गोष्टी नक्कीच शिकलेय. माझ्याकडे दरवेळीच सोल्युशन असेलच असं नाही हे ठावूक आहेच मला. मात्र मी गोष्टी तिच्या नजरेनही समजून घ्यायचा नक्की प्रयत्न करेन हा विश्वास मी तिला द्यायचा माझ्याकडून पुर्ण प्रयत्न करेन ह्यापुढे. तिचा दृष्टीकोन काय आहे हे समजून घेणं हे माझ्या लिस्टवर सगळ्यात वरती असलं पाहिजे हे तिने आज मला शिकवलं.

 ------------------

लेकीच्या आणि माझ्यातल्या काही गोष्टी जमतील तशा आणि जमतील तेव्हा लिहून ठेवायचा विचार आहे. त्यातलीच ही एक तीळा एव्हढीच गोष्ट


गारूड

अद्वैताचं गारुड उतरतं आणि
सहजीवनात द्वैत असं काही नसतं हे मत,
वाटेत कुठेतरी गळून पडतं
तेव्हा,
वेगळेपणासकट सोबतीने चालण्यातली
गम्मत आत झिरपायला लागते
आणि,
सहजीवनाचा अर्थ गवसतो नव्याने पुरेपूर
हल्लीच गवसलेलं हे नवीन गारूड
आता पुरेल काही दिवस...

मंगळवार, २२ एप्रिल, २०१४

निकाल

सहजीवनाचं एक तप उलटलं
नाविन्याच्या काळात वाटणारं
अद्वैताचं गारुड हळुहळू उतरत गेलं
तरीही नात्याची गरज अजूनही शिल्लक आहे
ह्या समजुतीपाशी घोटाळावं?
कि सवयीचा भाग सारा म्हणत
गरजेचही अस्तित्व पुसून टाकावं?
तुझ्या ह्या प्रश्नाचं माझ्याकडे
उत्तरच नव्हतं
पाच पैकी कोणत्याही चार प्रश्नांची उत्तरं
लिहायचा पर्याय इथे नव्हताच, नाहीतर
नक्कीच निकाल काही वेगळा असता

सोमवार, ९ डिसेंबर, २०१३

ऍन्ड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर..

ऍन्ड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर..
ह्या वाक्यापाशी संपते "त्यांची" कहाणी.
सुरुवातीला होता दोघांच्याही घरुन विरोध.
घरात लग्नाची बहिण आहे, समाज काय म्हणेल? पासून
"हाच तुझा निर्णय असेल तर आ‌ईबाप मेले समज"
इतपर्यंत विरोध करुन पाहिला दोघांच्याही घरच्यांनी
पण ही दोघे ठाम होती स्वत:च्या निर्णयावर.
तडजोडीशिवाय आयुष्य नाही हे त्यांनाही माहित होतं पण,
आयुष्यभर् मुखवटा चढवून नात्याला फसवत जगण्यासारखं दुसरं दु:खं नाही हे ही पटलं होतं.
इन्डीविज्युअल म्हणून चांगले असलो तरी एकमेकांना कॉम्पॅटिबल नाही हे लक्षात आलं,
तेव्हा निभावून् नेण्याचं नाटक करायचं नाकारत ते वेळीच वेगळे झाले
म्हणूनच लिहिलं
ऍन्ड दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर..
ह्या वाक्यापाशी संपते "त्यांची" कहाणी.

बुधवार, १३ नोव्हेंबर, २०१३

आहे खरा इथे मी संसार थाटलेला

आहे खरा इथे मी संसार थाटलेला
थोडा हवाहवासा पण पंख छाटलेला
वाईट वाटते का माझी न राहिले मी?
प्रत्येक जण इथे जर नात्यात वाटलेला
अव्यक्त भावनांची दाटी बरीच झाली
जो आज व्यक्त झाला तो भाव बाटलेला
लिंपून घेतले मी नाही कुठे तडा ही
हा भास आत सारा होताच फाटलेला
उजळून दीप सारे गेला कुणी मनाचे
विझलाच तो, अता हा अंधार दाटलेला

का रे इतका लळा लावूनी...

