रविवार, २८ ऑगस्ट, २०११

प्रवास

"रोज केर काऽढूनच मग पोतेरं घ्यायचं. बाकिच्यांकडे चालतं तसलं एक दिवस केर आणि एक दिवस पोतेरं असला प्रकार माझ्याकडे नकोऽ. उशीऽर चालणाऽऽर नाही. आणि सारख्या दांड्या पण मारायच्या नाहीत. एखादवेळी लागलीच रजा घ्यायला तर आधी सांगून घेतली तर चालेल, अचानक घ्यावी लागली तर फोन नंबर दिलाय तुला, त्यावर एक फोन करुन तरी सांगायला हवं" मी आधीच्या सगळ्या कार्यानुभवातून शिकलेलं ग्यान पणाला लावत तिला ऐकवलं.

सगळ्या कामवाल्या बाया काम मिळेपर्यंत ज्या खालमानेने सगळ्या सुचनांना होकाराची मान हलवतात तसच तिनेही केलं.

"नाव काय म्हणालीस तुझं?"

"प्रगती" तिने माझ्याकडे न बघताच उत्तर दिलं.

"अरे बापरे! प्रगती?" मी मनातल्या मनात वैतागून म्हंटलं. माझं नाव लग्नात बदलू दिलं नाही आणि आता कामवालीचं नाव मालकिणीच्या नावाशी साधर्म्य साधतं ह्या कारणाकरता बदलायची प्रथा नाही.

पण करणार काय? गरज.. "तिला कामाची" आणि "मला कामवालीची" ह्या एका गोष्टीने आम्ही एकमेकींशी जोडून घ्यायचं ठरवलं आणि ती आमच्या घरात प्रवेशकर्ती झाली.

"प्रगतीऽऽ, अगं वाजले किती? आटप लवकर. दप्तर कुठेय मनुचं?" ह्याच्या प्रश्नावर आम्ही दोघींनीही एकाचवेळी चमकून बघितलं.

सुरवातीचा हा महिना "कोण, कोणासाठी, काय म्हणाले" ह्यावर गोंधळ उडण्यात खर्ची पडण्याची सुरवात झाली होती. त्यातून ह्याने "प्रगती" अशी मला जरी हाक मारली तरी ती बिचारी लाजून गोरी मोरी व्हायची. मग आम्ही एक पॅक्ट केला. ह्याने निदान ती काम करत असताना मला "आई" म्हणायचं आणि तिला "ओऽ बाई" म्हणून हाक मारायची.

पहिला महिना बरा गेला. म्हणजे तिने सबंध महिन्यात एकही खाडा केला नाही की उशीर केला नाही. बाई कामालाही तशी बरी होती. कोणी एकलं तर नजर लागायची नेमकी पण होती खरी चटचटीत. आमच्या घरापासून १० मिनिटावर असलेल्या झोपडपट्टीत रहायची. रोज अंघोळ करुन स्वच्छ साडी नेसून यायची. त्यामुळे बरं वाटायचं. नाहीतर आधीची बाई. माझ्या घरातले कपडे धुवायचे साबण दिले तिला तरिही एक विशिष्ठ दर्प यायचा तिच्या कपड्यांना. आणि त्या वासाने सगळच ढवळून निघायचं... आतपासून.

तो वाऽऽस.. पुन्हा एकदा "टाईम मशीन" ने मागे नेत नेत मला ह्या सार्‍या प्रवासातल्या काही अप्रिय घटनांची नेमकी आठवण करुन द्यायचा. माझ्यापाशी सोयीने नोंदी आठवायचं टुल असायला हवं होतं असं मला नेहमीच वाटयचं.

आधीची बाई गेली आणि तिच्या बरोबर तो चिरपरिचीत वासही गेला. त्याबरोबर त्या आठवणीही पुसट झाल्या. आता ही प्रगती बाई बरी आहे.

घड्याळात बघितलं तर तिची यायची वेळ उलटून तब्बल २० मिनिटं झाली होती.

"काल पगार घेऊन गेलेय.. आज आता येते की नाही ही बया? संपले की काय नव्याचे नऊ दिवस हिचे?" असे अशुभं विचार मनात येतच होते तोच ती गेट उघडून आत येताना दिसली.

"पोरीच्या शालत गेल्ते म्हनुन उशीर झाला" तिने आल्या आल्या स्पष्टीकरण देऊन टाकलं.

"बरं" असं नुसतं मानेनेच दर्शवून मी तिला आधी देवघराचा केर काढून घ्यायला सांगितलं.

ती व्हय म्हणून पण तिथेच घुटमळली तसं तिला मुद्दामच कपाळाल्या पुरेशा आठ्या घालून विचारलं "काय?"

"ताई, जुनी छत्री असल तर द्याल का मला. पोरांच्या शालच्या फिया, बुकं नी रेनकोट घेन्यातच पैशे संपले बगा. राशन पण भरलं कालच" तिने मान खाली घालूनच माझ्या "काय" ला उत्तर दिलं.

"बघते" असं मोघम उत्तर देऊन मी संभाषण तोडलं.

खरतर मी देऊ शकते माझी जुनी छत्री तिला. मी काढून पण ठेवलेय आधीच एक छत्री तिला द्यायची म्हणून, तिने सांगायच्याही आधीच. पण काय होतं माहित्ये का, एकाच वेळी ह्यांच्या अशा परिस्थितीची दया येते आणि बोट दिलं तर हात तर घेणार नाहीत ना आपला अशी शंकाही मनात उठते.

झोकून देऊन तळागाळातल्याशी समरस होऊन समाजसेवा वगैरे पुस्तकात वाचताना, थोरा मोठ्यांची उदाहरणं ऐकताना भारावून जायला होतं पण प्रत्यक्ष आचरणात आणणं जमत नाही. दरी रहातेच किंवा राखली जाते आणि अंतर राखून होईल तेव्हढी मदत केली जाते.

"ही घे छत्री. ह्यावेळी नेमकी आहे म्हणून देतेय हं मी" मी मुद्दाम सावधपणा अंगात बाणवत तिला म्हंटलं.

"आणि ही थोडी जिलबी बांधून ठेवलेय ती पण घेऊन जा मुलांसाठी. आज रक्षाबंधन म्हणून आणलेय घरी. तू पण इथेच घे एखादी खाऊन. घरी काहीच उरणार नाही तुला" मी तिला म्हंटलं, तसं तिच्या डोळयात पाणी तरळलं.

"काय झालं ग?" म्हंटलं हिला आवडलं नाही की काय असं जिलबी घेऊन जा सांगितलं ते असं वाटून घाबरतच विचारलं.

"ताई, माझा उपास हाय आज."

"माजा भाव मी लहान अस्ताना गेला ह्याच दिशी. म्हनून मी गोडाचं कायबी खात नाय आजच्याला. मला तर त्यो आटवत पन नाय पन आय साटी करते मी उपास"

"अरे बापरे! गेला म्हणजे? काय झालं होतं त्याला?"

"मारला त्याला. आमच्या झोपडपट्टीत भांडाण झालं त्यात मारामारी होऊन ग्येला त्यो."

"मऽग! ज्यांनी मारलं त्यांना शिक्षा नाही झाली?" माझं मध्यमवर्गिय कायदेकानुन पाळणारं मन लग्गेच म्हणालं.

"नाही ताई, बाप नव्हता आधीच. आई शाळेच्या बाईंना मदत करायची. लोकांच्या घरची कापडं धुवायची आन भांडी घासायची. मी लहान व्हती. मोठी जाल्यावर आयला इचारलं तर म्हनली जायचा त्यो ग्येला. आपून काही केलं असतं तर त्या लोकान्नी तुलाबी ठेवलं नसतं नी मलाबी. त्यापरीस शांतीने जिंदगी घालवू इथ."

"अग पण असं कसं? तो खून होता ना!" खून शब्द उच्चारतानाही मला घाम फुटलेला.

"कसला खून नी कसलं काय ताई. आय म्हनायची त्यो आधी दारु पियाचा बापा सारखाच. बाईंनी बोलून त्याची दारु कमी केली. त्याला कामाला लावला. पण डोस्क फिरलं शालेवरनं आनि पुन्ना पिऊन आला. मंग मारामारी झाली नी त्यात ग्येला त्यो. त्यो गेला तवा मी पाच सा वर्साची असन"

"दारू प्यायचा? अगं पण लहानच असेल ना तेव्हा तो वयाने?"

"आमच्या इथं १२ वर्षाचं पोरगं पन पितय, ताई."

"बाऽपरे! बरं कुठे रहायचात तुम्ही प्रगती?"

"लायनी पल्याडला."

"लायनी पलिकडे कुठे?" मी श्वास रोखून विचारलं. पुन्हा एकदा तो वास मेंदूला त्रास द्यायला लागला होता. "ही तिच तर नसेल?" हा विचार झटकून वर्तमान काळात परत यायला खुप प्रयास करावा लागला.

"काय नीट आठवत नाय आता. आमी दोगीबी ती जागा सोडून मामाकडे जाऊन ऱ्हायलो मंग. भावाच्या जल्मा नंतर झालेली समदी पोरं जगत नवती. मीच तेवढी जगले. त्यात त्यो पन ग्येला असा, मंग आमी दोगीच ऱ्हायलो. माज्या आयला मला शिकवायची हुती पन मामा झाला तरी परक्याचच घर ना! मंग काय ती मला शालत घालनार. पन मी आता माझ्या मुलांना शिकीवनार. माज्या सारकं माज्या लेकीचं लगीन लवकर नाय करनार" ती बोलतच होती.

"ताई, उद्याच्याला मी काम करुन जाईन. पन परवाच्याला मला एक दिस सुट्टी मिलाली तर....."

"माज्या घराशेजारचीच झोपडी घेतली धा हज्जारला आनी आता आयला मामाकडनं घेऊन ईन इथे र्‍हायला. म्हन्जे तिची कालजी नाय लागून र्‍हानार मला"

"तुझ्या नवर्‍याला चालेल का तू असं तुझ्या आईसाठी खर्च केलेलं?" माझ्या मनात उगाचच एक शंका चुटपुटली.

