शनिवार, १२ फेब्रुवारी, २०११

चक्र /वर्तुळ भाग ४

"आईSS, आता लहान आहे का मी? लग्न होऊन मला एक मुलगी पण झालेय ..! मी बघेन ग काय नी कसं मॅनेज करायचं सगळं ते. तू कशाला पण आईंना असं बोललीस..."

"अगंSS.. पSण..."

"पSSण काय पण, तू नको मधे पडूस ह्यात, मला करुदे ना हॅन्डल माझ्या पद्धतीने. तू पडतेसच कशाला ह्या घरातल्या गोष्टींमधे?"

"अगं.. पण सहज बोलले मी. कुणी काही बोललं का तुला त्यावरुन?"

"रामायण झाल्यावर मगच तुला पटणार का माझं म्हणणं? आणि मी फोन ठेवतेय आता, अख्या बिल्डींगला कळेल ह्या आवाजात अजून बोलले तर ..कोण कोणास काय म्हणाले ते"

फोन कट केला नी अभिची एंट्री झाली. शेवटची तारसप्तकातली वाक्य कानावर पडली त्यावरुन त्याला कल्पना आलीच काय झालं असेल त्याची.

"फोन मधुन धूर येतोय मनु" त्याने तरिही विनोदाचा क्षीण प्रयत्न केला आणि चुकीच्या वेळी चुकीचा विनोद केल्याची शिक्षा म्हणून एक जळजळीत कटाक्ष त्याच्याकडे फेकला गेला.

"तू ना तुझ्या आईवरच गेल्येस बहुतेक. काय कुठे बोलावं ते कळतच नाही तुला" मुद्दाम खवट बोलणं होतं की अजून एक विनोदाचा फुटकळ प्रयत्न ह्यात न पडता तिने..."होSS ना! तुम्हाला कळतं नाSS???" म्हणत वार परतवला त्याचा.

ह्यातलं तुम्हाला हे "आदरार्थी एकवचन" नसून "अनेकवचन" होतं हे लक्षात येऊन विषय बदलला नाही तर आज तिसरं महायुद्ध नक्की घडणार ह्याची जाणिव होऊन तो शहाण्या नवर्‍याची भुमिका पार पाडण्यासाठी गप्प बसून तिला कामात मदत करत राहिला.

तिने पुन्हा फोन लावायला घेतला तेव्हा गोंधळून त्याने "आता पुन्हा काय..?" असा चेहरा केला त्यावर "तुम नही समझोगे, लडकीया होती ही ऐसी है" असा डायलॉग, त्याला तिने न बोलताच ऐकू आला

-------

"म्हणे ह्या घरातल्या गोष्टींमधे कशाला पडतेस?" " हे घर... म्हणजे?" "काल परवा पर्यंत माझी लेक होती ना ही शेखर?" "आता एकदम परक्यासारखी तोडून बोलली? का? काय केलं मी इतकं? तिची काळजी वाटून सहज बोलले ना मी?"

"हो पण निमाबाई ती आहे की समर्थ. ठेवा की तिच्यावर विश्वास. आता लेक सासरी गेलेय आपली. तिला तिचा संसार तिच्या चुक बरोबर सकट करुद्यात की. काळजी ठिक आहे पण… इतकंही गुंतणं योग्य नाही"

"तुला काय जातय बोलायला? म्हणे गुंतणं योग्य नाही. जीवाला घोर लागतो तो जाणायला आईच व्हायला हवं"

"आता गेली का गाडी पुन्हा त्याच ट्रॅक वर...! चला विषय बदला..."

"असं म्हंटलं की झालं तुझं, तरी पण चूक नाहीये म्हणणं तुझं. कळतय पण नाही वळत असं काहीसं होतय"

"फोन वाजला निमाबाई, घ्या लेकीचाच असणार.. बोला जरा ते डोळे पुसून.."

"हम्म! बोल... नाही ग रागावले नाही मी..बSरं.... होS अगं SS...... चल बाळा काळजी घे. फोन ठेवते आता"

------------

"बरं राणिसरकार, तुमचा क्राईंग एपिसोड संपला असेल तर आपण जेवून घेवुयात का आता? आई बाबा पण आलेत आत्ताच"

"मला नव्हतं रे दुखवायचं तिला असं, मी आधी तेच व्यवस्थित सांगायचा प्रयत्न करत होते तिला. पण.. तिच्यापर्यंत ते पोहोचतच नव्हतं आणि मग गेलं माझ्या तोंडून निघून तसं... पण वाक्य बोचरं असलं तरी फॅक्ट आहे ना ती..?

सल्ला देणं एखादवेळेस ठिक आहे पण उठसुट अशी काळजी वाटून ‘मी खाते किती, झोपते किती, काम किती करते’ असं प्रत्येक बाबतीत विचारत राहिली ... बर विचारणं पण ठिक म्हणते मी, पण मला विचार ना काय विचारायचं ते.

"कित्ती काम पडतं ना मनुला" टाईप वाक्य डायरेक्ट आईंना ऐकवायचं म्हणजे...! वादाला कारण नाही होणार? मSग, तेच सांगत होते तिला. मी आहे ना समर्थ माझ्या स्वत:साठी बोलायला! एकतर कानाला यंत्र लावत नाही, इथुन घसा फ़ोडून सांगावं लागतं त्यातही भेटल्यावर बोलू म्हंटलं तरी तिलाच रहावत नाही मग विषय जातो वाढत आणि फट्ट दिशी तुटतो.. रबर ताणलेला"

"तू बघशील अभी, मी खूप चांगली आई होईन. म्हणजे माझी आई खूप चांगली, प्रेमळ आहेच रे पण मी ना पिल्लूला एकदम वेगळं वाढवेन, पुर्ण मोकळेपणा देईन, तिची मैत्रिण होईन. तिच्या बाबतीत बिलकूल पझेसिव्ह रहाणार नाही...."

"मातोश्री आता सध्या जेवायची कृपा कराल का? तुमचं पिल्लू सध्या तुमच्या करता थांबलय जेवायचं"

"तू हो पुढे मी आलेच.."

----------

पिल्लू - वय वर्ष २/३ - "आई...आऽई आऽऽई आऽऽऽई आणि फक्त आई"

पिल्लू - वय वर्ष ४ "आई... आमच्या बाईऽऽ किनई..... बाईं म्हणतात... बाई अशा नी बाई तशा" आणि तरिही ऍट द एण्ड ऑफ़ द डे "आऽई तू कोणाची आहेस? फक्त माझी आहेस ना?" "माऽऽझी आई..मी तुला कध्धी कध्धीच सोडून जाणार नाही"

- वय वर्ष ५ "आई, मी तनु कडे जाऊ आज पुर्ण दिवस रहायला? तनू माझी बेस्ट फ्रेंड आहे तुला माहितेय!...... प्लीऽऽज"

- वय वर्ष ७ "आई, मला ना तुझ्यापेक्षा निशूताई जास्त आवडते समोरची..."

- वय वर्ष …. - ब्लाऽऽऽऽब्लाऽऽऽऽ ब्लाऽऽऽह ……

- वय वर्ष …. - "........................"?????

----------------

खोटं का बोलू आधीची सगळी वाक्य मनाला कुठे तरी सुखावून जायची. मी पझेसिव्ह नाही असं म्हंटलं तरिही मला सुखवायची. आणि तिच्याकडून मी कसलीच अपेक्षा ठेवणार नाहीये हे स्वत:ला आणि इतरांना ठासून सांगितलं वेळोवेळी तरी देखील .."आई, मला ना तुझ्यापेक्षा निशूताई जास्त आवडते समोरची..." हे वाक्य कुठेतरी सुक्ष्मसी कळ देऊन गेलं....एका क्षणापुरतं का होईना, गेलं काहीतरी दुखावून.