हॉस्पिटलमधे डॉक्टर नवजात बाळ जेव्हा आई बाबांच्या हातात देतात तेव्हा कशा मिश्र भावना असतात ना मनामधे. आनंद, भीती थोडं नवखेपणाच दडपण, उत्सुकता सगळच एकाचवेळी चेहऱ्यावरुन.. देहबोलीतून ओसंडून वहात असतं.
तुला पहिल्यांदा बघितलं ना आम्ही तेव्हाही असच झालं होतं आमचं.
तुझ्या रहाण्याची तात्पुरती व्यवस्था करून मग अनुभवी दाई, ताई, मावशी, काका, मामा सगळ्यांना फोन करून चौकशी करून झाली. सगळ्यांकडून हे भरमसाठ सल्ले पोतडीत जमा झाले. गुगलबाबाही होताच मदतीला, त्याचीही वेळोवेळी मदत घेऊन झाली.
तुझ्या परीने तू स्वत:ला व्यक्त करत आमच्या पोतडीत दरवेळी नव्या गोष्टींची भर घालत होतास ते वेगळच.
वाट चुकून आलेला तू... तुझे सखे सोबती "सर्व्हावयल ऑफ़ द फिटेस्ट" च्या शर्यतीत कुठेतरी कमी पडले आणि उरलास तू आणि अजून दोघे. म्हणून मग तुम्ही तिघे तीन घरात दत्तक गेलात, आमच्या दृष्टीने तुमची जगण्याची दोरी प्रबळ करण्याच्या हेतूने.
पहिले आठ दिवस अगदी रूसून बसलेलास, नवीन वातावरणाशी जुळवून घ्याव की नाही? असा विचार करत होतास की काय कोण जाणे पण अन्नालाही शिवला नाहीस. आमचं बिपी सारखं वर खाली.. मग आमची वरात तज्ञाकडे, काय होतय तुला हे विचारायला. त्यांच्या कडून फ़क्त "डोन्ट वरी" हे ऐकण्यासाठी.
मग आठ दिवसांनी तुलाच आमची दया आली असावी किंवा आलिया भोगासी असं म्हणत तू तुझा असहकार तोडत व्यवस्थीत खायला लागला असावास.
अर्थात हे सारे आमचे अंदाज. काश! तुझी भाषा आम्हाला येत असती.
मग त्यातही माझी कॉलर बरेच दिवस ताठ कारण तू प्रथम माझ्या हाताने जेवलास. आणि मग पुढे महिना दोन महिना तू फक्त आणि फक्त माझ्या हातूनच जेवायचास.
आधी वाटलं हा माझा अंदाज आहे. भास आहे. मीच नेमकी भूक लागते तेव्हा असेन समोर खाणं द्यायला. मग मी प्रयोग केले. तुझ्या भुकेच्या वेळी बाकीच्यांना खाणं द्यायला लावलं. पण तू ढुंकूनही बघितलं नाहीस. बाकीचे म्हणे भूकच नसेल तुला कदाचित त्यावेळी. मग मी चार दाणे खाऊ घालून बघायचे तर पटकन येऊन मटकवायचास. एकदम लब्बाड मुलासारखा.
मग बाकीचे उगाच हिरमुसून जायचे. मग आपणहोऊन तू त्यांच्याकडून पण खाऊन घ्यायला लागलास.
तुला टब मधून बाहेर यायचं आहे.. तुला भूक लागलेय... तुला करवंटीत लपून रहायचय... तुला आता पाण्यात वाळू दगड नको आहेत पासून ते तुला आता शी होतेय इतकं सार तुझं वेळापत्रक आम्हाला कळेल अशा देहबोलीत सांगू लागला होतास.
मग कुठून तरी गुगल बाबा म्हणाला "दे फ़ील लोनली. दे नीड कंपनी" झालं आम्ही लग्गेच गुगल बाबा की जय म्हंटलं.
अनायसे कंपनी मिळायची लक्षण दिसल्यावर लग्गेच संधी साधली.
इथेच चुकलो का रे आम्ही? तरी लग्गेच तुम्हा दोघांची वेगळी व्यवस्था केली. पण तू शॉक घेतलास एकदम शांत शांत झालास.
आणि तुला दवाखान्यात नेलं आम्ही पण तू त्या आधी कायमचाच शांत झालास.
हेतू चांगला होता रे आमचा कंपनी आणण्यामागचा पण लक्षातच नाही आलं प्रत्येकाची प्रकृती निराळी.. गरज निराळी.. तुझी भाषा कळली असती तर...
पण असो उशीराने आलेल्या शहाणपणाला काहीच अर्थ नसतो.
आता तुला आपल्याच बागेत पुरलय. एक छानसं झाड तिथे लावायचं ठरवलय तुझी आठवण म्हणून. ते झाड तरी वाढूदे अशी प्रार्थना करशील?

आज्जी आणि तिच्या गोष्टी (शतशब्दकथा)

दिवेलागणीची वेळ म्हणजे शुभंकरोती, उदबत्तीचा सुगंध, आणि आजीच्या गोष्ट. रोज वेगळी गोष्ट. रामायण, महाभारतापासून जादुगारापर्यंत अगदी कुठलीही.
"आज्जी ग! खरच घडलय का ग हे रामायण महाभारत वगैरे?" मी एकदा तिला विचारलं होतं.
"मनु, ह्या गोष्टींना ना आपल्यामधे... आपल्या आजुबाजुला शोधायचं असतं, मग नाही हा प्रश्न पडत" तिने पट्कन सांगितलं होतं
तिच्याकडे जादुसारखी उत्तर मिळायची नेहमीच.
मग मी पण छांदिष्टासारखी आजुबाजुला शोधायला सुरुवात केली आणि जाणवलं घडतय की महाभारत इथेही.
इथे आंधळा धृतराष्ट्र आहे, द्रौपदीच्या वस्त्राला हात घालणारा दु:शासन आहे अगदी विटंबना मुकपणे बघणारा बघा दरबारही आहे... दिसत नाहीये तो फ़क्त द्रौपदीची लाज राखणारा कृष्ण.
ह्या कृष्णाबद्दल आज्जीला विचारायचच राहून गेलं.