"न्हाय, आदी नवता तयार. पन त्येला आय बा कोनच नाय. मंग आय र्‍हायली शेजारलाच की मंग पोरांची बी कालजी नाय ना मला. तिच्या माग ती झोपडी माजीच तर हाय. ह्ये सांगितलं तवा जाला तय्यार"

मला तिच्या रडत न बसता मार्ग काढणार्‍या ‍आवृत्तीच खरच कौतूक वाटलं.

"परवा म्हणजे १५ तारखेला ना? मग ठिक आहे. पण १६ ला कामावर पाहिजेस ह मला तू" मी उदार मनाने तिला एक दिवसाची सुट्टी देऊन टाकली.

"ताई, तुमी किती मायेने इचारता. बाकी कोन बी असं बोलत नाय बगा" ती म्हणाली खरी पण माझी आतली "अंतर राखणारी नजर" मलाच हसल्यासारखी भासली.

"प्रगती, ह्या बायकांचं लाईफ वेगळं आपलं वेगळं. जास्त खोलात शिरायचं नाही आणि जास्त जवळिक दाखवायची नाही." आतल्या मध्यममार्गी विचाराने थोड्याश्या खळबळ माजलेल्या मनाला झापत म्हंटलं आणि मी पुन्हा एकदा त्या वासाला आणि त्यामुळे दरवेळी वर येणार्‍या कटू आठवणींना हद्दपार करत कामाला लागले.

तिच्या आईची भेट घेऊयात एकदा कधीतरी हे मनात आलं खरं पण हे सगळं आईला सांगावं का नाही ह्या विषयी मात्र पटकन निर्णय होईना. शेखरच्या हाक मारण्याने विचारांची साखळी तुटून मी पुन्हा वर्तमान काळात आले.

"शेखर तुला लक्षात आहे ना मी आपली जेवणं झाली की आईकडे जाऊन येणार आहे ते? पिल्लूला घेऊन जाणारे आणि रात्री परस्पर जेवून येणार मग मी. तुझं जेवण केलेलं आहे ते घे गरम करुन" मी जाण्याची तयारी करत करतच त्याला आठवण करुन दिली.

अंगावर येणारं नारळीभाताचं जेवण जेवून आईकडून पुन्हा निघायची वेळ झाली तेव्हा पिल्लू पार पेंगुळलेलं.

"प्रगती, आता विनयची बॅंगलोरची नोकरी पक्की झाली तो येत्या आठवड्याभरात जाईल तिथे. मग पुन्हा घरात मी आणि तुझे बाबा दोघेच असू. झेपतय तो पर्यंत तरी तुम्हा दोघांपैकी कोणाकडेही येऊन रहणार नाही आहोत आम्ही. लागलं सवरलं तर तुम्ही आहातच पण झेपतय तोपर्यंत राहू आम्ही ह्याच मठीत."

"अग! पण..."

माझं वाक्य अर्ध्यावर तोडत ती म्हणाली "प्रगतीऽऽ ऐकून तर घे आधी. तू रहातेस पलिकडे. हा जाणार बॅन्गलोरला. माझ्याकडे आता रिकामा वेळ भरपूर आहे. त्या साठे बाई भेटलेल्या परवा. त्याच म्हणाल्या "आता मोकळ्या आहात तर करा की परत सुरु शाळा"

"पुन्हाऽऽ शाळा?" मला पुन्हा एकदा त्या वासाने गुदमरायला लागलं.

पुन्हा एकदा टाईम मशीन टिकटिकायला लागलं... तेव्हा मी असेन ७ वी ८ वीत. आईची घरातली शाळा बंद होऊन बराच काळ लोटलेला. आम्ही दोघेही आता तसे आपलं आपलं करण्या इतपत मोठे झालेलो, म्हणून मग आईने काही समविचारी बायकांना बरोबर घेऊन घराजवळच्या झोपडपट्टीत शाळा सुरु करायचं ठरवलं.

"प्रामाणिक पणे काम केलं की सगळं मार्गी लागतं ग" आई भाबड्या विश्वासाने आणि कामावरच्या श्रद्धेवर विसंबून म्हणाली.

आणि त्याच भाबड्या विश्वासावर विसंबून संस्था रजिस्टर करणं, तिथल्या लोकांना समजावून एका एका गोष्टीला तयार करणं सगळं एका लयीत चालू झालं.

"आईऽ हे काऽय आज पण नुसतीच शिकरण पोळी?"

"आजच्या दिवस..., काल संस्थेच्या रजिस्ट्रेशन संबंधी ठाण्याला चकरा मारुन पाय नुसते तुटले माझे. एकदा हे काम मार्गी लागलं ना की मग मी मोकळी होईन बघ. मग फक्त शाळा आणि घर. बाकीचं काऽऽही बघावं नाही लागणार जास्त"

"तुझ्या संस्थेत तू एकटीच आहेस का? तुच का दरवेळी पुलंचा नारायण व्हायचस? मग खजिनदार, सेक्रेटरी मंडळी काय करणार?" मी माझा राग व्यक्त करत विचारलं.

"होत्या की ग सप्रे बाई काल माझ्यासोबत" तिने गुळमुळीत उत्तर दिले.

"होत्या पण तुझ्या ४ खेपा एकटीने झाल्यावर एक खेप घालतात त्या तुझ्यासोबत." पुन्हा एकदा माझी धुसफुस अशी बाहेर पडली.

"तुला पिठलं देऊ का टाकून पटकन?" आईला वाटलं ह्या नादात आमच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होतं म्हणून फक्त मला राग येतोय.

"काही नक्को, मी लावलाय कुकर." मी कुरकुरतच तिला म्हंटलं.

आईची शाळा काय अशी लगेच सुरु होण्यातली नव्हतीच, पण नेमका एका राजकीय पक्षाने मतांसाठी का होईना पुढाकार घ्यायचं ठरवलं आणि एका शुभमुहुर्तावर एका रिकाम्या झोपडीत आईची शाळा सुरु झाली.

सुरुवातीला आई घरी आली की एक विशिष्ठ वास यायचा तिच्या कपड्यांना. मग आम्ही तिला "ए तुझ्या शाळेच्या साड्या डेटॉल मधे धू ग बाई" असं म्हणायचो.

"शाळेत जाऊन आलीस की मगच कपड्यांना हा वास येतो. ईऽऽ ग बाई कशी जातेस तिथे तू?" आम्ही अगदीच दुसऱ्या दुनिये विषयी बोलावं तसं बोलायचो.

तिथल्या मुलांचे शेंबडाने भरलेले नाक पुसण्या पासून ते मुलींच्या डोक्यातील उवा काढून तेल लावून वेणी घालून देण्यापर्यंत त्यांना नागरी बनवण्याचे हरएक प्रयत्न तिने केले.

"आई, चल जेवून घेवुयात आता. पुरे ना तुझं ते काम"

"येव्हढी यादी करते पुर्ण मग बसते. तू घे जेवून"

"अनौपचारिक शिक्षण योजना आहे ना सरकारची त्याकरता ह्या याद्या द्याव्या लागतील तिथे"

"कशाला? गेल्यावेळसारखच काम झालं... मानधन सुरु झालं की तू कोणा तरी गरजूला तिकडे लावणार आणि पुन्हा दुसऱ्या कामाला जुंपून घेणार. आपण पण काय टाटा बिर्ला आहोत काय? पैसे नको घेउस एकवेळ पण केल्या मेहनतीचं क्रेडीट तर घे"

"कोणी तरी नाही गं ती शेवंता बाई आहे. तिथेच रहाणारी. दहावी नंतर लगेचच लग्न करुन दिलं आणि शिक्षण थांबलं तिचं. तरी तिथे तिच एक शिकलेली आहे. माझ्या सांगण्यावरुन तिने मॉंटेसरीचा कोर्स पण पुर्ण केलाय. मग नको का तिला संधी द्यायला?"

"आणि हे अनौपचारीक योजनेचं काम करतेय की मी. ती लहान मुलांचे वर्ग घेते मी मोठ्या वयाच्या मुलांना शिकवून म्युनसिपल स्कूल मधे जाण्या इतपत तयार करेन. जमलं तर पुढे मागे प्रौढ शिक्षण आणि महिलांसाठी शिवणकाम पण सुरु करायचय" तिने एकामागोमाग एक कामांची जंत्री सांगायला सुरुवात केली आणि मी तिला कोपरापासून हात जोडत ताटं घ्यायला सुरवात केली.

"आजची तुमची मिटिंग त्या सप्रे बाईंच्याच घरी घे ना. माझी परिक्षा सुरु होतेय उद्या पासून."

"अगं ह्या मिटींगला "तिथली" पण दोन चार माणसं येतात. सप्रे बाईंच्या घरी नाही चालत बाई..." तिने तिचा नाईलाज माझ्यापुढे मांडला

"अगं पण आपली एकच खोली आहे. मी अभ्यास कुठे करु मग?" मी देखील माझी कुरकुर पुरेशी व्यक्त केली.

"बरं मिटींग शाळेतच ठेवते, तू कर अभ्यास" तिने तिच्या परिने तोडगा काढला.

एकीकडे आई करत असलेल्या कामा विषयी अभिमान आणि आदर तर दुसरी कडे आम्हाला कराव्या लागणाऱ्या तडजोडींमुळे आणि नासमज वयामुळे झालेली धुसफुस. इतरांनी नुसतच क्रेडीट घ्यायला येणं आणि हिने नुसत्याच लष्कराच्या भाकर्‍या भाजत रहाणं हे सगळं जसच्या तसं आठवलं आज पुन्हा.

हे आठवलं तसच मी पहिल्यांदा तिच्या बरोबर तिच्या शाळेत गेले तो दिवसही डोळ्यासमोर स्पष्ट उभा राहिला.

"मला तुझी शाळा बघायचेय". मी तिला म्हंटलं आणि ती प्रचंड खुष झाली

पण तिथे त्या तिच्या शाळेच्या परिसरात पाय ठेवला आणि पहिल्या प्रथम तो वास भस्सकन नाकात घुसला आणि तेव्हापासून तो वास आणि ती जागा ह्यांचा एक घट्ट संबंध डोक्यात पक्का झाला.

"हि बघ ही पण एक प्रगती" आईने एका तान्ह्या बाळाला माझ्यापुढे धरत म्हंटलं.