का? माहित नाही. कदाचित माझा पदर सोडून पिल्लू आता वेगळं वर्तुळ तयार करतय ह्याची जाणिव एकाच वेळी सुखावणारी आणि आता असा आणि इतका फक्त आमचा आमचा असा सहवास रहाणार नाही ह्या जाणीवेने दुखावणारी ... त्यातूनच आलं असेल ते खट्टूपण.

गोष्ट खरं तर तीळा येव्हढी छोटीशी... अजून पुढे जाऊन ह्या गोष्टीचं काही वाटणार नाहीच, तसच कशाला ते खट्टुपण देखील फ्रॅक्शन ऑफ़ सेकंद म्हणतो तसं तरळलेलं. ह्यालाच पझेसिव्ह नेस म्हणतात का? पण मी अजिबात पझेसिव्ह होणार नाहीये हे मी किती तरी वेळा घोकलय की मनाशीच माझ्या.

अजून "दिल्ली बहोत दूर है …" बरच काही घडणारे ह्यापुढेही, टिन एज जसं येईल तसं बर्‍याच उलथापालथी होतीलच म्हणा. आणि मग वय वर्ष अमुक तमुक - च्या पुढे ते ब्लाऽऽह ब्लाऽऽह ब्लाऽऽह वाले रिकामे रकानेही भरले जातील.

"चिंगी महिन्याची झाली नाही तोच" चा अंक प्रक्षेपीत करत मी...." मग मी पण एकदिवस काळजी वाटून तिला असाच फोन करेन का? आणि मग काय म्हणेल ती "माझ्या घरामधे तू लक्ष नको देऊस ग ममा?" असच म्हणेल का? काय असेल माझी तेव्हा रिअ‍ॅक्शन?"… हा सगळा विचार करत नाहीये आणि तसही हे वर्तुळ असलं तरिही असच ह्याच क्रमाने होणार नाही काही सगळं. पण प्रत्येक वेळी त्या त्या फेज मधून जाताना कुठेतरी मनामधे ह्या वर्तुळाकार नात्यातल्या जुन्या गोष्टी एक क्षण डोळ्यापुढून जातील.

शेवटी काहीही म्हणा, पटकन मान्य करा किंवा करु नका, नाती आपापली फ्रेम घेऊन येतात. काळाप्रमाणे आणि ज्याच्या त्याच्या स्वभावा प्रमाणे ह्या फ्रेमचं रंगरुप थोडं थोडं बदलतं इतकच.

माझी आई आणि आजी, मी आणि आई आणि आता पिल्लू आणि मी चक्र तर चालूच रहाणार. काही गोष्टी बदलतील, काही बदलल्यात असं वरुन तरी भासेल पण शेवटी चक्र ते चक्रच, काही गोष्टी ह्या कालातीत असतात. नात्यांमधल्या व्यक्तींच्या जागा बदलतात पण नातं तसच असतं वर्तुळासारखं हेच खरं.



मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०११

मी जुन्या फांदीप्रमाणे लागले वाळायला

मी जुन्या फांदीप्रमाणे लागले वाळायला
अन मला जाळून आता लागले जाळायला

टाळण्यासाठी बहाणे शोधिले त्यांनी किती?
मीच सोयीने बहाणे लागले पाळायला

जाण आता गाळलेले अर्थ सारे तो म्हणे
मीच माझे शब्दही मग लागले गाळायला

तू कशाचा रे पुजारी जाणले मी हे जरी
का तुझ्या खोट्या रुपावर लागले भाळायला?

छापलेले सर्व जे मी ठेविले माळ्यावरी
का पुन्हा मी तेच सारे लागले चाळायला?



बुधवार, २ फेब्रुवारी, २०११

ती सांज हरवूनी गेली


ती सांज हरवूनी गेली
जी कधी भावली होती

स्पर्शाची अनवट गोडी
अन नि:शब्दाची बोली
मज जिने शिकवली होती
ती सांज हरवूनी गेली..

काळाच्या लाटेमधे
ती सांज वाहूनी गेली
जाताना आठवणींची
ती नक्षी ठेवूनी गेली

ती गेली हरवून आणि
मी वाट हरवुनी बसले
मौनाची कोणती बोली?
मी शब्दही विसरुनी गेले

रात्रीची वाटता भिती
मग मिटून मी ही गेले
पिंजरा घालुनी भवती
मी त्यातच मग फ़डफ़डले

कढ दाटूनी येतो जेव्हा
मज सोबत करते नक्षी
मग उडूनी जातसे तेव्हा
मन पिंजर्‍यातला पक्षी



बुधवार, १२ जानेवारी, २०११

प्रेमग्रंथके पन्नोपर...

प्रकरण - १

त्याने तिच्या डोळ्यात बघीतलं... तिने त्याच्या डोळ्यात बघीतलं, बघता बघता दिलाची धकधक वाढली, डोक्यात प्रेमाची घंटी वाजली आणि त्याच्या डोळ्यात ती जग विसरुन विरघळून गेली. हे असं प्रेम प्रत्यक्षात सोडा कागदावर देखील जमणं, मला ह्या जन्मी तरी इऽ म्पॉऽ सिऽ बऽ ल.

नाही म्हणायला लग्न ठरल्यावर इतर नॉर्मल लोकांसारखेच आम्हीही अगदी रोज नेम असल्या सारखे एकमेकांना भेटलोय, बर्‍याचदा घरातल्या मोठ्यांना शेंड्या लावून गुपचुप हा भेटीचा कार्यक्रम केलाय, फ़ोनच्या रिंगचे पण कोडवड्‌र्स ठरवून झाल्येत त्यावेळी. ह्या आणि अश्यासारख्या आणखी बऱ्याच काही बाही किरकोळ, आणि काही कागदावर न मांडता येण्यासारख्या गुलाबी गोष्टी केल्यात नाही असं नाही तरीS पSSण.. खास फ़िल्मी.. कादंबरीमय गुलाबी प्रेऽऽम?????? श्याऽऽ कधी जमलच नाही.

त्याने कधी गुडघ्यात वाकून.. हातात गुलाब धरुन "आय लव्ह यु" म्हंटलं नाही आणि मी कधी अंगठ्याने जमिनीवरची माती उकरत.. पदर नाहीतर ओढणीशी चाळा करत मान वेळावत.. "आम्ही नॉऽय जॉ" असं उगाचच लाज पांघरत ओठाचा चंबू करत लाडीकपणे म्हंटलं नाही.

हे असं काही स्वत: उठून करणं एकवेळ बाजूला ठेवूयात पण असं काही, कागदावर त्या हिरो हिरविणीकडून करुन घ्यायला देखील पेन हातात धरणार्‍या हातातलं रक्तं गुलाबी असावं लागतं बहुतेक, कारण ते ही कधी जमलं नाही

पण ह्यावेळी मी अगदी नेटाने प्रयत्न करुन गुलाबी लिहायचं ठरवलं. वातावरण निर्मिती चांगली व्हावी म्हणून.. आणि आमच्या मनगटातील रक्त तापट ताम्रवर्णी असल्यामुळे, मी गुलाबी कागद आणून बघुयात असा विचार करुन गुलाबी कागद घेवून आले. घासाघीस करुन वीस रुपयांना सहा गुलाब आणून ते डायनिंग कम रायटिंग टेबलवर काचेच्या ग्लासात ठेवले. मी स्वत: गुलाबी रंगाचा ड्रेस घालून बसले. बरोबर प्रेमकथांचा बायबल कम गीता कम कुराण जे म्हणाल ते घे‌ऊन बसले आणि त्या "प्रेमग्रंथ के पन्नोपर" दिल्या बरहुकूम केली सुरुवात "अ" आणि "ब" च्या गुलाबी पहिल्या भेटीबद्दल लिहायला.

पहिल्यांदा "अ" ला सायकल वरुन येताना दाखवला, "ब" शी त्याची टक्कर हो‌ऊन "ब" ची पुस्तकं खाली पडतात आणि बॅगरा‌ऊंडला गाणं वाजतं असं लिहीलं. काय करणार? पुर्वीच्या सिनेमांचा इंपॅक्ट! नुसता सिनेमांचा नाही हा, माझ्या शाळेतल्या मला सिनि‌अर्स असणार्‍या आणि त्यावेळी तरी प्रेमजोड्या बनलेल्या लैला मजनूंचा पण इंपॅक्ट म्हणाना आता त्यातल्या बर्‍याच जोड्यांचं "दो हंसो का जोडा बिछ्ड गयो रे" झालय आणि तरिही "दे लिव्ह्ड हॅपिली एव्हर आफ्टर.." असाच एण्ड झालाय ती गोष्ट वेगळी.

पण भर रस्त्यात असं कोणी कोणाचा धक्का लागून पडेऽल, मग आपण गाऽणं म्हणू, सूऽर दे‌ऊ म्हणत ही मंडळी त्याच रस्त्यावर कुठेतरी लपून बसल्येत कामधाम सोडून असं दृष्यं कितीही स्वप्नं स्वप्नं म्हणून ओरडले तरी डोळ्यापुढे काही ये‌ईना.

मग तो प्रसंग बदलायचं ठरवून कॉलेज मधेच पहिली भेट झाली असं लिहायचं ठरवून पेन चालवायला घेतलं. पण हाऽय रे दैवा! तिथेही आमचं ताम्रवर्णी रक्त आड आलं आणि काही केल्या "प्रथमं तुजं पाहताऽ... जीव वेडाऽऽवला.." काही मनात वाजलं नाही आणि कागदावरही उमटलं नाही.

मग सध्या टि‌आरपी रेस मधे आघाडीवर (?) असलेल्या (निदान आमच्या घरात तरी रेस मधे आघाडीवर असलेल्या आणि अधून मधून ना‌ईलाजास्तव बघाव्या लागणार्‍या) सिरि‌अल्सना साक्षी ठेवून विचार करावा म्हंटलं तर तिथेही आमच्या मनाच्या घोड्याने पेंड खाल्लं मी कन्फ़्युज्ड झाले, "अमर प्रेम" मधे दाखवल्याप्रमाणे आधी भांडण दाखवून मग मैत्री.. प्रेम असे टप्पे दाखवू? त्यात पण आजचे ज्वलंत (?) विषय घुसडवून कहानी मे (ओन्ली) ट्विस्ट लावू की "माझिया प्रियाला प्रीतं कळेना" सारखं त्यांच्यात आधी मैत्री, प्रेम दाखवून घरच्या घरीच हर्डल रेस असल्यासारखे मधे मधे बिब्बे घालू? श्या विचार करुन करुन नमनालाच घडाभर तेल खर्ची झालं. तरी बरं त्या कॅन्सर वाल्या सिरि‌अलला पुर्ण विराम मिळालाय आणि भाग्यलक्ष्मी सध्या आ‌ऊट ऑफ़ फ़ोकस (आमच्या घरातून आउट ऑफ फोकस ) आहे नाहीतर मी पार भंजाळूनच गेले असते. :फ़िदी:

पण तरिही गाडी काही पुढे सरकत नव्हती. म्हंटलं जा‌ऊदेत भेट बीट, टक्कर बिक्कर, ह्या न झेपणार्‍या कामांनी चक्कर यायच्या आत आपण पुढचं वर्णन बघुयात जमतय का ते. फ़ार तर काय भेट कशी झाली ते दाखवायला फ़्लॅशबॅकचा वापर करावा लागेल हाय काय नाय काय!

तर आता भेटीचं वर्णन बाजूला ठेवुयात. भेटला असेल हा "अ" त्या "ब" ला "क्ष" ठिकाणी असं समजुयात (डोन्ट वरी फ़्लॅशबॅक है ना! ) (आता म्हणाल "अ" "ब" "क्ष" ही कसली अनरोमॅंटीक नाव. तर लोकहो आता नावांच्या घोळामधे अजून अर्धा तास दवडण्या इतकी शा‌ई काही माझ्या पेनात नाही तेव्हा थोडावेळ घ्या की चालवून तशा काय कमी गोष्टी चालवून घेता काय एरव्ही ) मुळ मुद्दा काय तर ते भेटले नी प्रेमात पडले. प्रेमाच्या बायबल कम गीता कम कुराण अशा त्या प्रेमग्रंथचा पुढचा अध्याय वाचायला मी सुरुवात केली त्याशिवाय माझ्या पेनात ताकद कशी येणार हो?. "प्रेमजीवांचे वर्णन" ह्या धड्यावर ये‌ऊन थांबले.

कसाS दाखवावा बरं..अं... "अ"? गोरापान? मेघंS सावळाSS माSझा राSजा? की ऍंग्री यंग मॅन? की मिक्श्चर ऑफ़ ऑल? आणि कशी दाखवावी "ब"? गोरी गोरी पान फ़ुलासारखी छान जणू फ़े‌अर ऍंड लव्हली ची मॉडेल? की बिप्स सारखी स्मार्ट (?) सावळी (?) कशी का असेना पण ती हटके हवी हे वाक्य अगदी अधोरेखीत करुन ठेवलय पुस्तकात. आणखी एक मुद्दा अधोरेखीत केलाय त्यात ,तो म्हणजे "प्रेमात पडलेले जीव एकमेकांसाठी राजकुमार आणि अप्सराच" दुसरी काहीही उपमा नाही. "दिल आया गधी पे तो परी क्या चीज है" हे आपण म्हणतो, त्या फ़िल्ड करता आ‌ऊटसायडर्स लोकं पण तिच्या चष्म्याने तो "राजकुमार" आणि त्याच्या डोळ्यात ती "अप्सराच" . तेव्हा आपल्याला गधी वाटो नाहीतर आणखी कोणी लिहिताना मात्र त्यांचा गुलाबीवाला चष्मा लावूनच लिहायचं म्हणजे मग दोघे अगदी तस्सेच दिसणार "राजकुमार आणि अप्सराच" अगदी. आठवा की सैफ़ आणि अमृता सिंगची त्यांच्या गूड ओल्ड डेज मधली जोडी. एरव्ही तुम्ही त्यांना काय वाट्टेल ते म्हणू शकाल पण त्यांचा चष्मा लावलात तर म्हणाल ना ते दोघेही अगदी "राजकुमार नी अप्सरा" म्हणून! गेलाबाजार जुन्या जमान्यातली संध्या आठवा. नाहीतर कालपरवाची माधुरी (हो हो तिच ती रामाची सिता) आठवा. डोळे वटारु नका ती अप्सराच आहे पण तिला म्हणे कोण तो झिपर्‍या संजय दत्त आवडला होता एकेकाळी (मला नाही हो कधी खरं वाटलं मी अफवा अफवा म्हणून उडवून लावलं पण लोकं म्हणतात असं) तर सांगा आहे का तो ह्या अप्सरे पुढे कोणी? पण लावला होता ना तिने चष्मा म्हणून दिसला असेल तिला तो राजकुमार. चष्मा फुटला आणि पुढचं संकट टळलं म्हणे. आता तो अभिषेक बच्चनांचा ज्युनिअर, वाटलाच ना अ‍ॅशला राजकुमार (कोण ते मला फटके देऊ का म्हणतय? त्यांनी चष्मा काढून हेच वाक्य म्हणावं ) तर असो थोडक्यात काय त्यांच्या नजरेला ते राजकुमार आणि अप्सराच असतात.
थंबवाला रुल नंबर एक तर कळला मला त्याखाली अजून एक महत्वाचा असाच थंबवाला (अंगुठेछाप) रुल नंबर दोन दिसला. तो असा "तो आणि ती वर्णाने गोरे असोत की सावळे, गुणाने मात्र दोघेही दुधापेक्षाही गोरे हवेत. दोघेही सर्वगुणसंपन्न, म्हणजे ती अधोमुखी, नम्र, प्रेमळ, सुंदर, सोज्वळ स्मार्ट हवी म्हणजे हवीच. त्यात ग्रे शेडींग अजिब्बात चालणार नाही म्हणजे नाही. आणि "तो" देखील हुषार, नम्र, देखणा अगदी आदर्ष पुरुष असाच हवा. हवा म्हणजे काय हवाच. त्यालाही "नो ग्रेड शेडींग" रुल आहेच.