"तिने तुझ्यासारखं शाळेत जावं मोठ्ठं व्हावं म्हणत ह्या काळुबाईने हिचं नाव पण प्रगती ठेवलं." माझी आई कौतूकाने म्हणाली आणि तिच्या आईने भक्ताने देवाकडे बघावं तसं बघत मान डोलावली.

तिची आई माझ्या आईची मदतनीस. स्वत: अंगुठे बहाद्दर आणि दारुड्या नवऱ्याचा त्रास सहन करणारी सोशीक सिंधू. पण मुलांनी शिकून मोठं व्हावं असं मनापासून वाटणारी तुमच्या आमच्या सारखीच एक आई. नवर्‍याच्या बरोबर १२ वर्षाच्या मुलालाही दारुची सवय लागली म्हणून कळवळणारी आई. ह्या उप्पर माझ्या मेंदूत तिची अशी वेगळी ओळख असण्याचं काही कारणच नव्हतं.

बाईंची मुलगी म्हणून लोकं माझ्याकडे वेगळ्या आदराने बघत होते. त्यानंतरही एक दोन वेळा तिच्या शाळेत जायचा योग आला. दरवेळी तो वास मात्र नकळत नोंदवला जायचा मेंदूकडून.

"राजकारणाशी आपलं काही देणं नाही नी घेणं नाही. आपण आपलं काम करावं" असं आई म्हणायची नेहमी.

"माझी मुलं आता बरीच सुधारल्येत. शिकून बाहेर पडतील बघ ती ह्यातनं एकदिवस." ती त्या मुलां विषयी बोलताना नेहमी म्हणायची.

आपण राजकारणात पडायचं नाही हे ठिकच आहे पण राजकारणात कोणी कोणाचा नसतो हे त्या बदलाची झळ लागेपर्यंत तिला कळलच नाही.

जागा वाटपाच्या मुद्यावरुन ताणाताणी झाली आणि एका रात्री दुसऱ्या एका पार्टीने तिथल्या नेत्याला तिकिट देऊन आपलसं केलं. तिथल्या तिथे दोन गट पडले. दोन वेगवेगळ्या रंगांच्या झेंड्यांनी हद्द आखली गेली. "पार्टी" देऊन माणसं राखली गेली तसच "पार्टी" देऊन ती फोडलीही गेली.

ह्यासगळ्यात "शाळा" हा मुद्दा गौण ठरला आणि शाळा कोणाची हाच मुद्दा ऐरणीवर आला. आधीच "पार्टी" मुळे तर्र झालेल्या मंडळींची बाचाबाची झाली आणि "मी बगतो कोन नाय शाला उघडू देत त्ये" असं म्हणून शाळेचं कुलुप काढायला निघालेल्या काळुबाई गुंजाळच्या गणेशचा हकनाक बळी गेला.

काळूबाई लहानग्या प्रगतीला घेऊन उर फुटेस्तोवर रडली.

पण "नग बाई पोलीस कंप्लेट. ग्येला त्यो ग्येला. आहोत त्येस्नी जगाया पायजेल" असं म्हणून तिचा मार्ग निवडून मोकळी झाली.

आईला मात्र "शाळा ती चालवायची म्हणजे कळत नकळत तिच्या मुळे झालं हे सगळं" असा सल टोचत राहिला तसा काहीएक संबंध नसताना.

ज्याने मारलं तो ही आईच्याच हाताखाली शिकलेला आणि जो गेला तो ही तिचाच एक विद्यार्थी. हा धक्का तिच्यासाठी फार मोठा होता.

त्यानंतर किती तरी दिवस... महिने... वर्ष गेली आईलाही ह्यातून बाहेर पडायला. शाळा तर बंदच झाली कधीचीच पण त्या शाळेची आठवण देखील तिच्यासाठी त्या दिवसाची आठवण घेऊन यायची. आमच्या साठीही तो सगळा काळ फारच कठीण गेला.

तिचं आमच्याकडे थोडं फार दुर्लक्ष झालं तिच्या कामामुळे तरी चालेल, तिने पायाला भिंगरी लावून लष्काराच्या भाकऱ्या भाजल्या ते ही अजिबात क्रेडिट न घेता तरिही चालेल एकवेळ. अगदी पुलंचा नारायण व्हायचं ठरवलं तरिही चालेल पण अशी आत्मविश्वास हरवलेली स्वत:लाच मनातल्या मनात कोसत रहाणारी आई पहाणं... ह्यासारखं दुर्दैवं नाही. १५-१६ च्या वयात आईची आई व्हाव लागणं म्हणजे काय हे जो त्यातून जातो तोच समजू शकतो.

म्हणूनच दरवेळी ती शाळा म्हंटली की ती आठवण आणि तो वास म्हंटलं की ती शाळा हे समिकरण डोक्यात इतकं घट्ट रुजलं की मग कुठुनही तो वास आला की डोक्यात "आईच्या शाळा कालखंडातल्या" नको त्या आठवणी पिंगा घालायला लागायच्या.....

आणि आता आई म्हणतेय "साठे बाई भेटल्या आणि पुन्हा शाळा सुरु कर म्हणाल्या..."

"पुन्हा शाळाऽऽ...?" मी माझ्याही नकळत अस्वस्थ होत तिला विचारलं.

"नाही ग, आता काय वय आहे का इथून तिथून धावपळ करायचं? शाळा नाही पण मी शिकवण्या घ्यायचं ठरवलय. म्हणजे झेपतील तितक्याच घेणार आहे मी. पण फि नाही घेणार, जे गरिब आहेत ज्यांना बाहेरचे क्लास परवडत नाहीत अशांच्या मुलांच्या शिकवण्या घेईन म्हणते."

"साठे बाई म्हणत होत्या, की "...." पक्षाची जागा देते तुम्हाला शिकवण्यांसाठी हव तर आपल्या इथल्या नगरसेवकाला सांगून"

"मग तू काय म्हणालीस?" मी पुन्हा अस्वस्थ..

मी म्हंटलं त्यांना "नको ते राजकारण, आणि नको तो पक्ष बिक्ष. माझ्याच घरात जमेल तेव्हढं करेन मी"

"खरय..पक्ष आला की राजकारण आलं आणि राजकारण आलं की राजकारणी मंडळी पण आली. त्यांची असेल कातडी गेंड्याची पण आपल्याला..." माझा श्वास त्या घटनेच्या आठवणीने असा काही अडकला की मला पुढे बोलवेचना.

"खरय तुझं.." तिने माझ्या हातावर थोपटत म्हंटलं.

"आई, तुला काळूबाई गुंजाळ आठवतेय का ग?"

"कशी नाही आठवणार? बिचारी तिच्या बाबतीत फारच वाईट झालं पण. आज का आठवली तुला ती अचानक?"

"नाही गं.. काही नाही असच, कुठे असते ग आता ती? काही कल्पना?" मी माझ्या नव्या कामवाली बद्दल जे वाटतय ते बोलावं का बोलू नये ह्या संभ्रमात तिला विचारलं.

"तिच्या मुलाचं तसं झालं आणि ती मुलीला घेऊन तिच्या भावाकडे निघून गेली. नंतर माझही मन उडालं त्या शाळेतून. काहीच ठिक वाटेना. दोन्ही माझीच मुलं गं. माझ्याच हाताखाली शिकलेली. अशी कशी...." आईला पण कढ आवरेना.

खपलीच्या आतली जखम अजुनही थोडी ओलीच आहे तर. फार मेहनतीने प्रयत्न पुर्वक तिला बाहेर काढलय आम्ही सगळ्यांनी ह्यातून आणि आता नुसत्या आठवणींनीही तिला त्रास होणार असेल तर आत्तातरी "प्रगती" विषय नको नंतर कधी तरी बघू असं मी माझ्याच मनाशी ठरवून टाकलं.

"म्हणून मी नको म्हणते गं आता पुन्हा तो पसारा.." मी आईच्या हातावर हात ठेवत तिला म्हंटलं.

"आता काय पसारा घालतेय मी नव्याने? आता आवरायचे दिवस सुरु झालेत. हे आपलं जमेल तेव्हढं घरात बसून होण्यासारखं वाटलं म्हणून करुन बघावं म्हंटलं"

"असं का बोलतेस अगदी? तुझी काळजी वाटते म्हणून बोलते ना मी? कर बाई कर काय करायचं ते पण जरा स्वत:ला सांभाळून कर म्हणजे झालं" मी तिच्यापुढे हात टेकत म्हंटलं.

मधली पाच दहा मिनिटं नुसतीच चुळबुळ करण्यात गेली.

"चल जरा बागेत" शांततेचा भंग करत मला पुन्हा एकदा मुड मधे आणत विषय बदलायचा म्हणून तिने मला बागेत नेलं.

"बरीच नविन रोपं लावलेली दिसतायत ह्यावेळी." मी पण ठरवून विषय बदलत म्हंटलं

"अरेच्चा! इथला मनी प्लॅंट काय झाला गं?" मीच आणुन लावलेला म्हणून मला बरोबर आठवत होता तो.

"आणि हे जाईचं रोप ना गं, गेल्या पावसात लावलेलं. इतके दिवस मला वाटलेलं गेलच ते. मस्त पालवी आलेय ग त्याला पुन्हा."

"मनी प्लॅन्ट ना काढून टाकला मी, वाढतच नव्हता."

"कुठेही वाढतो ना पण तो?"

"हो गं पण नाही वाढला खरा. मग काढून टाकला. ही बघ त्याच जागी ही तुळस लावलेय. तुझं जाईचं रोप जातं जातं वाटलं तरी तगलं. आता पालवी फुटलेय त्याला. पुढच्या वेळी येशील तेव्हा गजरा पण घालशील.."

"काय केलस? खत बीत घातलस काय त्याला वेगळं?"

"मी काय करणार अजून वेगळ? बाकीच्या झाडांना घालते तसच ह्यालाही पाणी.. खत घातलं. ते नाही जगलं हे जगलं.... " तिने माझ्यासाठी बाजूला काढून ठेवलेलं कृष्ण तुळशीच रोप माझ्या हातात देत म्हंटलं

"तू देत्येस खरी ही तुळस. पण जगेल का माझ्याकडे? गेल्यावेळची जळून गेली नुसती.."