आणि हो जेवणात जसं लोणचं हवं चवी पुरतं तसं दोघांचा हा मनाचा दुधाळ गोरेपणा हायला‌ईट व्हायला एखादा त्याचा मित्रं किंवा तिची मैत्रिण किंवा असं एखादं कॅरेक्टर हवं जे मनानं एकदम काळं कुट्टं आहे. काळं कुट्टं इतकं की अमावस्येचं आकाश देखील त्याच्या पुढे उजळ ठरेल. त्यात कॉंप्रमा‌ईज चालणार नाही. मग ती व्यक्ती "ती" असेल तर तिच्या पेहरावात काहितरी भडक आणि ठसठशीत हवच म्हणजे भांगापासून नाकापर्यंतं येणारं कुंकू वगैरे किंवा तत्सम काहीतर. थोडक्यात काय तर लहान मुल घाबरुन रडेल असा मेकअप हवा तिचा. आणि व्यक्ती जर "तो" असेल तर शकुनी मामा छाप काहितरी हवच. आणि हो त्यांचं एकच काम त्यांनी सारखे बिब्बे घालायचे स्टोरीत आणि द एण्ड लवकर होण्यापासून वाचवायचं .

मग तो अंगुठेछाप म्हणजे थंबवाला रुल नंबर एक वाचून पुढे लिहायला बसले. "लैला को देखो मजनू की नजरसे" तसच "ब" को देखो "अ" की नजरसे म्हणत केलं तिला एकदम "सर्वगुणसंपन्नं अप्सरा" आणि तिच्या नजरेने बघत बघत त्यालाही केला "सर्व गुणसंपन्न राजकुमार"

आणि अंगुठेछाप म्हणजे थंबवाला रुल नंबर दोन वाचून आणला मधे एक बिब्बा त्यांच्या. दिलं त्या बिब्ब्याला नाव "क" आणि केलं त्या "क" ला खलनायिका.

येव्हढं लिहीपर्यंत दिवेलागणीची वेळ झाली. मग ती गुलाबी गुंडाळी तशीच ठेवून कुकर लावायला उठले.

आणि त्या ग्रंथातपण हेच लिहीलेलं होतं रुल नंबर तीन म्हणून, हेच म्हणजे लेखिकेने वरण भाताचा कुकर लावावा हे नव्हे तर कहाणी अशी एकदम सांगून संपवायची नाही हे लिहिलेलं. कहाणी कशी असावी तर म्हणे "ती डेली सोपसारखी वर्षानुवर्ष तरी चालायलाच हवी किमान पक्षी क्रमश:ची एण्ड नोट कमीत कमी १०-१२ वेळा तरी लागायलाच हवी"

म्हंटलं सोप्पं आहे आपण आपला "टिंब टिंब" लोकांचा नियम लावायचा. ते कसे जेवायला २ माणसं असोत नाही तर २०, डाळ तेव्हढीच १/२ भांड लावतात आणि वर म्हणतात "तुम्हाला काय कळणार, पाण्यालाही चव आणते ती खरी सुगरण!" तस्सच करायचं २ भाग कसले २ पॅरेग्राफ़ मधे संपणारं मटेरि‌अल चु‌ईंगम सारखं ताणून ताणून २० भागापर्यंत न्यायचं. त्या च्यु‌इंगम मधला सगळा रस संपून ते दाताला, ओठाला चिकटून दात दुखायला लागेपर्यंत ताणायचं आणि ताणण्याचं समर्थन म्हणून टि‌आरपीचं तुणतुणं वाजवायचं की झालं.


प्रकरण - २

तर उदरभरण झाल्यावर लिहायला सुरुवात केली, हो मला रिकाम्या पोटी गुलाबी बिलाबी विचार देखील जमत नाहीत.

"अ" ची भेट होते "ब" शी "क्ष" जागी. दोघेही प्रेमात पडतात आणि मधे येतो बिब्बा "क" नावाचा. मग पुन्हा एकदा सिरि‌अल्सचा नवनीत गा‌ईड सारखा वापर करत "क" चे थोडे काळे कुट्ट प्रताप दाखवले आणि रंगवले ताटातूट, हर्डल रेस चे प्रसंग. मग समज गैरसमज की परत सगळं निवळून सुरु होते "एका लग्नाची गोष्ट". चला संपली एकदाची गोष्ट लग्नाच्या अक्षता दे‌ऊन. त्या पुढचा भाग हा प्रेमग्रंथामधे येत नाही, तो संसारचक्र नावाच्या क्रमिक पुस्तकाचा भाग आहे त्यामुळे गुलाबी स्टोरीचा दि एण्ड, अक्षता घे‌ऊनच दाखवायचा हा थंबवाला रुल नंबर चार आहे त्या प्रेमग्रंथातला.

प्रकरण २ फ़ारच छोटं झालय का? को‌ई बात नही, घालते नंतर पाणी त्यात. आहे की फ़ंडा माझ्यापाशी तो माझ्या ओळखीच्या टिंब टिंब लोकांचा .पण प्रकरण २ चा इतकाच भाग लिहिपर्यंत रात्रीचे १२ वाजत आलेले म्हणून कष्टाने ते गुलाबी भेंडोळे दिले गादीखाली ठेवून नी डोळे मिटून निद्रादेवीच्या आधीन झाले.

जर्रा नाही झोप लागत तर खोलीत कोणाचे तरी चढेल स्वर कानावर आले. उठून बघते तर काय तीन जणं - दोन मुली आणि एक मुलगा मला घेराव घालून रागाने बडबड बडबड करत होते. मला वाटलं चोर शिरले की काय माझ्या घरात? आजकाल चोर पण एकदम बन ठनके येतात की काय? एकदम कोण्या देशीचा राजकुमार नी स्वर्गिय अप्सरा बनून? अशी एक शंका मनाला चाटून गेली. तेव्हढ्यात ती त्या तिघांमधली अप्सरा वचावचा शिव्या द्यायला लागली अगदी ट्रेन मधल्या भांडणात बायका देतात तसल्या शिव्या तिच्या शिव्यांमधे पेरलेल्या शब्दांवरुन माझ्या थोडं थोडं लक्षात आलं की ही बया सॉरी अप्सरा तर माझ्या त्या गुलाबीवाल्या कथेतली हिरवीण आहे. अरेच्चा! पण ही अधोवदना, सलज्ज, सालस मुलगी का अशी अचानक बिब्बेवाली सारखे रंग दाखवायला लागली? माझ्या मनात प्रश्न उमटतोय नाही तोच तो राजकुमार पण तिची री ओढत माझ्याशी भांडायला लागला. "तुझ्यावर केस करीन" म्हणाला. "केस करीन?" कम्माल आहे बॉ ह्यांची. तर ती तिसरी मुलगी ढसाढसा रडायला लागली. हे मात्र अती होतं अगदी. तिचा रोल काऽऽय ती रडतेय काऽऽय? जिने रडायचं ती भांडतेय आणि जिने काळेकुट्टं प्रताप करायचे ती रडतेय? काय चाल्लय काय? हे असलं काही वळण नव्हतं लिहीलं त्या "प्रेमग्रंथ के पन्नोपर" !

म्हंटलं "तुमची मागणी तरी काय?" " इतकी छान त्या ग्रंथाबरहुकूम कथा लिहीली मी मग का बर माझ्यावर इतका राग?" त्यांचा जरा कमर्शि‌अल ब्रेक साठी स्टॅच्यु होताच मी कसं बसं माझं वाक्य पुर्ण करुन घेतलं.

"मला गुडीगुडी वागून कंटाळा आलाय" अ आणि ब दोघांनी एकदमच तक्रार केली

"आणि मला नुसतं वा‌ईट्ट वा‌ईट्ट वागून कंटाळा आलाय" बिब्ब्याने संधी मिळताच बोलून घेतलं.

"आमच्या ब्लॅक एण्ड व्हा‌ईट शेड्सची सरमिसळ करा नाहीतर कोर्टात खेचू" असं त्या तिघांनी एकमतानं एकवलं.

"दुसर्‍या दिवशी बघते" असं मंत्र्यांच्या स्टा‌ईल मधे आश्वासन देत मी ती वेळ निभावून नेली. दुसर्‍या दिवशी कामाच्या धामधुमीत विसरुनच गेले मी असं काही आश्वासन दिलय ते (हे ही पोलिटिकली करेक्टच म्हणा)

लक्षात आलं तेव्हा धावत बेडरुम मधे जा‌ऊन ते भेंडोळं शोधायला सुरुवात केली. ते भेंडोळं गायब होतं तिथून. म्हंटलं सुंठी वाचून खोकला गेला. पण कसचं काय लेकीची हाक ऐकून बाथरुम मधे डोकावले तर दिसलं, त्या गुलाबी कागदाची गुलाबी होडी करुन लेक अंघोळीच्या टबात होडी होडी खेळत बसलेली.

एकदम धस्सं झालं, म्हंटलं त्या कागदावरच्या तिघांचं काय झालं असेल आत्तापर्यंत? मग लेकीचा आरडा ओरडा काना‌आड करत मी ती होडी पाण्यातून बाहेर काढली आणि भीत भीत त्या तिघांकडे बघितलं. पाण्यामधे भिजल्याने तिघांचे रंग ओळखू न येण्या इतके एकत्र झालेले. खा परत शिव्या लेखिका बा‌ई म्हणत तिघांकडे पुन्हा एकदा बघायचं धैर्य दाखवलं, तर काय? ती तिघेही चक्क शीळ घालत हसत होती आणि लेकीला धन्यवाद देत होती, त्यांना हवे होते तसे रंगांचे शेडींग झाले होत म्हणून.

माझी मात्र "केस होणार माझ्यावर" ही एकमेव चिंता अशी झटकन मिटली.

प्रकरण ३ चांगलाच धडा शिकवून गेले आणि भविष्यात ते रुल्स बरहुकूम लिहून केस होण्याची आफ़त मी ओढवून घ्यायची नाही हे ठरवून पण टाकलं. त्याप्रमाणे माझा मीच ठरवलेला थंबवाला रुल नंबर फ़र्स्ट एण्ड लास्ट म्हणून तो प्रेमकथांचा बायबल कम गीता कम कुराण असलेला "प्रेमग्रंथं" दिला माळ्यावर टाकून.

एक सुचना: माळ्यावर ठेवलेला तो ग्रंथं कुणाला हवा असेल तर एका आठवड्यात संपर्क साधा पुढच्या आठवड्यात मला सगळी रद्दी विकायची आहे

विषेश सुचना क्रमांक १: क्रमश: टाकायचे सगळे भाग/प्रकरणं एकत्रच टाकलेली आहेत तुम्हाला हवं तर रोज एक प्रकरण वाचा किंवा एकदमच वाचून संपवा.

विषेश सुचना क्रमांक २: भाग कंटाळवाणे वाटल्यास तो दोष ग्रंथाच्या रुल नंबर तीनचा मानावा

last but not least अशी टिप: सगळी प्रकरणं एका दमात न कंटाळता वाचून जो संपवेल, इथे हसून पहिली प्रतिक्रिया नोंदवेल आणि तरिही त्या ग्रंथाची मागणी संपर्कातून करेल त्याला कुरि‌अरचा खर्च माफ़

शुक्रवार, २४ डिसेंबर, २०१०

नको खंत आता

झुगारुन दे बंधने तू मनाची
उगा बाळगा का, भिती ही कुणाची?

असे' ही खुपावे, 'तसे' ही खुपावे
अशी रीत आहे, इथे ह्या जगाची

उद्या काय व्हावे, न कोणास ठावे
नको व्यर्थ चिंता, करु तू कशाची

सुखाच्या क्षणांना, उराशी धरावे
नको खंत आता, व्यथेच्या क्षणाची

जसा काळ येतो, तसे त्या भिडावे
किती आळवावी, कहाणी फुकाची

कोलाज / स्लाईड शो

घरातली कामं आटपून पटपट तयार होऊन ती आईकडे गेली आणि नेहमी प्रमाणेच पुन्हा बाबांनी तिचं डोकं सटकवलं. ते बाहेर पडले आणि आईने हताशपणे तिच्याकडे बघीतलं.


"जाऊदे ग! आजारपणात माणूस जास्तच चिडचिडा होतो" तिने आईची समजूत घातली.. पुन्हा एकदा.

"आजचं आहे का हे?" आईच्या ह्या प्रश्नावर मात्र तिच्याकडे ऊत्तर नव्हतं. ती तशीच वायफळ बडबड करुन १५-२० मिनिटात तिथून निघाली आणि तिच्या तिच्या घरट्यात पडदा ओढून बसली.

तरी पुन्हा दुसर्‍या दिवशीची सुरुवात "बाबा कसे आहात?" ह्या "सुप्रभात कॉलनेच" झाली, पुढे तसेच नेहमीचेच संवाद आणि "मी करेन पुन्हा फोन" ह्या नेहमीच्याच वाक्याने शेवट.

पुन्हा विकांताला एक चक्कर त्यांना भेटायला जी त्यांच्या आजारपणाचं कळल्यापासून शक्यतो न चुकता व्हायची ... नी पुन्हा एकदा तसच गुदमरणं...

गेल्या दोन तीन महिन्यापासून जणू हे तिचं रुटीनच होऊन गेलेलं.

"तरीही का करते ती फोन? त्यांना बरं वाटावं म्हणून? तिला बरं वाटावं म्हणून? की एक मुलगी म्हणून असलेलं कर्तव्य म्हणून?" तिच्या मनात आलं.

"अफकोर्स त्यांना बरं वाटतं आणि कुठेतरी तुलाही बरं वाटतं" मनातून आतून एक आवाज तिला म्हणाला.

"हम्म! पण मग प्रत्यक्ष भेटल्यावर तो ओलावा का पटकन आटतो? का नेहमीच असं वाटतं की इथून पटकन निघून जावं? ही दुनिया पाठी टाकून पुन्हा मोकळ्या हवेत जाऊन छाती भरून ऑक्सीजन घ्यावा?"