"ही घेऊन जा. मग बघू. नाही तगली तर परत लावू" ती म्हणाली

"ह्म्म! खरय..." रोप लावायचं सोडायचं नाही... एका क्षणात हा विचार चमकून गेला आणि इतका काळ अडकलेला श्वास अचानक मोकळा झाल्यासारखा वाटला.

























































बुधवार, ६ जुलै, २०११

अडाण्याचा गाडा (आधार कडून साभार)

आमच्या तात्याने (तात्या म्हणजे आमच्या ऑफिसचा हेड माणूस) "सोशल रिस्पॉन्सिबिलिटी" ह्या नावाच्या विषयावर आम्हाला आमचा चहा थंडं होऊन त्याचं कोल्ड ड्रिंक मधे रुपांतर होईपर्यंत (ह्यात अजिब्बात अतिषयोक्ती अलंकार वापरलेला नसून ते एक दुर्दैवी सत्यवचन आहे) व्याख्यान दिल्याने आमच्या समोर पाण्यात उडी मारण्यावाचून गत्यंतरच नव्हतं. तसं केलं नसतं तर विकांता नंतरचा सोमवार पुन्हा एकदा अमृत तुल्य चहा नावाचं शीतपेयं पिण्यात घालवावा लागला असता शिवाय आमचा पुन्हा एकदा तास दोन तास खडा पारशी झाला असता ते वेगळच.

गेल्या वेळी त्याने "मतदान केलच पाहिजे" ह्या विषयावर बौद्धिक घेतलं होतं पण एकाच वेळी साईट विझिट ती ही परगावची आणि आमच्या गावातलं मतदान कसं करायचं हे मात्र सांगायचं शिताफीने टाळलं होतं. नाही मतदान हे केलच पाहिजे हे आम्हालाही मान्य आहेच आणि ते आम्ही करतोच करतो पण त्यात्याचं व्याख्यान इतकं कशाने तरी भारलेलं असतं ना की आम्हाला नेहमी वाटतं वोटर्स कार्डची योजना राबवणार्‍या आणि आमच्या सारख्या सामान्य माणसांचे कार्ड चुकीचे छापणार्‍यांना एकदिवस तरी तात्याचं व्याख्यान ऐकायला लावलं पाहिजे.

ह्यावेळी त्याला व्याख्यान द्यायला "आधार कार्ड" चा आधार मिळाला होता. त्यापायी आमच्या शुक्रवारचा त्याने बट्ट्याबोळ केला होता. त्याच्या समोर "नो आर्ग्युमेंटस" त्यामुळे आम्ही "होयबा होयबा" चा गजर करत होतो आणि तो "टाईम्स ऑफ इंडीया" मधली जाहिरात दाखवून आम्हाला "सी हाऊ इझी थिस ऑल प्रोसिजर इज. डाऊनलोड द फॉर्म, टेक प्रिंट आऊट्स एन्ड गेSट इSट डSन - धीSस विकेंड. आय विल आस्क अबाउट धिस इन अवर मन्डे मिटिंग. टेक प्रिंट आऊटस फॉर मी अल्सो" असं एकेका शब्दावर जोर देऊन बोलत होता

"तुम्ही हे आत्ता पर्यंत केलेलं असेल अस मी समजत होतो. विकेंडस फक्त मजा मस्ती करण्यासाठी नाही देत कंपनी तुम्हाला. ही असली सामाजिक जबाबदारीची कामं पण करायची असतात वेळ काढून" वगैरे वगैरे चाऊन चोथा झालेलं वाक्य ऐकवून "नाऊ गो टू योर टेबल" म्हणत दम भरत आम्हाला गारढोण चहा प्यायला आमच्या डेस्कांवर पिटाळण्यात आलं.

वास्तविक गेले दोन्ही तिन्ही विकांतं तो त्याची कौटुंबिक जबाबदारी पार पाडत कुठेशी दूर देशी कडमडलेला आणि जाताना डेडलाईनची धमकी आम्हाला देऊन आमच्या प्रत्येक विकांतावर घाला घालून आम्हाला मात्र घाण्याला जुंपून गेलेला. जळ्ळा ही जाहिरात त्याच्याच कृपेने हाफिसात येणार्‍या पेपरात गेल्या आठवड्यातच वाचलेली आम्ही. ते फॉर्म पण डाऊनलोड करुन प्रिंट काढून रेडी होते. पण सायबाला कधी आपण त्याच्या आधी केलेली हुषारी दाखवून दुखवू नये हे तत्व वेळीच जाणल्याने आम्ही आपले "होयबा तुचबा खराबा" असं म्हणत बुगुबुगु करत पुढचा अर्धा तास गेल्या विकांतालाच डाऊनलोड केलेला फॉर्म तुमच्या सांगण्या बरहुकूम डाऊनलोड करतोय असं दाखवण्यात खर्ची घातला. आणि प्रॉम्प्ट्पणाची शाबासकीची थाप पाठीवर पाडून घेतली.

सोमवारला पुन्हा एकदा तो हा विषय छेडणार म्हणून विकांताला अगदी ठरवून ते काम करायचं पक्क केलं. त्याप्रमाणे भल्यापहाटे उठून सगळे डॉक्युमेंटस घेऊन एक सेंटर गाठलं. घड्याळात वाजले होते सकाळचे ९.३० म्हणजे आता युं युं म्हणत चुटकी सरशी काम करुन आपण मोकळे होऊ असं वाटून रांगेतल्या लोकांच्या "एऽ एऽऽ लाईन दिसत नाही का रे" म्हणणार्‍या गर्दीला न जुमानता चौकशी खिडकी शोधायचा प्रयत्न केला.

फॉर्म घेण्यासाठी असलेल्या रांगेकडे तु.क. टाकत आणि माझ्या हातातले आधीच भरलेले फॉर्म नाचवत गर्दीतून वाट काढत एकदाची खिडकी शोधण्यात यशस्वी झालो. चला म्हंटलं संघर्ष संपला. विकांत साजरा करायला आपण १०-१५ मिनिटात मोकळे. पण कसचं काय त्या खिडकीतल्या माणसाने माझे फॉर्म बघायचेही कष्ट न घेता तोंडातला गुटखा चघळत चघळत आणि त्याच्या त्या स्पेशल वासाने आम्हाला वांतीची उबळ आणत "हे इथे नाही चालायचे. आम्ही फक्त ह्याच सेंटर वरुन दिलेले फॉर्म ऍक्सेप्ट करतो" म्हणत मला फॉर्म सकट तु.क. टाकून बाजुला केलं.

"अहोSS पSण पेपर मधे तर पानभर जाहिरात आलेय छापून, चालेल म्हणालेत पेपरवाले नेट वरुन डाऊनलोड केलेला फॉर्म" असं म्हणायचा एक निष्फळ प्रयत्न करुन बघितला.

"पेपर मधे चालेल म्हनलय तर तुम्ही पेपरवाल्यांनाच विच्चारा. माझा टाईम नका वेस्ट करु. नेक्स्ट" असं म्हणत मला चक्क हाकलून लावलं.

"उद्या कधी येऊ मग साहेब?" असं जरा त्याला साहेब म्हणून हरभर्‍याच्या झाडावर चढवून विचारलं तर म्हणे "या ९ वाजता. ९.३० पर्यंत आम्ही काम सुरु करतो. ५० फॉर्म देतो एका दिवशी. रेशन कार्ड घेऊन या. तुम्हाला एक फॉर्म मिलेल मग तुम्ही फॅमिलीसाठी झेराक्स घ्या करुन"

"अहो पण झेरॉक्स चालत नाहीत ना?" मी उगाचच माझं तुटपुंजं ज्ञान पाजळत विचारलं.

"कोण म्हऽन्तं, आमच्या इथे चाल्तं" त्याने एका वाक्यात माझ्या ज्ञानाला मोडीत काढत मलाही मोडीत काढलं.

ठिक आहे ठिक आहे तू नही तो और सही असं मनात म्हणत आम्ही मोर्चा दुसर्‍या सेंटर पाशी वळवला. तिथेही नेटवाले फॉर्म चालणारच नव्हते. शेवटी "उद्या सकाळी नवालाच या आणि फॉर्म घ्या" असं म्हणून आमची बोळवण करण्यात आली.

दुसर्‍या दिवशी रविवारचा "बाजार" सोडून मोर्चा त्या सेंटर पाशी न्यावा लागणार ह्या विचारानेच मी हैराण झालो. करतो काय जावं तर लागणारच होतं नाहीतर पुन्हा एकदा सोमवारच्या मिटींग मधे आमचा उद्धार झाला असता.

रविवारची झोपमोड सहन करुन गेलो त्या "नवालाच या" म्हणणाऱ्या ठिकाणी. चुकून सिद्धिविनायकाला तर आलो नाही ना असं वाटून गेलं ती रांग बघून. पण नाही ती रांग त्या दिव्य आधारासाठीच होती हे लक्षात घेऊन आम्हीही रांगेत उभे राहिलो. उगाच काही रहायला नको आपल्या कडून म्हणून बरोबर ओरिजिनल रेशन कार्ड, पॅनकार्ड, इलेक्ट्रिकचं बील, टेलिफोनचं बील, कंपनी ओळख पत्र अशी यादीत लिहीलेली यच्चयावत कागदपत्र आणि त्या प्रत्येकाची अटेस्टेड फोटोकॉपी घेऊन गेलो जाताना. आता वास्तविक अटेस्टेड कॉपी न्यायची गरज नव्हती पण न जाणो ह्या सेंटरचा नियम असायचा तसा आणि घोडं त्यामुळे पेंड घायला नको म्हणून नेलं झालं. पण येव्हढा वेळ त्या रांगेत तिष्ठत उभं राहून जेव्हा नंबर आला तेव्हा कळलं "आज फॉर्म मिळणार नाहीत. आज फक्त नाव नोंदवून घेणार रेशन कार्ड बघून. फॉर्म घ्यायला दोन दिवसांनी यायचं" आता आली का पंचाईत. म्हणजे आता परवा त्या फॉर्म घेण्यासाठी एक सुट्टी टाकायची. मग पुन्हा एकदा तो भरलेला फॉर्म देण्यासाठी सुट्टी घ्यायची नाहीतर अजून एक विकांतं खर्ची घालायचा आणि हे सगळं होईपर्यंतं तात्याचं व्याख्यान ऐकायचं.

सोमवारी तात्याला हे सगळं ऐकवलं आणि सुट्टीचा अर्जही सोबत जोडून दिला तेव्हा वाटलं समदु:खी माणसा प्रमाणे त्याचा खांदा मिळेल रडायला आम्हाला पण कसचं काय सालं नशिब पण ना आम आदमी बघूनच रुसायचं धारिष्ठ दाखवतं. त्या तात्याचे नेटवाले फॉर्म ऍक्सेप्ट होऊन त्याला आधारवाली रिसिट पण मिळाली आणि आता घरपोच कार्ड पण मिळेल काही महिन्यांनी.

"तुम्हा लोकांना डिसिप्लीन माहीत नाही. एकाला सोशल रिस्पॉन्सिबिलिटी काय असते ते कळत नाही. फायदा कळतो पण कायदा नाही" अशी जी तात्याच्या तोंडाची तोफ सुरु झाली ती आम्हाला खडा पारशी करुन आणि आमच्या वाफाळत्या चहाचे शीतपेयात रुपांतर करुनच शमली.

"जळ्ळा हा सगळा अडाण्याचा गाडा. ह्याचा नियम वेगळा नी त्याचा नियम वेगळा. उद्या अजून काही एक टूम निघाली की पहिला धडा पुसायचा नी नविन गिरवायचा. अजून पर्यंत वोटर्स कार्ड करेक्शन होऊन हातात मिळालेलं नाही. आधार कार्ड म्हणे प्रत्येकाला युनिक नंबर सकट मिळणार पण ते मिळवण्यासाठीची नियमावली युनिक नाही. ती मात्र राबवणार्‍या सेंटरगणिक वेगळी. एक म्हणतं फोटोकॉपी केलेले फॉर्म चालतात दुसरा म्हणतो चालत नाही. एक नेटवरुन डाऊनलोड केलेले फॉर्म ऍक्सेप्ट करतो तर दुसरा त्याकडे तु.क. टाकतो. येव्हढच काय चिडून जाऊन त्या युआयडी वाल्या वेबसाईटवर दिलेल्या कंप्लेट ऍट द रेट वाल्या इमेल आयडीवर पाठवलेलं कंप्लेंटचं इमेल देखील बाउंस होऊन आधार कडून साभार परत येतं." आमचा प्रोफेसर तावातावाने बोलत होता. (तो ही त्यात्यासारखा कधी कधी सुटतो आणि लेक्चर देतो म्हणून त्याला आम्ही प्रोफेसर म्हणतो)

आम्ही मग "आम आदमीच आम आदमीला आधार देगा" असा डायलॉग मारत त्याला आमचा खांदा रडायला दिला आणि त्याच्या "अडाण्याचा गाडा" आणि "आधार कडून साभार" शब्दांवर खुष होऊन त्याला कॅन्टीन मधला वाफाळता चहा स्वखर्चाने पाजून थंडं केला.



बुधवार, २२ जून, २०११

डोंबिवली स्पेशल : डोंबिवली पुणेरी बाणा



अफव‌ओंपे विश्वास मत रखो! हे मनाला माहीत असतं हो नाही कोण म्हणतय पण बातम्या जेव्हा खासम खाऽस अशा जवळच्या, आतल्या गोटातल्या इसमाकडून येतात तेव्हा विश्वास ठेवावाच लागतो काय करणार.

तर अशीच एक बातमी, मला गेल्याच आठवड्यात समजली. एरव्ही मी तिला "अफवा" असं म्हणून भिरकावून लावली असती. पण ती नेमकी दिली, ती आतल्या गोटातल्या व्यक्तिने. मग काय? मति गहाण ठेवून विश्वास ठेवणं भागच होतं.

खातरजमा करायला ऐकल्याबरोबर तिथे जाणं तर शक्य नव्हतं आमंत्रण मिळालं असतं, अगदी "आगत्याने येणे करावे" टा‌ईपचं आमंत्रण मिळालं असतं तरीही. (आमंत्रण मिळायची शक्यता तशीही कमीच म्हणा. आता हेच बघाना "लेकीला घे‌ऊन जा हो आयुकात" असं नुसतं सांगायचं. पण बा‌ई आयुका लांब पडेल तुला. माझ्याकडे सोय करेन तुझी एखाद दिवस असं कोणी तोंड भरुन म्हणेल तर शप्पथ!)

तर असो मुळ विषय होता ती बातमी... जी आतल्या गोटातून आलेली. बातमी काहीशी अशी होती "पुणं म्हणे बदलतय, पुण्याने म्हणे कात टाकलेय" ह्या टाकलेय शब्दापुढे तिच्या स्वरातून जाणवत होतं आश्चर्य आणि माझ्या मनात ते ऐकताना उमटत होतं प्रश्नचिन्हं.

"म्हणे आजकाल बरीच दुकानं १-४ बंद नसतात." इती माझी बातमीदार.

"नक्की लोंढेकरांची दुकानं असणार ती. जातिवंत पुणेकराची नसणारच." मी बातमीदाराचं म्हणणं एकदम तिच्याच समोर मान्य करायचं नाही म्हणून केवळ हे वाक्य फेकलं.

पण मनातून मी तिच्या बातमीवर कधीचाच विश्वास ठेवलेला कारण पुन्हा तेच ती माझी आतल्या गोटातली खासम खास बातमीदार होती ना. विश्वास न ठेवून सांगते कोणालां. त्यात पुन्हा एका नातेवा‌ईकाचं दुकान त्याचा मुलगा सांभाळायला लागल्यापासून दिवसभर चालु असतं असं एका लग्नाच्या निमित्ताने भेट झाली तेव्हा कळलेलं सत्यवचन होतच जमा, डोकं नावाच्या कपाटात त्यामुळेही ठेवला पटकन विश्वास.

बातमी संपली, बोलणही संपलं, तसा तिने फोनही कट केला. आवांतर बोलून कॉलचं मीटर वाढवायला तो फोन मी थोडीच केलेला!

पुण्याने कात टाकली ठिक आहे. पण मग तिथल्या "पुणेरी बाण्याचं" काय? तो कुणीतरी जपायला नको?

आSहेS आSSहे, हे पुणेपण जपणार ह्या जगात पुण्याबाहेरही कोणी आहे. मी युरेका च्या चालीवर ते आहे आहे म्हणुन गिरकी घेत स्वत:शीच म्हंटलं. त्यांचीच माहिती द्यायला हा लेखप्रपंच आहे ना.

तर लोकहो हे पुणेपण आपल्या परीने जपायचं काम एक मिशन म्हणून गेली बरीच वर्ष काही डोंबिवलीकर्स करत आहेत. पुढे कधीतरी पुणं कात टाकेल ह्याची चाहूल त्या द्रष्ट्या डोंबिवलीकरांना फार पुर्वीच लागली असणार, म्हणून तर ते तो ठेवा पुण्यापासून म्हंटलं तर लांब, म्हंटलं तर ३-४ तासाच्या अंतरावर असलेल्या डोंबिवलीत एक मिशन असल्याप्रमाणे जपत आहेत.

आत्ता त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या‌इतपत असेलही कदाचित पण लवकरच ती वाढीला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मला अत्यंत अभिमान वाटतो हे सांगताना की हे "पुणेपण" जपण्याचं काम करणार्‍यांमधे महिलावर्ग आघाडीवर आहे. मी जेव्हा जेव्हा त्यांच्या समोर जाते तेव्हा अगदी दरवेळी त्याच विस्मयचकीत/ भारीत नजरेने त्यांच पुणेपण टिपून घेते.

आज त्यांच्या उदात्त मिशनचा परीचय तुम्हाला व्हावा आणि पुढे मागे डोंबिवलीने पुर्णपणे "पुणेरी बाणा" अंगिकारला तर त्याचं क्रेडीट हे ह्याच दोघींना जावं ह्या निर्मळ उद्देशाने मी हा लेख लिहीत आहे. म्या पामराच्या अल्पमतिने अजून काही जणांची नोंद राहून गेली असेल तर माझा डेटाबेस जरुर अपडेट करावा डोंबिवलीकर्स.

तर ह्या महान कार्यातल्या अग्रणी काकू म्हणजे आमच्या "मुनमुन मिसळ" फेम वाल्या मुनमुन काकू. त्यांच्याच परिचयाने ह्या परिचय कार्याची सुरुवात न झाल्यास त्या स्वत: ये‌ऊन मला खडे बोल लावतील. (सच्च्या डोंबिवलीकराच्या कानात आत्तापर्यंत ते बोल फारसं इमॅजिन न करता देखील त्यातल्या हेल सकट वाजले असतीलच)

"मुनमुनची मिसळ" ह्या अख्यायिके विषयी ऐकतच मी मोठी झालेय. लहानपणापासून मला ह्या नावा विषयी फार कुतुहल होतं आणि हे असं नाव मिसळीच्या दुकानाला देणार्‍या अफलातून व्यक्तीमत्वाला बघायची प्रचंड उत्सुकता होती.

खरतर तेव्हा "मुनमुन" हे नाव "मुनमुन सेन" मुळे डोक्यात फिट्ट होतं आणि "मुनमुन सेन" च्या प्रतिमेमुळेच केवळ मला मिसळवाल्या दुकानाला ते नाव का बॉ दिलय अशी उगाचच उत्सुकता होती.

जेव्हा प्रत्यक्ष तिथे जायची संधी साधली तेव्हा "मुनमुन" हे नाव, ते दुकान चालवणार्‍या काकू आणि तिथे मिळणारी मिसळ ह्या तिन्ही गोष्टींचा मेळ मी काही केल्या घालू शकले नव्हते.

पहिल्यांदा गेले ते मैत्रिणींबरोबर. आम्ही तिघी जणींनी तिथे जायचं ठरवलं. त्याप्रमाणे गेलो देखील तिथे.

गेलो देखील असं लिहायचं कारण, त्यावेळी पॉकेटमनी मिळण्याची चंगळ कॉलेजमधे जायला लागलो तरीही नव्हती. ट्रेनचा पास असायचा, घरुन डबा मिळायचा, रिक्शा वगैरेला लागलेव पैसे तर रोज जाताना मागून घ्यायचे. फारतर दळण आणलं, भाजी आणली तर वरचा एखाद सुट्टा रुपया उदारमनाने आ‌ई ठेवू द्यायची. पार्टी बिर्टी काय ते घरी करायची. हवेच तर मागून घ्यायचे कारण सांगून. अशी पद्धत असताना, नेमके आम्ही "मुनमुनची मिसळ" खायचेय असच सांगून पैसे मागितले. कधी नव्हे ते खरं कारण पटून ते दिले गेले. आणि आम्ही तिघी तिथे जा‌ऊन पोहोचलो.