"नक्की कोणती भावना खरी? एकाच वेळी एकाच व्यक्ती विषयी प्रेम, माया अगदी मदरली प्रेम म्हणतात तसं प्रेम आणि त्याच वेळी तितकीच तीव्र कटुता, वाटू शकते?" मनात पुन्हा एकदा ह्या प्रश्नाने गर्दी केली.

तिला ठावूक आहे ह्या सगळ्याची मुळं फार खोल बालपणात दडल्येत. कारण तिला अजूनही आठवतात सगळ्या सगळ्यांच्या.. नातेवाईकांच्या, मित्र मैत्रिणींच्या, शाळेतल्या शिक्षिकांच्या, शेजारी पाजारी अगदी इस्त्रीवाल्यापासून वाण्यापर्यंत सगळ्यांच्याच तिच्या विषयी, तिच्या भावाविषयी डोळ्यात कणव दाटलेल्या नजरा.

अजूनही आठवतं तिला बाहेरचं जग आणि घरातलं जग ह्यातलं तिचं समांतर वावरणं आणि आठवतय तिला अजूनही "हे घर माझं आहे, इथे माझेच नियम चालतील" म्हणत चालणारं "त्यांचं" हुकूमशाही वागणं.

"त्यांच" लोकांच्या देखत स्वतःच्याच थोबाडात मारुन घेणंही आठवतय स्पष्ट अजुनही आणि मग बुरखा घालायची मुभा असती तर बर... कोणी तिला बघायला नको नी कोणाला तिने असं तिला वाटायचं त्याप्रयेक वेळी हे देखील आठवतय अजूनही तितकच स्पष्ट.

ऐन दहावीच्या परिक्षेला सिंगल रुम मधे रहाताना टेबल लँपचा प्रकाशही त्यांना सहन होत नाही म्हणून.. आणि हे घर त्यांचं आहे ह्या एका वाक्यामुळे भावाला शेजार्‍यांच्या दाराबाहेरच्या दिव्याखाली करावा लागलेला अभ्यासही आठवतोय आणि त्याच्या तिथे तसं बसण्यामुळे आईचही त्याच्या बाजूला बराच वेळ बसून मूक सोबत करणं... तिचं तिच्या भावावर असलेलं अपार प्रेम आणि त्यातूनच कधी त्याच्या बाजूने तर कधी स्वतःसाठी, आईसाठी अस करत तिच्या त्यांच्याशी उडणार्‍या चकमकी.... हे सगळं सगळं आणखीही काही बाही बरचसं आठवत रहातं तिला.

आणि त्याच बरोबर हे देखील की ही कवितेशी मैत्री देखील त्यांच्यामुळेच आहे. पुस्तकांच्या दुनियेशी ओळख आणि लहानपणचा खूप सुंदर अशा हँडमेड पेपर वर छापलेल्या.. त्याकाळी महाग असणार्‍या अनुवादीत रशियन कथांच्या पुस्तकांच्या कलरमय जगातला वावर देखील त्यांच्यामुळेच आहे.

तिचं लग्न ठरलं तेव्हा "त्यांच" गुपचूप डोळे पुसून घेणही आठवतं आणि पहिला महिनाभर तिचं बाळ रात्री लाईट बंद करताच रडायचं तेव्हा अख्ख्या खोलीभर दिवे लावून त्यांचं दिवाळी साजरी करण देखील आठवतं

तरीही .. अजूनही अधून मधून झटका आल्यासारखं दुखेलसं बोलणारेही तेच आहेत आणि ती निघून गेल्यावर आईपाशी "मी खूप वाईट वागलो" अशी कबूली देणारेही तेच आहेत.

त्यामुळेच की काय तिला वाटायचं दारु हे जसं एक व्यसन आहे ना तसाच हेकेखोर, तापट स्वभाव हे देखील एक व्यसनच असलं पाहीजे. नाहीतर कवितांच्या दुनियेत रमणारा माणूस इतका कसा विक्षिप्त वागू शकतो!

कदाचित त्यांचं बालपण, त्यांचा स्वभाव आणि दरवेळी आलेलं अपयश ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम असू शकेल... किंवा स्वभावामुळे अपयश आणि मिळणार्‍या प्रत्येक अपयशाबरोबर वाढत जाणारा तापटपणा असही होत असावं .

तसही प्रत्येक क्रिकेटर "सचिन तेंडूलकर" व्हायचीच स्वप्नं बघत असतो पण "सचिन" हा एखादाच असतो हे कळणं आणि कळून पचवणं जमलं नसेल त्यांना, असही तिला वाटून गेलं कुठेतरी.

म्हणूनच कितीदा ठरवलं तिने जे काय कोलाज समोर आहे त्याला प्रामाणिक पणे सामोरं जायचं. कुठचही लेबल न लावता, कसलही एडिटींग न करता, तो तो रंग मनात जसा आहे तसाच त्या प्युअर फॉर्म मधे बघायचा.

"जमेल?" मनात मगाचचा शंकेखोर एको पुन्हा उमटला.

"प्रामाणिक प्रयत्न करायला तर हरकत नाही ना?" पुन्हा एकदा मनानेच साथ देत म्हंटलं.

"पण अस जाहीर पणे व्यक्त झाल्यावर कोणी मला कृतघ्नपणाची लेबलं लावली तर? किंवा कोणी माझी कीव केली तर?" पुन्हा एक शंका उमटतेच.

"हसून सोडून द्यायचं.. सिंपल..." पुन्हा एकदा आतून उत्तर आलं.

तिने ह्याच उत्तराच्या वाटेवरुन जायचं ठरवून प्रोजेक्टर जोडून स्लाईड शो पुन्हा सुरु केला. त्यात एक कोलाज उमटलं. त्यावरुन हात फिरवता फिरवता प्रत्येक चित्रं जिवंत होत गेलं.. तसे चित्रातून पण ऐकू येणारे आवाज हळू हळू मोठे होत गेले नी तिने कान बंद करुन घेतले, तरिही ते आवाज जाणवतच गेले.

फिरत फिरत हात एका चित्रावर स्थिरावला. मोठ्या हौसेने आईच्या बुंड्या कानांकरता खाऊच्या मिळालेल्या पैशातून आईसाठी कुड्या घेऊन आलेली मुलं दिसली चित्रात, आईच्या चेहर्‍यावरच्या आनंदाश्रुनी आताही हात ओलावला... तेव्हढ्यात त्याच्याच बाजूला खळ्ळकन फुटून काच हातात घुसावी तसे "बाप नालायक आहे हे जगाला दाखावण्यासाठी हे सगळं केलत.." म्हणत कधीही भरुन न येणारी, अजूनही ओली असलेली जखम वागवणारं चित्र पुन्हा तशीच कळ आणून गेलं. अशा स्लाईडस मनात नेहमीच एका मागोमाग स्टोअर होत असाव्यात कदाचित कारण "त्या" स्लाईड मागोमाग "तशाच" चित्रांनी कॅन्व्हास भरुन वहायला लागला.

ती दरवेळी असं झालं की तो प्रोजेक्टरच बंद करुन टाकायची. पण आता सरत्या वर्षाला स्मरुन तिने ठरवलेलं होतं, आहे तसं त्यांना सामोरं जायचं. अस्वस्थं वाटलं... वाटून घ्यायचं, रडावसं वाटलं... रडून घ्यायचं, पुन्हा एकदा तितक्याच तिव्रतेने जीव लावावासा वाटला..... तो ही लावायचा. रस्ता चालत रहायचं मागे फिरायचं नाही त्यापासून पळायचं तर अजिबात नाही. जे जसं आहे ते ते तसं म्हणूनच स्विकारायचं. आणि त्यातल्या कोणत्याही एका चित्राला, आठवणीला नाकारायचं नाही. कारण कळत नकळत ह्या प्रवासाला त्यातलं प्रत्येक चित्रं कारणीभूत आहे.