ह्या तात्काळ परमिशन मिळण्यातच "मुनमुन मिसळ = डोंबिवली चा अभिमान" ह्याची पार्श्वभुमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही नाहीतर "बाहेरचं खा‌ऊन काय पोटं बिघडवायचेत? की घरातलं अन्न गोड लागेनासं झालय आजकाल?" असं ऐकावं लागायचं इतरवेळी.

तिथे गेलो खर्‍या पण हीऽऽ मोऽठी प्रतिक्षा यादी बघून मागच्या मागे जायची इच्छा झाली. पण समोर का‌उंटर वर बसलेल्या काकुंनी तितक्यात मोठ्या जरब बसवणार्‍या आवाजात विचारलं "किती S? तिघी लेडीज काS?" आणि आम्ही घाबरुन कसबसं, जणू काही तीन लेडीजनी ये‌ऊन काही गुन्हा केलाय ह्या थाटात तोंडातल्या तोंडात पुटपुटत "हो" म्हंटलं.

दुसर्‍या क्षणी त्यांनी एका टेबलावर बसलेल्या जोडप्या पैकी पुरुषाला चक्क ऑर्डर वजा शब्दात सांगितलं "तुम्ही आतल्या बाजूला बसा, मिसेसला बाहेरच्या बाजूला बसुद्या."

गिर्‍हा‌ईकाशी अशा शब्दात कोणी बाहेरच्या हॉटेलमधे बोलतं तर ते गिर्‍हा‌ईक तिथली पायरी पुन्हा कधी न चढतं.

पण काकुंचा शाब्दिक वचक काय सांगावा महाराज. ते जोडपं त्यांनी सांगितल्या प्रमाणेच बसलं. इतकच नव्हे तर नंतर आत जाणार्‍या एका गृहस्थाला काकुंनी चक्क "तुम्ही थांबा, ह्या तिघी आधी आल्यात" असं सांगून चक्क पुन्हा प्रतिक्षा यादीत पाठवलं आणि आमचा नंबर त्या जोडप्याच्या समोरच्या बाकड्यावर लावला.

"एक जण त्या बा‌ईशेजारी बसा, दोघी समोर बसा" अशी सुचना दे‌ऊन जागावाटपाचं काम संपलं.

आम्ही हुश्श हो‌ऊन घाम पुसत ऑर्डर काय द्यायची (म्हणजे तिखट, मिडीयम की साधी मिसळ सांगायची)ह्याचा खल करत होतो. तेव्हढ्यात काकुंचा मुलगा समोर ऑर्डर घ्यायला आला. आमचा नवखेपणा पाहून आणि डिस्कशन ऐकून त्यानेच "मिडीयम घ्या" असा फ़ु.स. (फुकट सल्ला) दिला.

"हा कोण आला टिकोजीराव आम्हाला सांगणारा" असं वाटून माझ्या मैत्रिणिने एक तिखटची ऑर्डर दिली, आम्ही दोघींनी "सेफ प्ले" च्या न्यायाने दोघीमधे एक मिडियम मिसळीची ऑर्डर दिली.

मिसळ आली. येवह्ढही तिखट खायची आमच्या "भाजी आमटीत सुद्धा गुळ" लागणार्‍या पिंडाला सवय नसल्याने, नाक डोळे फुसफुसायला लागले. जा‌ईल तेव्हढ संपवून आम्ही हात धुवायला बाहेर निघतच होतो तेव्हढ्यात काकुंनी आम्हाला ऐकवलच "पुढच्या वेळी साधीच मिसळ घ्या" म्हणून.

काकुंचा मुलगाही सवा‌ई. काकुंच्याच तालमीत तय्यार झालेला.

"मिडियम सांगू की तिखट ए XXXच्या नीट नेता येत नाहीत का प्लेट तुला XXX रस्सा ओत त्या तिखट मधे अजून लक्ष कुठाय XXX" असं एकाच वेळी गिर्‍हा‌ईक, कामाला असणारा पोर्‍या ह्यांच्याशी संवाद साधत बोलतो तेव्हा नवख्या माणसाला थोडं बिचकायला होतच मनातल्या मनात भलतीकडे स्वल्पविराम दिल्याने.

पण तो चेहर्‍यावरची रेषही हलू न देता हे म्हणत असतो. नंतर ऐकून ऐकून आपल्यालाही सवय होते कुठे स्वल्पविराम द्यायचा ह्याची.

(जाणकारांनी फुल्यांमधले संवाद समजून जावेत. अजाण लोकांनी त्यांच्या माहितीतल्या जाणकाराची डिक्शनरी मागवावी, मी जाणून असले तरी ज्या‌अर्थी मी फुल्या वापरल्यात त्या अर्थी मी जाहीर लिहिणार नाही सबब मला विचारु नये ही नम्र विनंती त्या काकु स्टा‌ईल मधे वाचावी. ही विनंती वाचताना जे मला ओळखतात त्यांनी माझा चेहरा डोळ्यासमोर न आणता त्या काकुंचाच चेहरा किंवा तत्वद तुम्हाला जे कोण डॉणीन स्टा‌ईल वाटत असेल तिचा चेहरा डोळ्यासमोर आणावा)

नंतर बर्‍याच वेळा तिथे जायचा योग आला. नंतर कधी तरी तिथे पाटी लागलेली पाहीली "पार्सल मिळणार नाही" अगदी डबा घे‌ऊन गेलात तरी पार्सल मिळणार नाही असं उत्तर मी ऐकलय तिथे.

इतर लोकांन्ना म्हणजे खरतर डोंबिवलीबाहेरच्या लोकांना त्या "मामिच्या मिसळीचे" कोण कौतुक. आता तर म्हणे आमंत्रण मधे स्टा‌ईलीश रित्या ती पेश होते वगैरे वगैरे कोण ते कौतुक. पण आमच्या काकुंच्या प्रेमळ विचारपुशी शिवायची मिसळ म्हणजे बातमे कुछ दम नही लोकहो. खाण्या बरोबर ह्या शाब्दिक फटकेबाजीची जोड हवीच हवी तरच खरी मजा.

अर्थात हे बाहेरच्यांना नाही पटणार म्हणा. त्यांना हा काकंचा मुजोर पणा/उद्धट पणा वाटतो, त्यामुळे केवळ "कोल्ह्याला द्राक्षे आंबट" न्यायाने त्यांना तिथली मिसळदेखील आवडत नाही. पण तरिही सच्चा डोंबिवलीकर अजूनही त्यांच्या फु.स. सकट त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांच्या दुकाना बाहेरची प्रतिक्षा यादी अजूनही हेच सांगते आमचं "ह्या बाण्यावरही" प्रेम आहे. अस्सल पुणेकर कसा तिथल्या दुकानदारांचे किस्से "कॉय शांगू बा‌ई आमच्या इथली दुकानं ना बंदच असतात १-४" असं लाडीक तक्रार करत सांगतो तसच आम्ही डोंबिवलीकर आमच्या ह्या "मुनमुन मिसळ" वाल्या काकुंबद्दल बोलतो.

मिसळीच्या खालोखाल मराठमोळा पदार्थ म्हणून नंबर लागतो बटाटवड्याचा. तर लोकहो आमच्या इथल्या एक काकू गेली कित्येक वर्ष त्यांचा "पुणेरी बाणा" जपत बटाटेवडे, साबुदाणा वडे विकण्याचा व्यवसाय करतायत. त्यांच्या दुकाना बाहेर "पार्सल मिळणार नाही" अशी पाटी जरी नसली तरी तिथेही एक अनोखी पाटी लक्ष वेधून घेतेच. आणि आपलं लक्ष गेलं नाही चुकुन माकुन तर ते लक्षात आणुन द्यायचं काम त्या काकू अगदी आवडीने करतात.

"नाही नाही नाही, इथे पाव मिळणार नाही"

"पैसे सुट्टे द्यावे"

"आधी पैसे द्या"

अशी वाक्य असलेल्या पाट्या त्यांचा "बाणा" दाखवल्या शिवाय रहातच नाहीत.

प्लीज नोट इथे कृपया, प्लीज अशा शब्दांना जागाच नाहीये कुठेही.

तसही त्या काकुंकडे बघितल्यावर कोणीही त्या सुचनांचं उल्लंघन करण्याच स्वप्नात पण योजणार नाही हा भाग वेगळा.

मला साधं मोठं मं.सु. घालून प्रवास करायची भिती वाटते, इथे ह्या काकू ठसठशीत सोन्याचे दागिने (एखादा दागिना नव्हे, तर शब्दश: दागिने) घालून बटाटे वडे तळत उभ्या असतात. त्यांचेही दुकान संध्याकाळी ६ शिवाय चालूच होत नाही बर्‍याचदा.

आजकालच्या मुलामुलीबद्दल फारच स्वच्छ आणि स्पष्ट मतं त्या त्यांच्याच तोंडावर ऐकवतात. आणि तरिही त्यांच्या दुकानातले बटाटे वडे घेण्यासाठी डोंबिवलीकर प्रेमाने गर्दी करतात.

डोंबिवली करांना देखील डोंबिवलीच्या बर्‍याच अशा गोष्टींचा "जाज्वल्य का कायसासा अभिमान" वाटायला लागलाय. म्हणून तर म्हंटलं पुणं बदलतय, पुणं कात टाकतय असं ऐकलं आणि लक्षात आलं पुणेरी बाणा म्हणून डोक्यात असलेला "जाज्वल्य अभिमान" "गिर्‍हा‌ईक ह्या व्यक्तीला उपर्‍या लोकांनी उगाचच जोडलेली अदब द्यायची पद्धत ह्याविषयी जातिवंत पुणेरी दुकानदारांची असलेली नाराजी" हे सगळे हळू हळू पुण्यातून स्मगल हो‌ऊन डेक्कन क्वीन नाहीतर इंद्रायणी मार्फत डोंबिवलीत ये‌ऊन रुजतय, वाढतय आणि त्याचा आम्हाला चक्क जाज्वल्य का कायसासा अभिमानही वाटतोय.

ती आतल्या गोटातली बातमी अगदीच अफवा नसेल तर पुणेकरंनो सावधान !लवकरच पेटंट घ्या तुमच्या बाण्याचं नाहीतर अजून काही हजारो वर्षांनी "जाज्वल्य अभिमान" "आमच्या वेळी असं नव्हतं" वगैरे कॉपिरा‌ईट टा‌ईपची वाक्य डोंबिवली स्पेशल म्हणून ओळखली जातील ह्यात शंकाच नाही.

जाता जाता: नुकतेच डोंबिवलीच्या भोपर नामक विभागात एका फार जुन्या काळपासून असलेल्या मंदीरात जायचा योग आला. तेव्हा मंदीराच्या बाहेर लावलेल्या फलकाने "हा डोंबिवली बाणा" कुठपर्यंत पोहोचलाय ह्याची झलकच मिळाली. तुम्ही स्वत:च बघा खालच्या प्रचि मधे काय लिहिलय त्या फलकावर ते.



मंगळवार, २६ एप्रिल, २०११

मी, माझी मैत्रिण आणि सिंडरेला बूट



जनरली मला दहा काय पण चार दुकानही फिरायचा कंटाळा येतो खरेदीला गेल्यावर, त्यातून चप्पल खरेदी म्हणजे तर काय बघायलाच नको. चप्पलेचं आणि माझं एकमत कधीच होत नाही. जी चप्पल मला आवडते ती माझ्या पायाच्या मापाची नसते. एखादी चप्पल आवडलीच आणि मापाचीही निघाली तर ती रोजच्या ट्रेन प्रवासात टिकाव धरेल इतपत भक्कम नसते. जी भक्कम असते ती दिसायला तितकिशी आकर्षक नसते. एक ना दोन नाना तर्‍हा....आणि येव्हढाऽऽ चोखंदळ पणा करुन चप्पल घेऊन बाहेर पडावं, तरिही दरवेळी दुसऱ्या कुणाच्या चपला बघितल्या की वाटतं "आयला ह्यांना कशी बहुदुधी आखूड शिंगी गाय" मिळते?

तर त्या दिवशीही नेहमी प्रमाणेच अगदी तस्सच झालं. आधीच मला "तिच्या" प्रत्येक गोष्टीचं अपाऽऽर कौतूक आहे. तिच्या दिसण्याचं.. तिच्या रहाण्याचं.. तिच्या लिखाणाचं आणि तिच्या छंद जोपासण्याचं सुद्धा.

त्याचं काय आहे ना...तिचं एक मस्त छानसं, छोटसं घर आहे...तिच्या चौकोनी कुटूंबाभोवती फिरणार त्यांचं एक वर्तुळ आणि त्या वर्तुळाच्या जोडीने तिची तिची अशी जपलेली छोटी मोठी वर्तुळं... मला सगळयाचच अपाऽऽर कौतुक आहे, अगदी पहिल्या भेटीपासूनच. (प्लीज नोट वर्तुळं म्हणजे विबासं नव्हे )


तर त्या दिवशी आम्ही भेटलो तेव्हा तिच्या पायात एकदम "आखुड शिंगी बहुदुधी गाय" टाईपच्या म्हणजे दिखाऊ+टिकाऊ टाईपच्या चप्पला होत्या. त्या तिने "अमक्या ढमक्या दुकानात सेल मधे घेतल्या म्हणे दोनच दिवसा पुर्वी" मी देखील नेमके दोनच दिवसा पुर्वी बरीऽऽऽच दुकानं फिरुन शेवटी एका चप्पलेवर शिक्कामोर्तब करुन माझ्याकरता नविन जोडे घेऊन आलेले. माझ्या नविन जोड्यांचं नवखेपण जागोजागी लावाव्या लागलेल्या बॅंडेड मधुन जाणवत होत. माझ्या पायाची आणि त्यांची अजून म्हणावी तशी युती काही होत नव्हती.

पण ती मात्र सिंडरेलाच्या गोष्टीतली सिंडरेला असावी तसे तिचे जोडे तिला फिट्ट बसलेले. ना कुठे सोलवटण्याचे व्रण होते ना कुठे बॅंडेड चे ठिगळ.

मग का नाही मनातल्या मनात तिचा हेवा वाटणार, सांगा बर? उगाचच आपलं मनात आलं तिचे "हे" बुट तरी एखाद दिवस मला मिळाले घालायला तर...!


हे असं वाटणं म्हणजे ते शाळेत निबंधाला विषय असतो तसं झालं पण आता तसं वाटलं खरं त्याला काय करणार!


पण कधी कधी(च) तुमची प्रार्थना इंन्स्टंट फळाला येते आणि तुमचं नशिब तुम्हाला "छप्पर फाडके" देतं (निदान तसं भासवतं तरी), तर तो दिवस देखील त्या "कधी कधी" पैकीच एक असावा , कारण त्या दिवशी गप्पांच्या नादात माझ्या घरुन निघताना ती नेमकी चुकून माझे बुट घालून घरी गेली आणि तिच्या त्या "सिंडरेला बुटांना" माझ्याच घरी विसरुन गेली.


सिंडरेलाला तिचा तो एक हरवलेला बुट आणि त्या जोडीने भाग्य परत मिळाल्यावर जेव्हढा आनंद झाला असेल त्याच्या कैकपटीने अधिक आनंद मला त्या दिवशी तिचे बुट मिळाल्यावर झाला.

हळूच पाय त्या बुटात घालून बघितला. मस्त वाटलं एकदम. मग चालून बघण्याचा मोह झाला. चार पावलं चालताना एकदम भाऽऽरी फिलिंग आलं. मग दिवसभर तिच्याच बुटात पायाला अडकवून पायाला भिंगरी लावून निघाले फिरस्तीला, औटघटकेचं म्हणतात तसलं राज्य अनुभवायला. एकिकडे कॉन्शस का काय म्हणतात तो म्हणत होता "तिचे बूट परत करुन ये, दुसऱ्याच्या वस्तू वापरु नयेत" इत्यादी इत्यादी. पण मनातल्या हेव्याने त्यावेळी तरी त्या कॉन्शसला गप्प बसवलं.

टेलिफोनचं बील भरायला रांगेत उभी राहीले तेव्हा उगाचच वाटत होतं रांगेतल्या एकूण एक बायका माझ्या बुटांकडेच बघतायत म्हणून. समोरची प्रत्येक व्यक्ती माझ्या त्या सिंडरेला वाल्या बुटांचा हेवा करतेय असं वाटून गेलं.. उगाचच. आणि त्याचीही गंमत वाटली.


बीलं झाली भरुन... बाजारहाटही करुन झाला. आठवून आठवून कामं काढून जास्तीत जास्त वेळ त्या बुटाचा सहवास मिळवायचा प्रत्येक ठराव मनाने पास केला.


थोडावेळ बरा गेला, पण कधी कोण जाणे हळूच त्रासाने डोकं वर काढलं, पायांना जरा जरा त्रास जाणवायला लागला. कधी त्या बुटांच्या हिल्स मुळे पाय पटकन मुडपला जाऊन दुखायला सुरुवात झाली तर कधी त्या बंद बुटांमुळे पायाला चांगलाच घाम फुटायची वेळ आली. पायाचा अंगठाही जरासा का होईना सोलवटला, मग वाटेत थांबून दुखावलेल्या अंगठ्याला बँडेड लावून झाली. समोरुन बघणार्‍याला बंद बुटाआड लावलेली बँडेड दिसत नव्हती खरी आणि त्यामुळेच बुटांकडे वळणार्‍या नजरांमधला भाव अजुनही तोच होता फक्त त्याची आता मला गंमत वाटत नव्हती . त्या दुखण्याने एकंदरीतच माझ्या चालण्याचा स्पीड चांगलाच मंदावला होता आणि मंदावणाऱ्या स्पिड बरोबर ते सिंडरेलाचे बुट घालण्याचा उत्साह पण मावळला होता.


दुखर्‍या पायावर आणि हिरमुसल्या मनावर फुंकर मारत मी मग ऑटोने घरी येणच पसंत केलं. घरी येऊन टेकते नाही तोच बेलच्या हाकेला ओऽऽ देत मला दार गाठावं लागलं.


दारात माझी तिच ती "सिंडरेला बूऽट" वाली सखी, जिचं मला अपार कौतुक आहे..उभी होती... तिच्या स्वत:च्या दुखर्‍या पायावर फुंकर मारत आणि एका हातात माझे बूट सांभाळत.


हेच खरे!


लहानपणी वीज गेली
की मेणबत्तीच्या प्रकाशात
सावल्यांचा खेळ रंगायचा
हरिण, ससा, पक्षी, मासा
वेगवेगळा आकार त्या
सावल्यांमधून तयार व्हायचा

घामाच्या धारा आणि गुणगुणणारे डास
कासवछापचा चुरचुरणारा उग्रसा वास
सगळ्या सगळ्याचा विसर पडायचा,
सावल्यांच्या त्या भासमय खेळात
जीव असा रंगून जायचा

शेवटी छोटे काय नि मोठे काय?
नको असलेला वर्तमान विसरायला
आभासी दुनियाच लागते
तात्पुरती का होईना

हेच खरे!



शनिवार, १२ फेब्रुवारी, २०११

चक्र /वर्तुळ भाग ४

"आईSS, आता लहान आहे का मी? लग्न होऊन मला एक मुलगी पण झालेय ..! मी बघेन ग काय नी कसं मॅनेज करायचं सगळं ते. तू कशाला पण आईंना असं बोललीस..."

"अगंSS.. पSण..."

"पSSण काय पण, तू नको मधे पडूस ह्यात, मला करुदे ना हॅन्डल माझ्या पद्धतीने. तू पडतेसच कशाला ह्या घरातल्या गोष्टींमधे?"

"अगं.. पण सहज बोलले मी. कुणी काही बोललं का तुला त्यावरुन?"

"रामायण झाल्यावर मगच तुला पटणार का माझं म्हणणं? आणि मी फोन ठेवतेय आता, अख्या बिल्डींगला कळेल ह्या आवाजात अजून बोलले तर ..कोण कोणास काय म्हणाले ते"

फोन कट केला नी अभिची एंट्री झाली. शेवटची तारसप्तकातली वाक्य कानावर पडली त्यावरुन त्याला कल्पना आलीच काय झालं असेल त्याची.