तिच्या मनात आलं "माझं माझ्या आजच्या "मी" वर मनापासून प्रेम आहे आणि ही "मी" व्हायला प्रत्येक सल, प्रत्येक ओरखडा हा... प्रत्येक प्रेमळ अनुभवां इतकाच जबाबदार आहे. तेव्हा त्याला नाकारुन कसं चालेल?

आता तिने स्लाईड शो पुर्ण बघितला. तिच्यापुरतं विचारांचं वर्तुळ पुर्ण झालं. आता ती त्या कोलाज चित्रापाशी नव्या आत्मविश्वासाने थांबली आणि... तिने नविन वर्षाच्या शुभेच्छा द्यायला पुन्हा एकदा मोबाईल हातात घेतला.

बुधवार, ६ ऑक्टोबर, २०१०

मळभ

बर्‍याच दिवसांचं साचलेपण मनभर पसरुन राहिलेलं. तिने तसच स्वतःला रेटत यांत्रिकपणे सगळी कामं उरकली. रोजच्या शिरस्त्याने पुस्तक हातात घेऊन, काल ठेवलेलं खूणेचं पान उघडून वाचायला सुरुवात केली. जेमतेम एक पान संपवलं आणि अस्वस्थ होऊन पुस्तक तसच हातात ठेवून, डोळे मिटून मळभ दूर होण्याची वाट बघत खुर्चीत पडून राहिली.

फोनच्या रिंगने जाग आली, तेव्हा "आई गं!" म्हणत, खुर्चीच्या हातावर स्वतःच्या एका हाताचा जोर देत, दुसरा हात डोळ्यावर धरत वातावरणाशी अ‍ॅड्जस्ट होत ती उठली आणि इतका वेळ एकाजागी अवघडून झोपल्यामुळे पायाला आलेल्या मुंग्यांमुळे अडखळत फोनपाशी गेली.

फोनपाशी जाता जाता एक नजर सोफ्यावर बसल्या बसल्या डुलकी लागलेल्या अभय कडे गेली. "टिव्ही बघता बघता झोप लागली वाटतं ह्याला!"

टिव्हीचं बटण बंद करता करता फोनपाशी जात मनाशी आलं "तब्येत तर ठिक आहे ना ह्याची, अशी अवेळी कधी झोप लागत नाही एरव्ही?"

फोन झाला की बघुयात म्हणून रिसीव्हर उचलून कानाला लावला आणि पलिकडुन नेहमीचाच वहात्या झर्‍यासारखा आवाज कानावर पडला "हाय आई! मी बोलतेय"

"हम्म!" इथुन नुसताच हुंकार.

तिकडे वहात्या पाण्याचा खळखळाट तर इथे साचलेपणातनं आलेलं शेवाळं, तुलना करायला एक सेकंदही लागला नाही मनाला.

"आई, तुम्ही दोघं जेवलात?" पलिकडून पुन्हा एकदा आवाज आला.

उत्तर द्यायला तिने तोंड उघडलं आणि जाणवलं...घसा सुकलाय कधीचा. तसाच आवंढा गिळून तिने विचारलं "आजपण उशीर होणारे तुला?"

"हो... म्हणजे... जरा काम आहे आई, पण तुम्ही जेवून घ्या. माझी वाट बघु नका"

"बरं" असं म्हणेपर्यंत पलिकडून फोन कट पण झालेला.

ती तशीच बसून राहिली रिसिव्हर हातात धरुन, तिथून उठायची देखील शक्ती नव्हती आत्ता तिच्यात.

"काय होतय नेमक?"

तेच तर कळत नव्हतं ना तिला. कसला असा काळोख मनभर पसरला होता, कोण जाणे.

"आई, रिटायरमेंट जवळ आलेय ना तुझी म्हणून असं वाटतं तुला" लेकीने दहा हज्जार वेळा ऐकवलेलं वाक्य पुन्हा एकदा मनात घुमलं.

"खरच?" तिने स्वतःलाच प्रश्न केला, उत्तराची अपेक्षा न करता. आजकाल स्वतःपाशीही बोलायचा कंटाळा यायचा तिला.

तिला आठवलं, पुर्वी ती किती बोलायची.. भरभरुन बोलायची. समोरच्याच्या एका वाक्यावर तिची कमीत कमी पाच वाक्य तरी असायचीच. त्यावरुन तर बर्‍याचदा बापलेक दोघेही चेष्टा करायचे तिची. कोणी नसेल बोलायला तर स्वतःपाशीच बोलायची, इतकी ती बोलघेवडी होती. आणि आज? आज तिला स्वतःशी देखील संवाद नकोसा वाटत होता.

तिने बाहेर नजर टाकली. बाहेर अजुनच अंधारुनच आलेलं. पण नुसतच झाकोळलं होतं. भरलेलं आभाळ रिकामं काही होत नव्हतं.

टाचणी लागावी आणि फुगा फुटावा तसं आभाळ फुटून जावं, इतकं की त्याच्या बरोबर मनभर पसरलेलं हे मळभ देखील वाहून जावं असं एक क्षण वाटलं तिला.

सवयीनेच बाहेर नजर गेली. बाहेर अंगणात साळुंक्यांची जोडी दाणे टिपताना दिसली. पुर्वीच्या म्हणजे फार पुर्वीच्या ऐन तारुण्यातल्या तिने, अशी साळुंक्यांची जोडी बघून फिंगर्स क्रॉस करत त्याला ऐकवलं होतं 'टू फॉर लव्ह" आणि त्याने "वेडुबाई" म्हणत मारलेली टपली हळूच बोटांचा क्रॉस सोडुन मुठीत घट्ट धरुन ठेवली होती. पुढे बरीच वर्ष ह्या एका टपलीसाठी ती हे वाक्य त्याला ऐकवायची. पण आज तो बाजुला येउन उभा राहिल्याचही कळलं नाही तिला. मळभच कारणीभुत दुसरं काय?

"वादळ येइलसचं वाटतय, वारा पण सुटलाय. खिडकी लावुन घ्यायला हवी" त्याचं वाक्य तेव्हढं कानावर आलं.

"हम्म! वादळाचीच तर वाट बघतेय केव्हाची" तिने मनातल्या मनात म्हंटलं तरीही खिडकी घेतलीच लावून.

"मनूचा फोन होता? आजपण उशीर होणार म्हणालेय का?" त्याने विचारलं तशी त्याच्या प्रश्नावर कळेल न कळेलसा होकार देत ती आत जायला वळली.

"पाऊस पडला तर बर होईल ना! असा पाऊस कोसळावा की सारी तगमग दूर व्हावी आणि अशा पावसात तुझ्या हातची गरमा गरम भजी खावी.. अहाहा! स्वर्गच जणु. व्हावी आणि खावी... काय जुळतय का यमक तुझ्या भाषेत?" त्याने मुद्दाम चिडवत विचारलं. त्याचं चिडवणं फुकट गेलेलं बघून त्याने पुन्हा विचारलं "मग आज काय बेत आहे म्हणायचा?"

पुर्वी त्याच्या ह्याच प्रश्नाने उखडत "हे काय हॉटेल आहे का, नेहमी नेहमी वेगळे वेगळे बेत असायला?" असा प्रति टोला केलाच असता तिने. पण आज ती फक्त येव्हढच म्हणाली "काही विशेष नाही, नेहमीचच आहे. काही हवं होतं का वेगळं?"

"नाही नको, मनू आल्यावर जेवायलाच बसुयात" त्याने तिच्या मागून स्वयंपाक घरात येत म्हंटलं.

"नको, तिला उशीर होणारे. तिने जेवून घ्या म्हणून सांगितलय" तिने आमटीचं पातेलं गरम करायला ठेवत म्हंटलं.

"बरं वाटत नाहीयो का तुला?" त्याने विचारलं.

"नाही ठीक आहे" तिने आयुष्यात पहिल्यांदाच एका वाक्यात उत्तर दिलं असेल.

"ऑफिसमधे काही टेंशन आहे का? की मनूच्या लग्नाचं टेंशन घेतलयस?" "का रिटायरमेंट नंतर काय ह्याचं टेंशन घेतलयस तू?" त्याने कधी नव्हे ते वक्त्याची भुमिका घेत विचारलं.

"नाही रे तसं काही नाही आणि तशीही मी कुठे असणारे रिकामी. असतील की व्यवधानं पाठीमागे बरीच." तिने बर्‍याच वेळाने एक मोठ्ठं उत्तर दिलं त्याला.

"मग?" त्याच्या प्रश्नावर ती पुन्हा गप्प.

तिलाच कळत नव्हतं तर ती त्याला काय सांगणार होती?

कंटाळा... पुर्ण अंगात भरला होता, बाहेर जसा अंधार व्यापुन राहिलेला तसा. काय होतय? काय खुपतय? ह्याचा विचार करायचा देखील कंटाळा आलेला तिला.

"थोडे दिवस कुठे तरी फिरुन यायचं का? थोडा बदल झाला की बर वाटेल तुलाही" त्याने विषयाला वाट फोडायचा प्रयत्न करत म्हंटलं.

"मी काय विचार केला नाहिये का पुर्वीच ह्या शक्यतेचा?" तिने स्वतःच्याच मनाशी चिडून घेत मनातच म्हंटलं. बाहेर फक्त त्यातलं "नको, इथेच बरं आहे" इतकच उमटलं.

त्याची तिला बोलतं करायची धडपड तिला कळायची, पण बाहेर कुठेही जाण्याने काहीही होणार नाही ह्याबद्दल तिची पक्की खात्री होती. हे साचलेपण आजचं नव्हतं, रिटायरमेंटशी ह्याचा तसा काही संबंध नव्हता. अगदी पुर्वीपासून अधुन मधुन तिला वाटायचं "सगळं व्यर्थ आहे. कशालाच काही अर्थ नाही. आयुष्याचा प्रवास घडत गेला काय आणि आपण आखुन घडवला काय, दोन्ही शेवटी सारखच मिथ्या. पुन्हा बाकी शुन्यच. त्यापेक्षा गणित मांडणं नको आणि कसली समिकरणच नकोत."

तिला आठवले हट्टाने स्वतःला हवेत तसे आखून चाललेले काही क्षण. आठवले काही मिळवल्याचे...काही गमावल्याचे क्षण. त्या त्या वेळी कधी जिंकल्यासारखे.... कधी हरल्यासारखे वाटायला लावणारे क्षण.

पण तेव्हा हरल्या नंतर जिंकण्याची आशा होती. आता कळत चाललय, ते हरणं काय आणि जिंकणं काय दोन्हीही एक बुडबुडाच शेवटी. खरा आहे तो फक्त अंधार, आत बाहेर दोन्ही कडे पसरलाय तसा.

"ही नैराश्येची लक्षणं आहेत का?" तिला विचारांनीच दमायला झालं.

पण नाही ही नुसती निराशा नाही. हे त्यापलिकडचे काही आहे. Nothing is true वाटायला लावणारं. आपण करतोय ती कामं, जगतोय ते जगणं, हसणं...रडणं, घडणं .... घडवणं सगळच.. का? कशासाठी? हा प्रश्न विचारणारं आणि त्याचच उत्तर सापडत नाही किंवा शोधायची ताकद आणि इच्छा दोन्हीही नाही म्हणून मनाला आलेलं हे मळभ. ते कसं दूर होणार जागा बदलण्याने? ते तर आत आहे, मनात खोल. कुठेही गेलं तरी सोबत करणारं. काही काळ मनाला चकवा लागतही असेल अशा उपायांनी, पण त्याचा फोलपणा कळल्यावर मग काय? एक मिलीसेकंद देखील आपल्या मालकीचा नसतो हेच खरं.

गेल्या आठवड्यात उषा म्हणाली होती "सुंदराबाईला गार्डनचा सेल लागलाय, लंच मधे जाऊन येऊ"

"घरात इतक्या साड्या पडल्यात की त्याचाच सेल लावायची वेळ आलेय" तेव्हा तिला ऐकवलं होतं.

"चल ग! तू विकत काही घेउ नकोस. नुसती बघायला चल. नविन कपड्यांचा वास मनात भरुन घ्यायला चल." तिने आग्रहं करत हो म्हणायला भाग पाडलं होतं ते आठवलं आणि त्याच्याबरोबरीने तिला पॅरेलिसिस झाल्याचा फोन आल्यावर अडकलेला श्वासही आठवला जसाच्या तसा .

"असं कसं होईल, काल तर आम्ही ठरवत होतो सेल बघायला जायचं? ह्या प्रश्नाची टोचणी संपत नव्हती.

"मला मरणाची भीती वाटतेय का?" तिच्या मनात पटकन चमकून गेलं. "हे मळभ त्यामुळेच तर नव्हे?"

"नाही तसं नसावं. म्हणजे भीती तर असतेच की मनात कुठेतरी दडलेली, पण ही नुसत्या मरणाची भिती नाही. ही हतबलता, अस्वस्थता वेगळी आहे. पुढच्या क्षणाचं चित्र मला माहित नाही. त्यावर माझा कंट्रोल सोडा पण त्याचा साधा अंदाजही मला नाही, ह्यातून आली असावी कदाचित ही भीती.

पुढचा क्षण माहित नाही, गेलेला क्षण येव्हढच काय जाणारा क्षण देखिल पुर्णपणे माझा नव्हता. मी काहिही केलं नाही तरी आला दिवस संपणार आहे. पुढला क्षण यायचा तसाच येणार आहे. मग मी आत्ता पर्यंत केला तो प्रवास नक्की काय होता? मी काहीच केलं नाही? जो प्रवास केला तो झाला, इतकच? इतके दिवस "माझा माझा" पसारा म्हणत होते, त्याचं काय? मी काय करतेय? कशासाठी? आणि का?

ह्या का? का? आणि का? ची आवर्तनं संपत नव्हती.

डोळे मिटून ती विचारांच्या बरोबर फरफटत राहिली. तेव्हढ्यानेही दमली. हवा अजूनही तशीच होती.

"आई झोपलेय का बाबा?" दुरुन कुठुनतरी मनुने विचारल्या सारखं वाटलं का भास झाला? कुणास ठावूक.

रात्रीचे किती वाजलेत ठावूक नाही. जेवली असेल का मनू नीट? पांघरुण तरी घेतलय का बघायला हवं, गारवा वाढत चाललाय. मनाला ह्या विचारांच्या गोंधळातही जाणवलं.

"आई, तशीच झोपलीस ना अवघडुन? बाहेर गारवा वाढलाय" धडपडत उठणार्‍या शरिराला मनू अंगावर घालत असलेलं पांघरुण जाणवलं.

पांघरुणाच्या उबेत विरघळून जाताना वाटलं "सगळं मिथ्या वाटत असताना ही मधेच कोणती उब हविशी वाटते? धरुन ठेवावीशी वाटते? ज्याने अंधार पुर्णपणे संपला नाही तरी आता त्याची भिती कमी झाल्यासारखी वाटतेय?"

बहुतेक टाचणी लागून फुगा फुटलाय आणि आभाळही कोसळतय मोकळं होऊन.