"फोन मधुन धूर येतोय मनु" त्याने तरिही विनोदाचा क्षीण प्रयत्न केला आणि चुकीच्या वेळी चुकीचा विनोद केल्याची शिक्षा म्हणून एक जळजळीत कटाक्ष त्याच्याकडे फेकला गेला.

"तू ना तुझ्या आईवरच गेल्येस बहुतेक. काय कुठे बोलावं ते कळतच नाही तुला" मुद्दाम खवट बोलणं होतं की अजून एक विनोदाचा फुटकळ प्रयत्न ह्यात न पडता तिने..."होSS ना! तुम्हाला कळतं नाSS???" म्हणत वार परतवला त्याचा.

ह्यातलं तुम्हाला हे "आदरार्थी एकवचन" नसून "अनेकवचन" होतं हे लक्षात येऊन विषय बदलला नाही तर आज तिसरं महायुद्ध नक्की घडणार ह्याची जाणिव होऊन तो शहाण्या नवर्‍याची भुमिका पार पाडण्यासाठी गप्प बसून तिला कामात मदत करत राहिला.

तिने पुन्हा फोन लावायला घेतला तेव्हा गोंधळून त्याने "आता पुन्हा काय..?" असा चेहरा केला त्यावर "तुम नही समझोगे, लडकीया होती ही ऐसी है" असा डायलॉग, त्याला तिने न बोलताच ऐकू आला

-------

"म्हणे ह्या घरातल्या गोष्टींमधे कशाला पडतेस?" " हे घर... म्हणजे?" "काल परवा पर्यंत माझी लेक होती ना ही शेखर?" "आता एकदम परक्यासारखी तोडून बोलली? का? काय केलं मी इतकं? तिची काळजी वाटून सहज बोलले ना मी?"

"हो पण निमाबाई ती आहे की समर्थ. ठेवा की तिच्यावर विश्वास. आता लेक सासरी गेलेय आपली. तिला तिचा संसार तिच्या चुक बरोबर सकट करुद्यात की. काळजी ठिक आहे पण… इतकंही गुंतणं योग्य नाही"

"तुला काय जातय बोलायला? म्हणे गुंतणं योग्य नाही. जीवाला घोर लागतो तो जाणायला आईच व्हायला हवं"

"आता गेली का गाडी पुन्हा त्याच ट्रॅक वर...! चला विषय बदला..."

"असं म्हंटलं की झालं तुझं, तरी पण चूक नाहीये म्हणणं तुझं. कळतय पण नाही वळत असं काहीसं होतय"

"फोन वाजला निमाबाई, घ्या लेकीचाच असणार.. बोला जरा ते डोळे पुसून.."

"हम्म! बोल... नाही ग रागावले नाही मी..बSरं.... होS अगं SS...... चल बाळा काळजी घे. फोन ठेवते आता"

------------

"बरं राणिसरकार, तुमचा क्राईंग एपिसोड संपला असेल तर आपण जेवून घेवुयात का आता? आई बाबा पण आलेत आत्ताच"

"मला नव्हतं रे दुखवायचं तिला असं, मी आधी तेच व्यवस्थित सांगायचा प्रयत्न करत होते तिला. पण.. तिच्यापर्यंत ते पोहोचतच नव्हतं आणि मग गेलं माझ्या तोंडून निघून तसं... पण वाक्य बोचरं असलं तरी फॅक्ट आहे ना ती..?

सल्ला देणं एखादवेळेस ठिक आहे पण उठसुट अशी काळजी वाटून ‘मी खाते किती, झोपते किती, काम किती करते’ असं प्रत्येक बाबतीत विचारत राहिली ... बर विचारणं पण ठिक म्हणते मी, पण मला विचार ना काय विचारायचं ते.

"कित्ती काम पडतं ना मनुला" टाईप वाक्य डायरेक्ट आईंना ऐकवायचं म्हणजे...! वादाला कारण नाही होणार? मSग, तेच सांगत होते तिला. मी आहे ना समर्थ माझ्या स्वत:साठी बोलायला! एकतर कानाला यंत्र लावत नाही, इथुन घसा फ़ोडून सांगावं लागतं त्यातही भेटल्यावर बोलू म्हंटलं तरी तिलाच रहावत नाही मग विषय जातो वाढत आणि फट्ट दिशी तुटतो.. रबर ताणलेला"

"तू बघशील अभी, मी खूप चांगली आई होईन. म्हणजे माझी आई खूप चांगली, प्रेमळ आहेच रे पण मी ना पिल्लूला एकदम वेगळं वाढवेन, पुर्ण मोकळेपणा देईन, तिची मैत्रिण होईन. तिच्या बाबतीत बिलकूल पझेसिव्ह रहाणार नाही...."

"मातोश्री आता सध्या जेवायची कृपा कराल का? तुमचं पिल्लू सध्या तुमच्या करता थांबलय जेवायचं"

"तू हो पुढे मी आलेच.."

----------

पिल्लू - वय वर्ष २/३ - "आई...आऽई आऽऽई आऽऽऽई आणि फक्त आई"

पिल्लू - वय वर्ष ४ "आई... आमच्या बाईऽऽ किनई..... बाईं म्हणतात... बाई अशा नी बाई तशा" आणि तरिही ऍट द एण्ड ऑफ़ द डे "आऽई तू कोणाची आहेस? फक्त माझी आहेस ना?" "माऽऽझी आई..मी तुला कध्धी कध्धीच सोडून जाणार नाही"

- वय वर्ष ५ "आई, मी तनु कडे जाऊ आज पुर्ण दिवस रहायला? तनू माझी बेस्ट फ्रेंड आहे तुला माहितेय!...... प्लीऽऽज"

- वय वर्ष ७ "आई, मला ना तुझ्यापेक्षा निशूताई जास्त आवडते समोरची..."

- वय वर्ष …. - ब्लाऽऽऽऽब्लाऽऽऽऽ ब्लाऽऽऽह ……

- वय वर्ष …. - "........................"?????

----------------

खोटं का बोलू आधीची सगळी वाक्य मनाला कुठे तरी सुखावून जायची. मी पझेसिव्ह नाही असं म्हंटलं तरिही मला सुखवायची. आणि तिच्याकडून मी कसलीच अपेक्षा ठेवणार नाहीये हे स्वत:ला आणि इतरांना ठासून सांगितलं वेळोवेळी तरी देखील .."आई, मला ना तुझ्यापेक्षा निशूताई जास्त आवडते समोरची..." हे वाक्य कुठेतरी सुक्ष्मसी कळ देऊन गेलं....एका क्षणापुरतं का होईना, गेलं काहीतरी दुखावून.

का? माहित नाही. कदाचित माझा पदर सोडून पिल्लू आता वेगळं वर्तुळ तयार करतय ह्याची जाणिव एकाच वेळी सुखावणारी आणि आता असा आणि इतका फक्त आमचा आमचा असा सहवास रहाणार नाही ह्या जाणीवेने दुखावणारी ... त्यातूनच आलं असेल ते खट्टूपण.

गोष्ट खरं तर तीळा येव्हढी छोटीशी... अजून पुढे जाऊन ह्या गोष्टीचं काही वाटणार नाहीच, तसच कशाला ते खट्टुपण देखील फ्रॅक्शन ऑफ़ सेकंद म्हणतो तसं तरळलेलं. ह्यालाच पझेसिव्ह नेस म्हणतात का? पण मी अजिबात पझेसिव्ह होणार नाहीये हे मी किती तरी वेळा घोकलय की मनाशीच माझ्या.

अजून "दिल्ली बहोत दूर है …" बरच काही घडणारे ह्यापुढेही, टिन एज जसं येईल तसं बर्‍याच उलथापालथी होतीलच म्हणा. आणि मग वय वर्ष अमुक तमुक - च्या पुढे ते ब्लाऽऽह ब्लाऽऽह ब्लाऽऽह वाले रिकामे रकानेही भरले जातील.

"चिंगी महिन्याची झाली नाही तोच" चा अंक प्रक्षेपीत करत मी...." मग मी पण एकदिवस काळजी वाटून तिला असाच फोन करेन का? आणि मग काय म्हणेल ती "माझ्या घरामधे तू लक्ष नको देऊस ग ममा?" असच म्हणेल का? काय असेल माझी तेव्हा रिअ‍ॅक्शन?"… हा सगळा विचार करत नाहीये आणि तसही हे वर्तुळ असलं तरिही असच ह्याच क्रमाने होणार नाही काही सगळं. पण प्रत्येक वेळी त्या त्या फेज मधून जाताना कुठेतरी मनामधे ह्या वर्तुळाकार नात्यातल्या जुन्या गोष्टी एक क्षण डोळ्यापुढून जातील.

शेवटी काहीही म्हणा, पटकन मान्य करा किंवा करु नका, नाती आपापली फ्रेम घेऊन येतात. काळाप्रमाणे आणि ज्याच्या त्याच्या स्वभावा प्रमाणे ह्या फ्रेमचं रंगरुप थोडं थोडं बदलतं इतकच.

माझी आई आणि आजी, मी आणि आई आणि आता पिल्लू आणि मी चक्र तर चालूच रहाणार. काही गोष्टी बदलतील, काही बदलल्यात असं वरुन तरी भासेल पण शेवटी चक्र ते चक्रच, काही गोष्टी ह्या कालातीत असतात. नात्यांमधल्या व्यक्तींच्या जागा बदलतात पण नातं तसच असतं वर्तुळासारखं हेच खरं.



मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०११

मी जुन्या फांदीप्रमाणे लागले वाळायला

मी जुन्या फांदीप्रमाणे लागले वाळायला
अन मला जाळून आता लागले जाळायला

टाळण्यासाठी बहाणे शोधिले त्यांनी किती?
मीच सोयीने बहाणे लागले पाळायला

जाण आता गाळलेले अर्थ सारे तो म्हणे
मीच माझे शब्दही मग लागले गाळायला

तू कशाचा रे पुजारी जाणले मी हे जरी
का तुझ्या खोट्या रुपावर लागले भाळायला?

छापलेले सर्व जे मी ठेविले माळ्यावरी
का पुन्हा मी तेच सारे लागले चाळायला?